Citrus Orchard Management: संत्रा बागेत काटेकोर सिंचनासह कीड-रोग व्यवस्थापनावर भर

Orange Farm Disease Management: संत्रा बागेतील कीड व रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढत्या तापमानामुळे लाल कोळी आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शून्य मशागत तंत्र आणि सेंद्रिय उपाय यांचा अवलंब फायदेशीर ठरतो.
Citrus Farming
Citrus FarmingAgrowon
Published on
Updated on

Citrus Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : संत्रा

शेतकरी : राजू निमकर

गाव : बुधला, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर

संत्रा लागवड : पाच एकर

संत्रा झाडे : ४५०

राजू निमकर यांच्याकडे २५० झाडे ही २२ वर्षे वयाची, तर उर्वरित झाडे १५ वर्षे वयाची आहेत. ही लागवड १८ बाय १८ फूट अंतरावर आहे. मागील काही वर्षांपासून बागेमध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून सेंद्रिय व्यवस्थापनावर भर दिला आहे. त्यामुळे फळांचा दर्जा उत्तम राखला जात आहे.

Citrus Farming
Orange Farming: ओलाव्याचा अंदाज घेत शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; संत्रा बागेचे स्मार्ट सिंचन!

आंबिया बहर व्यवस्थापन

आंबिया बहर घेण्याकरिता बाग नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ताणावर सोडली. मध्यम स्वरूपाच्या जमिनीत दोन महिन्यांचा पुरेसा ठरतो, असा त्यांचा अनुभव आहे.

बागेचा ताण तोडण्यापूर्वी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था यांच्या मार्गदर्शनानुसार एनपीके (नत्र, स्फुरद, पालाश) खतांचा डोस दिला. त्या सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्येदेखील गरजेनुसार दिली आहेत.

रासायनिक खतांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी मागील १२ वर्षांपासून सेंद्रिय खतांचा वापर वाढवला आहे. लेंडीखत, देशी गोवंशाच्या ट्रायकोडर्मा मिश्रित शेणखताचा वापर केला जातो.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेला पाणी देऊन ताण तोडला. सिंचनासाठी बागेत ठिबकचा पर्याय असून, झाडाच्या दोन्ही बाजूस इनलाईन पद्धतीचा अवलंब केला आहे. झाडांची गरज पाहून त्यानुसार सिंचनाचे नियोजन केले जाते.

ताण तोडतेवेळी बागेला पहिले पाणी कमी प्रमाणात दिले जाते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाण्याची मात्रा वाढविली जाते. त्यानुसार दर दहा दिवसाआड पाणी देण्यावर भर असतो. त्या माध्यमातून झाडावर नवीन नवती (पालवी) फुटण्यास सुरुवात होते. एक जानेवारीला पहिली पाणी दिल्यास, त्यानंतर सरासरी २३ ते २५ जानेवारीपासून बाग फुलावर येण्यास सुरुवात होते, असे राजू निमकर सांगतात.

पाट पाण्याचे दुष्परिणाम संत्रा बागेस पाटपाणी पद्धतीने सिंचन करण्यामुळे बागेत ओलावा कायम टिकून राहतो. त्यातून बुरशीजन्य रोगांसह फायटोप्थोराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. तसेच मजुरांची उपलब्धता आणि मजुरीवरील खर्च आदी बाबींचा विचार करून बागेत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. ठिबक सिंचन पद्धतीच्या माध्यमातून फायटोप्थोराच्या नियंत्रणासह मजुरी खर्चात मोठी बचत झाली. तसेच ठिबकद्वारे सिंचनावेळी बागेस विद्राव्य खते देण्याचे कामही सोईस्कर झाले, असे श्री. निमकर यांनी सांगितले.

Citrus Farming
Orange Damage Compensation : संत्रा गळ झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा

कीड-रोग व्यवस्थापन

दरवर्षी बागेत नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होण्याच्या काळात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढीस लागतो. त्यांच्या नियंत्रणाकरिता साधारण रासायनिक कीटकनाशकासह निंबोळी अर्काचा वापर केला जातो. निंबोळी अर्कामुळे कीटकनाशकाचा परिणाम योग्य प्रकारे साधता येतो, असे त्यांचे निरीक्षण आहे.

बागेत सिट्रस सायला किडीचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास संपूर्ण हंगाम वाया जातो. या किडीच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण करून शिफारशीनुसार उपाययोजना केल्या जातात.

बागेत विविध कारणांनी फळगळती होते. कारण जाणून नेमक्या उपायांवर भर दिला जातो.

आगामी नियोजन

मागील काही दिवसांपासून रात्री थंड, तर दिवसा उष्ण हवामान अशी स्थिती आहे. दिवसाच्या कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमानातील चढउतारामुळे बागेत लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लाल कोळी किडीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी घेतली आहे.

आगामी काळात बागेतील ओलाव्याचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जाईल. तापमानात वाढ होत असल्याने झाडांची पाण्याची गरज पाहून ठिबकचा कालावधी कमी जास्त केला जाईल.

या महिन्याच्या शेवटी शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातील. कॅल्शिअम नायट्रेट दिले जाईल.

शून्य मशागत तंत्राचा वापर

मागील आठ वर्षांपासून बागेत शून्य मशागत तंत्राचा वापर अवलंब केला आहे. जमीन मध्यम प्रकारची असल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास यातून मदत झाली. साधारणपणे संत्रा उत्पादक बागेतील तण नियंत्रणासाठी आंतरमशागत तंत्राचा वापर करतात. मात्र आंतरमशागतीच्या कामांमुळे झाडांच्या मुळांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे बागेतील तण नियंत्रणासाठी ग्रासकटरचा वापर करून त्याचा आच्छादन म्हणून वापर केला जातो. तण जागेवर कुजविले जाते. या सेंद्रिय आच्छादनामुळे संत्रा बागेला चांगलाच फायदा झाला आहे. वर्षातून तीन वेळा या माध्यमातून तण नियंत्रण केले जाते, असे श्री. निमकर सांगतात.

राजू निमकर ९८२३८३९४७५

(शब्दांकन : विनोद इंगोले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com