
Tech in Agriculture: छत्रपती संभाजीनगर कृषी विज्ञान केंद्रामार्फत तीन वर्षांपासून विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान व त्यातील विविध बाबींचा प्रसार करण्यात आला आहे. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांत तंत्रज्ञान वापराबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली. एकरी चार क्विंटलपर्यंत उत्पादन वाढ मिळाली. शिवाय अन्य विविध फायदेही मिळत आहेत.
हवामान बदल, किडी-रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादनखर्चात वाढ आदी कारणांमुळे कापसाची उत्पादकताघटली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर कृषी विज्ञान केंद्र- १ (केव्हीके) यांच्यामार्फत विशेष कापूस प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यास नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे. प्रकल्पाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
प्रकल्प कार्यक्षेत्र
पहिल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील (सिल्लोड, सोयगाव, कन्नड) १२ गावे व २५ शेतकऱ्यांकडे प्रकल्प राबविण्यात. यात सुमारे ६१ एकर क्षेत्र होते. पहिल्या वर्षीचे यश पाहता दुसऱ्या वर्षी (२०२४) चार तालुक्यांतील १९ गावांतील ९५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यंदा (२०२५) सिल्लोड, संभाजीनगर, सोयगाव, पैठण या चार तालुक्यांत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. यंदा एकूण क्षेत्र २५० एकर असून सुमारे शेतकरी समाविष्ट झाले आहेत.
...असा झाला तंत्रज्ञान वापर
प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी नागपूर येथील संशोधन संस्थेने शिफारस केलेल्या दाट लागवड. सघन लागवड तंत्रज्ञानाचा वापर केला. यात दाट पद्धतीत ९० बाय ३० सेंटिमीटर, तर सघन पद्धतीत ९० बाय १५ सेंटिमीटर अंतरावर लागवड करण्यात आली.
दाट लागवड पद्धतीत बियाण्यांचा एकरी चार पाकिटे असा वापर झाला. झाडांची संख्या एकरी सुमारे १४ हजार ८१४ होती. सघन लागवड पद्धतीत बियाणे पाकिटांची संख्या सहा होती. तर एकरी झाडांची संख्या २९ हजार ६२९ एवढी होती. पारंपरिक लागवडीत कापूस पिकाची शाखीय वाढ अनियंत्रित होते. त्यामुळे झाड मोठे होते, पण फळधारणा कमी होते. पेरणी उशिरा झाली किंवा वेळेवर न झाल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. ही समस्या लक्षात घेऊन दादा लाड तंत्राचा वापर करण्यात आला.
लागवडीसाठी बीटी व उभट वाणांचा वापर झाला. सघन पद्धतीच्या लागवडीसाठी उथळ किंवा हलक्या जमिनींची शिफारस करण्यात आली. लागवडीच्या ३५ ते ४० दिवसांनी गळफांदी काढली जाते. तर ८० ते ८५ दिवसांनी शेंडा खुडला जातो. त्यामुळे फळफांद्यांना अन्नद्रव्यांचा अधिक पुरवठा होतो. बोंडांची संख्या व वजन वाढते. शेंड्याकडील म्हणजे वरील भागातील फांद्यांना येणाऱ्या बोंडांचाही हा फायदा होतो.
पीक वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी मेपिक्वाट क्लोराइड या वनस्पती वाढ नियंत्रकाची गरजेनुसार दोन ते तीन वेळा फवारणी केली. त्यामुळे पीक जास्त उंच वाढत नाही. पहिल्या स्थानावरील बोंडे टिकून राहतात.
अर्थात, पीक वाढ व्यवस्थापन हे जमिनीचा प्रकार, हवामान, वाण, पाणी उपलब्धता या घटकांवरही आधारित ठरते. यासाठी केव्हीके नियमित मार्गदर्शन करते.
एकात्मिक कीड- रोग नियंत्रण व्यवस्थापन (IPM)
जमिनीच्या आरोग्यावर भर देत कंपोस्ट, जिवामृत, संजीवके, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर.
काढणीनंतर यंत्राद्वारे पऱ्हाट्यांची कुट्टी करून त्यांचा पुनर्वापर सांगण्यात आला. जेणे करून जमिनीच्या सेंद्रिय कर्बात वाढ होण्यास चालना मिळाली.
तंत्रज्ञान प्रसार
केव्हीककडून पहिल्या वर्षी तंत्रज्ञान विस्तारासाठीचे ११ कार्यक्रम घेण्यात आले. यात प्रक्षेत्र दिवस, मेळावे यांचाही समावेश राहिला. तर शेतकऱ्यांच्या शेतांना संपूर्ण हंगामभर केव्हीकेचे शास्त्रज्ञ भेट देत होते. तेथील निरीक्षणे नोंदवून वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. प्रसार कार्यक्रमांमध्ये दरवर्षी हजारांहून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे त्यांच्यात तंत्रज्ञान व उत्पादकता वाढीबाबत जागरूकता वाढली.
एकरी उत्पादनात झाली वाढ
तंत्रज्ञान वापरापूर्वी पारंपरिक पद्धतीच्या कपाशी लागवडीसाठी एकरी सुमारे २८ हजार रुपये खर्च यायचा. सुधारित तंत्र पद्धतीत खर्चात सुमारे २.८४ टक्के वाढ झाली. त्याचे कारण गळफांदी काढणे, छाटणी या कामांसाठी मजुरी खर्च वाढला. सन २०२३ मध्ये एकरी सरासरी उत्पादन ११.६८ क्विंटल, तर २०२४ मध्ये १०.७२ क्विंटल मिळाले. पारंपरिक पद्धतीत हेच उत्पादन ७ क्विंटलच्या आसपास होते. म्हणजेच सुधारित तंत्राद्वारे उत्पादनात एकरी चार क्विंटलहून अधिक वाढ झाली.
प्रकल्पातील योगदान
प्रकल्प अंमलबजावणीसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे, डॉ. विश्लेष नगरारे, केव्हीकेच्या प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर (प्रकल्प अधिकारी), डॉ. बस्वराज पिसुरे (सहप्रकल्प अधिकारी), सतीश कदम व जयदेवसिंग सिंगल (तांत्रिक प्रशिक्षक) यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यामुळेच या तीन वर्षांत प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विश्वास तयार झाला.
तंत्रज्ञान वापराचे झालेले फायदे
सुमारे दीडशे दिवसांत पीक संपते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे वेळेवर नियोजन करता येते.
लवकर कापणी झाल्याने गुलाबी बोंड अळीचा धोका कमी करता आला. यांत्रिक वेचणीसाठी अनुकूल वाण निवडल्यास मजुरांवर अवलंबित्व कमी करता येते.
कापूस पिकानंतर उरलेल्या अवशेषांचे कुट्टी खत म्हणून उपयोग करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो.
अतिरिक्त खर्चाच्या तुलनेत नफा अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते.
शेतकऱ्यांचे ज्ञान व आत्मविश्वास यात वाढ झाली.
प्रशिक्षणांमुळे सुधारित तंत्राने शेतीबाबत जागरूकता व ते स्वीकारण्याची मानसिकता वाढली.
डॉ. बस्वराज पिसुरे, ९९७५१४४२३२ (सहप्रकल्प अधिकारी, केव्हीके)
डॉ. दीप्ती पाटगावकर, ८९९९२३६६८४ कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१
सतीष कदम, ९२८४७९९४४२(तांत्रिक प्रशिक्षक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.