Cotton Farming Technology : कपाशीसाठी दादा लाड तंत्रज्ञान फायदेशीर

Cotton Production : कपाशीची योग्य अंतरावर लागवड आणि गरजेनुसार खतांचा संतुलित वापर या सोबतच गळफांदी कापून, झाडाची उंची कमी ठेवून कापूस उत्पादनवाढीचे तंत्र श्रीरंग उर्फ दादा लाड यांनी विकसित केले आहे.
Dada Lad Technology
Dada Lad TechnologyAgrowon

मयूरी देशमुख

Dada Lad Technology : कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीच्या मातीच्या आरोग्याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संवर्धन महत्त्वाचे असते. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन, पिकांचे अवशेष जमिनीत कुजवणे हे गरजेचे असते.

बीजप्रक्रियेपासून कीड-रोग नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये जैविक खते व बुरशीनाशकांचा नियमित वापर केला पाहिजे. विशेषतः खते आणि कीड-रोग नियंत्रणासाठी अनावश्यक निविष्ठांचा वापर टाळल्यास खर्चात मोठी बचत होते. कपाशी पिकाच्या उत्पादनवाढीसाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे देठणा (ता. जि. परभणी) येथील श्रीरंग देबबा लाड (उर्फ दादा लाड) सांगतात. ते भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे संघटक असून, त्यांनी ‘दादा लाड कापूस तंत्रज्ञान’ तयार केले आहे.

या तंत्रज्ञानामध्ये कपाशीची योग्य अंतरावर लागवड आणि गरजेनुसार खतांचा संतुलित वापर या सोबतच गळफांदी कापून, झाडाची उंची कमी ठेवण्याची शिफारस केली जाते. परिणामी, बोंडांचे वजन वाढून कपाशीचे अधिक उत्पादन हाती येते.

तंत्रामुळे एकरी १५ ते २१ क्विंटल उत्पादन मिळू शकते. या तंत्रज्ञानाला नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आय.सी.ए.आर.) मान्यता दिली आहे. शेकडो शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करत असून, समाधानकारक उत्पादन घेत आहेत.

दादा लाड कापूस तंत्रज्ञान

गळफांदी कापून झाडाचा शेंडा खुडून बोंडाचे वजन वाढवून घेऊन, उत्पादनामध्ये वाढ मिळविण्याच्या तंत्रज्ञानाला ‘दादा लाड तंत्रज्ञान’ म्हणतात. हे तंत्रज्ञान मध्यम ते खोल काळ्या जमिनीसाठी फायद्याचे आहे.

लागवडीचा कालावधी : मृग नक्षत्राचा पुरेसा पाऊस पडल्यानंतर (सलग तीन दिवसांत ७० मि.मी. एकत्रित पाऊस झाल्यानंतर) म्हणजे जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागवड शक्य तेवढ्या लवकर करावी. उशिरा पेरणी झाल्यास उत्पादनात घट संभवते.

Dada Lad Technology
Cotton Module Technology : कापसातील कचरा रोखणार मॉड्यूल तंत्रज्ञान

लागवडीचे अंतर : कापसाची लागवड ही ९० × ३० सेंमी या अंतरावर एका जागी एकच बी लावून करावी. म्हणजे झाडांची एकरी संख्या १४,८१४ इतकी राहते. झाडांची एकरी संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते. पेरणीसाठी न्यूमॅटिक पेरणी यंत्राचा वापर करावा. म्हणजे एकच बी योग्य खोलीवर (५ ते ६ सेंमी) अचूकपणे सोडले जाते. बियाणे कमी लागते. रोपे एकसमान व जोमदार उगवतात.

ज्यांच्याकडे न्यूमॅटिक पेरणी यंत्र उपलब्ध नाही, त्यांनी रोपांमधील अंतर समान राखण्यासाठी चिन्हांकित दोरी, गुंटरची साखळी, चिन्हांकित प्लॅस्टिक पाइप, दोन रोपांमधील अंतराच्या लांबीच्या काड्या इ.चा वापर करून हाताने टोकण करावी.

लागवडीच्या शिफारशी

जमिनीचा प्रकार : मध्यम खोल काळी.

लागवड अंतर : ९० सेंमी × ३० सेंमी

लागवड प्रणाली : या अंतरावर मध्यम घनतेचा प्रणालीचा अवलंब केला जाऊ शकतो.

पेरणीची पद्धत : पीक प्रणाली - कमी अंतराची लागवड प्रणाली. अंतर (सेंमी) - ९० × ३०

झाडांची संख्या / एकर : १४,८१४

बियाणे दर : १८०० ग्रॅम/ एकर जमिनीचा प्रकार ः मध्यम ते खोल काळी जमीन .

तंत्रज्ञान

पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी गळफांदी कापून टाकावी. ८५ ते ९० दिवसांनंतर किंवा कापूस कमरेएवढा झाल्यानंतर कपाशीचा मुख्य शेंडा खुडावा.

कापसाच्या झाडावर दोन प्रकारच्या फांद्या असतात. एक गळफांदी (मोनो पोडिया), दुसरी फळफांदी (सिम्पोडिया). या दोन्ही फांद्यांची लक्षणे भिन्न असतात.

गळफांदी : गळफांदी सुरुवातीलाच येते. एका झाडावर त्या तीन किंवा चार असतात. या फांद्या वाढीसाठी मुख्य झाडाला स्पर्धा करतात. झाडाला दिलेले ७० टक्के खत गळफांद्या घेतात. गळफांद्यांनंतर फळफांद्या येतात. त्या जमिनीला समांतर आडव्या वाढतात. या फांद्यांची जाडी वाढत नाही. खोडाकडून आलेला अन्नरस त्या बोंडाला देतात. जेवढा अन्नरस मिळेल तेवढ्या प्रमाणात फळफांद्यांवर बोंडे लागतात. बोंडाचे पोषण होऊन बोंडे वजनदार येतात. त्याउलट गळफांदी जोमाने वाढून, बोंडांची संख्या व वजनही कमी (म्हणजे अर्धा ते दीड ग्रॅम) भरते.

Dada Lad Technology
Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

फळफांदी : ही फांदी खोडापासून निघून जमिनीवर समांतर आडवी वाढते. एका झाडावर या फांद्यांची संख्या झाडाच्या उंचीवर अवलंबून असते. १२ ते १५ फळफांद्या असतात. ही फांदी जास्त जागा व्यापते.

झाडाचा शेंडा : ८५ ते ९० दिवसानंतर किंवा कापसाच्या झाडाची उंची ही ३ फूट एवढी झाल्यावर मुख्य शेंडा खुडावा. यामुळे झाडाची उंची मर्यादित राहून झाडाची शाखिय वाढ जास्त होते. बोंडे भरण्यास व बोंडातील कापसाचे वजन वाढण्यास मदत होते.

निष्कर्ष : गळफांदी कापल्यावर बोंडाचे वजन ३ ग्रॅमवरून ६ ग्रॅमवर पोहोचलेले निदर्शनास आले आहे. जर बोंडाचे वजन एक ग्रॅमने वाढले तरी एकरी तीन क्विंटल कापूस जास्तीचा होतो. गळफांदी काढल्यावर एका बोंडाच्या वजनात सरासरी ७ ग्रॅम वाढपर्यंत वाढ होते.

गळ फांदी कापताना घ्यावयाची काळजी

गळफांदी कापताना प्रथम फळफांदी व गळफांदी कोणती याची माहिती करून घ्यावी. एका झाडावर किमान ३ ते ४ गळफांद्या असतात.

गळफांदी ही खोडाच्या अगदी सुरुवातीला लागून, खोडाला समांतर वाढते. तर फळफांदी ही जमिनीला समांतर वाढते.

गळफांदी ही साधारणतः लागवडीनंतर ४० दिवसांनी ओळखायला येते. तेव्हा या फांदीवर पाने व शेंड्यावर काही पात्या लागलेल्या असतात. ती अचूकपणे ओळखून खोडापासून १ इंच अंतरावर धारदार कटरच्या साह्याने कापावी.

गळफांदी कापायला खूप उशीर झाल्यास ती बरेच अन्नद्रव्य शोषून घेते. ती खोडाएवढी जाड झाल्यामुळे कापायला कठीण जाते.

गळफांदी कापत असताना खोडाची साल निघू नये, झाडाला इजा होऊ नये, याची काळजी घ्यावी.

शेंडा खुडताना झाडाची उंची ३ फूट असल्याची खात्री करावी. त्यानंतर ६ इंच लांबीचा शेंडा कटरने कापावा.

गळफांदी कापताना व शेंडे खुडताना वातावरण कोरडे असायला हवे. पावसाळी किंवा ढगाळ वातावरणात गळफांदी कापली तर तिथे बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते.

प्रत्येक फळफांदीच्या बुडाला एक लांब दांडीचे व आकाराने मोठे पान असते. सामान्यतः या पानावर किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसतो. हे पानही काढून टाकावे.

झाडात दाटी करणाऱ्या हिरव्या फांद्या, पाने व काही पात्या फारसे मोहात न पडता कटरने कापून टाकाव्यात.

फांदी कापण्यासाठी वापरायचे कटर हे स्वच्छ व निर्जंतुक असावे.

चुकून बुरशीचा प्रादुर्भाव आढळल्यास बुरशीनाशकाची फवारणी करावी.

फायदे :

उत्पादन खर्चात बचत होते.

गळ फांद्या कापल्याने व झाड कमरेएवढेच ठेवल्याने झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो.

झाडाला मोकळी हवा मिळते यामुळे बुरशी किंवा इतर रोगाची लागण होत नाही.

फुले, पात्या, बोंडांना सूर्यप्रकाश मिळाल्याने त्यांची गळ होत नाही.

झाडांची उंची कमी राहिल्याने कीड-रोग प्रमाण कमी राहते. फवारणीही व्यवस्थित होते. खर्चही कमी होतो.

लांब दांडीचे पाने व जास्तीच्या फांद्या कापल्याने रसशोषक किडीचा प्रादुर्भाव, रोगाचा प्रादुर्भाव इ. कमी राहतात.

या कापसाचे उत्पादन नोव्हेंबर अखेरपर्यंत हाती येऊन शेत पुढील पिकासाठी रिकामे होते. सिंचनाची सोय असल्यास रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आदी पिके घेता येतात.

या तंत्राने अनेक शेतकरी एकरी १५ ते २१ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत असल्याचे पुढे आले आहे.

मयूरी देशमुख, ९२८४५२२२८४

श्रीरंग (दादा) देवबा लाड,९८२२५१८९४३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com