
Akola News: यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असताना गाजावाजा केलेल्या सघन पद्धतीने कापूस लागवडीचा प्रकल्प अद्याप जमिनीवर उतरलेला नाही. केंद्र सरकारच्या स्तरावरून मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तब्बल ५० हजार हेक्टरवर ही पद्धत राबवण्याची ठरले होते. पण शेतकऱ्यांच्या बांधावर त्याचे नामोनिशाणही दिसत नसल्याने हा प्रकल्प फाइलपुरता मर्यादित राहिला की काय, अशी चर्चा कृषी वर्तुळात सुरू झाली आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पुढाकाराने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सघन पद्धतीने कापूस लागवडीसाठी निधी, निविष्ठा व इतर अनुषंगिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली होती. जिल्ह्यात गेल्या काही हंगामांपासून सघन पद्धतीने कापूस लागवड करीत उत्पादन वाढवण्यात काही शेतकऱ्यांना यश आले आहे. त्याची दखल घेत केंद्राने हा अकोला पॅटर्न इतर कापूस उत्पादक राज्यातही राबवण्याबाबत जाहीर केले होते.
विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर अशा पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन केले जाईल, असे गेल्या काळात सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात एक-दोन बैठकाही झाल्या. केंद्राचे अधिकारी जिल्ह्यात येऊन गेले. स्थानिक अधिकाऱ्यांनी संभाव्य क्षेत्र, त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी लागणारा निधी याबाबत अवगत केले.
कृषी विभाग, केंद्रीय यंत्रणा, कृषी विद्यापीठ, शेतकरी यांच्या सहभागात हा प्रकल्प पुढे नेला जाणार होता. जून महिना मध्यावर आला तरी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काहीही झालेले दिसत नाही. हवामान बदलाच्या काळात मागील काही वर्षांत पारंपरिक पद्धतीने कापूस लागवड होत असलेल्या क्षेत्रात उत्पादकता घटत चालली आहे. कधी पाऊस, कधी कीड-रोगांचा प्रादुर्भाव या कारणीभूत ठरतो आहे.
गेल्या काळात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत तेव्हा अधिकाऱ्यांना निर्देश देत नियोजन करण्याचे व यासाठी आवश्यक तेवढा निधी देण्याचे स्पष्ट केले होते. नंतरच्या काळात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसंचालक प्राजक्ता वर्मा, सीसीआयचे सीएमडी ललितकुमार गुप्ता, ए. एल. वाघमारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह संबंधित अधिकारी, कृषी विद्यापीठ, केव्हीकेच्या शास्त्रज्ञांची बैठकही झाली. इतर विषयांसह या सघन कापूस लागवडीवरही चर्चा आली. पण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत यंदा तरी काहीही घडामोड झालेली दिसत नाही.
केव्हीके राबविणार दीड हजार हेक्टरवर उपक्रम
अकोला कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने या पद्धतीने मागील काही वर्षांपासून कापूस उत्पादन वाढीचे प्रयत्न होत आहेत. यावर्षीही केव्हीकेच्या माध्यमातून सुमारे दीड हजार हेक्टरपर्यंत हा उपक्रम कायम राहणार असल्याची माहिती आहे.