
डॉ. संजय मंडकमाले
Rural Enterpreneurship: शेळीपालन करताना प्रत्येक गोष्टीचा काटेकोर वापर करावा. विविध चारा प्रक्रियांचा वापर करून, गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, मक्याचे काड आणि शेतातील इतर दुय्यम पदार्थांचा वापर शेळ्यांच्या आहारात करावा. उद्योगाला लागणाऱ्या निविष्ठांची योग्य तजवीज गरजेपूर्वी आणि गरजेएवढी करून ठेवावी उदा. नेहमी लागणारी औषधे, वाळलेला चारा इत्यादी. उद्योजकाने आपल्या नफ्यातील ठरावीक भाग गंगाजळी म्हणून बाजूला काढून ठेवावा. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करावे.
शेळी कमीत कमी खाद्य घटकांच्यामध्ये तग धरू शकते. कमीत कमी जागेत शेळ्यांचे व्यवस्थापन करता येते. शेळी निकृष्ट प्रतीचा ओला सुका चारा सहज पचवू शकते. टॅनीनसारखा विषारी घटक तसेच सुबाभळीतील मायमोसीन सहज पचवते. पाण्याची गरजही इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी आहे. शेळी आपली ७० ते ८० टक्के भूक झाडपाला आणि द्विदल चाऱ्यावर भागवते. त्यामुळे इतर चराऊ प्राण्यांबरोबर ती स्पर्धा करत नाही. तसेच लिंबासारखा कडू झाडपाला खाऊ शकते.
शेळी पर्यावरणपूरक प्राणी आहे. मिथेन सारखा हरितगृह वायू उत्सर्जनाचे शेळ्यांमधील प्रमाण फक्त ५ किलो / जनावर / वर्ष एवढे अल्प आहे. लेंडीखतात नत्र ०.७ ते ०.८, स्फुरद ०.६ ते ०.७ व पालाश ०.८ ते १.२ टक्का आहे. लेंड्या या नैसर्गिक गोळीयुक्त खत आहे. त्यामुळे त्यांच्यातील अन्नघटक सावकाशपणे पिकांना उपलब्ध होतात. दर तीन वर्षांनी शेतात लेंडीखत मिसळावे. शेळीपालन व्यवसायासाठी अत्यंत कमी भांडवल लागते. एका गायीच्या खर्चात आपण १० ते १५ शेळ्या सांभाळू शकतो. शेळ्यांना वर्षभर बाजारपेठ उपलब्ध आहे.
शेळीपालनातील कमतरता
शेळ्यांची दररोजची आहाराची गरज इतर प्राण्यांपेक्षा ही खूप जास्त आहे. सर्वसाधारणपणे एका शेळीला तिच्या वजनाच्या ५ ते ११ टक्क्यांपर्यंत शुष्क पदार्थ लागतात.
मिळणारे मांसाचे प्रमाण इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी आहे. सर्वसाधारणपणे मासांचे प्रमाण ४५ ते ५० टक्के मिळते.
शेळीतील कॅप्रीन या घटकाची काही लोकांना ॲलर्जी असते. त्यामुळे बऱ्याच भागात शेळीचे मटण नाकारले जाते.
शेळीला जंगलाचा शत्रू मानले जाते. त्यामुळे चारा उपलब्ध असूनही चराई बंदीला सामोरे जावे लागते.
शेळीचे दूध अत्यंत औषधी व सत्त्वयुक्त आहे, हे माहिती असूनही केवळ त्याच्या वासामुळे दुधाला तेवढे महत्त्व नाही.
व्यवसायातील संधी
अभ्यासपूर्ण शेळीपालन व्यवसाय करणे गरजेचे आहे. पारंपरिक चराऊ पद्धतीने केलेले शेळीपालन शंभर टक्के किफायतशीर आहे, मात्र बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूप बदलणे महत्त्वाचे आहे.
मांसोत्पादन
प्रामुख्याने शेळी पालन मांसोत्पादनासाठी केले जाते. शेळीच्या मांसाला प्रचंड मागणी असून तुटवडाही आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या निकषाप्रमाणे प्रत्येकाला दरवर्षी ११ किलो मांस मिळणे गरजेचे आहे मात्र प्रत्यक्षात ही उपलब्धता फक्त ५ किलो आहे.
भारतीय शेळ्यांचे हलाल पद्धतीने उत्पादित केलेल्या मांसाला आखाती देशातून मोठी मागणी आहे. तसेच नेपाळ, बांगलादेशातून मागणी आहे. शेतकऱ्यांनी स्वत: एकत्र येऊन शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापून निर्यातक्षम शेळीपालनाकडे वळले पाहिजे.
मांसजन्य पदार्थ निर्मिती आणि विक्री
शहरी भागात झटपट खाण्यायोग्य पाकीट बंद पदार्थांना मोठी मागणी आहे. यासाठी विवीध मांसजन्य पदार्थ तयार करून विक्री केल्यास त्यापासून रोजगार निर्मितीही होऊ शकते. शेळीच्या मांसापासून सॉसेजेस, कबाब, सामोसे, पराठे, वडे, न्यूडल्स, लोणचे तसेच ओले सुके, तळलेले पदार्थ तयार करता येतात.
फिरते मटण दुकान
शहरी भागात तरूणांनी एकत्र येऊन मटण विक्री व्हॅन तयार करावी. आठवड्यातील ठरावीक दिवस घरपोच ताजे मटण पोहोचवले तर मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. उद्योजकही तयार होवू शकतील.
दुग्धजन्य पदार्थ
शेळीचे दूध औषधी असून आईच्या दुधाला पर्याय म्हणूनही त्याचा वापर होतो. शेळीचे दूध साथीच्या रोगांवर प्रभावी औषध आहे.
दूध संकलन व प्रक्रिया करून दूध पुरवठा केल्यास फार मोठा उद्योजकता विकास होवू शकतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि युवा मित्र, सिन्नर यांनी परस्पर सहकार्यातून आशिया खंडातील पहिली शेळीच्या दुधावर प्रक्रीया करणारी सावित्रीबाई फुले ग्रामीण महिला शेळीचे दूध प्रक्रिया संघाची स्थापना केली. आज दहा हजार ग्रामीण महिला याच्या सभासद आहेत. प्रथमत: फक्त शेळीचे दूध विक्री करण्यात आले. आता शेळीच्या दुधापासून पनीर, चीज, तूप, योगहर्ट असे पदार्थ करून विक्री केली जाते. दररोज ५०० ते १००० लिटर शेळीच्या दुधावर प्रक्रिया केली जाते.
दुधापासून सौंदर्य प्रसाधने
ग्रामीण भागात हिवाळ्यात खरबरीत झालेल्या त्वचेवरही शेळीचे दूध वापरले जाते. शेळीचे दूध त्वचेसाठी उत्तम मुलायमकारक व कांतिदायक आहे. याचाच वापर करून शेळीच्या दुधापासून साबण, क्रिम, क्लीनझिंग मिल्क अशी विविध उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.
खत निर्मिती
शेळीच्या मलमूत्रापासून, गांडूळ खत, विविध प्रकारचे कंपोस्ट, लेंडीखत, परसबागेसाठी खत निर्मिती करता येते.
कातड्याचा व्यापार
शेळीचे कातडे ताण सहन करणारे आहे. मुलायम असल्याने शेळीच्या कातड्यापासून जाकीट, पर्स, बेल्ट निर्मिती केली जाते. ब्लॅक बंगाली शेळीचे कातडे बूट बनविण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
निविष्ठांची विक्री
शेळी खाद्यासाठी मराठवाडा, विदर्भ, डोंगराळ प्रदेशातून वाळलेले गवत, तूर भुसा, हरभरा भुसा, सोयाबीन भुसा यांचा पुरवठा करण्याच्या व्यवसायात संधी आहे.
शेळीचे गोठे उभारणीसाठी लागणारी चेनलिंक, गव्हाणी यांचे उत्पादन व पुरवठा यातून चांगली रोजगार निर्मिती होऊ शकते.
शेळ्यांच्या विविध जाती
शेळी कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल हवामानात तग धरू शकते. शेळ्यांमध्ये आजाराचे प्रमाण नगण्य आहे. शेळ्यांमध्ये जुळी तिळी पिले देण्याची क्षमता आहे. भारतामध्ये ३७ शेळ्यांच्या जाती आहेत. हिमालयात अंगोरा सारखी तसेच लेह लडाख, काश्मीर मध्ये पश्मीना सारखी लोकर देणारी चांगथांगी, काश्मिरी या जाती तर समुद्राचे खारट पाणी पिऊनही तग धरणारी निकोबारी शेळ्यांची जात आपल्याकडे उपलब्ध आहे. मराठवाडा व महाराष्ट्रातील कोरडवाहू भागामध्ये उस्मानाबादी, बागायती भागासाठी संगमनेरी, विदर्भामध्ये बेरारी आणि कोकणामध्ये कोकण कन्याळ या जाती दिसतात.
शेळीपालन व्यवसायातील धोके
दलालांमुळे फसवणुकीच्या घटना.
शेळ्यांच्या गोठ्यावर वारेमाप खर्च.
निकृष्ट शेळ्यांची खरेदी.
शेळीपालनामध्ये चुकीच्या मार्गाचा अवलंब.
जास्त उत्पादनाच्या नावाखाली नवीन जातीचा वापर.
अनियंत्रित पैदास तंत्र.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली कोलमडलेली उत्पादन क्षमता.
नवीन जातींबरोबर येणारे आजार.
- डॉ. संजय मंडकमाले, ९८२२३५९९३७
(निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ, अ.भा.स. संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.