
Season-Wise Planning in Goat Farming:
शेतकरी नियोजन । शेळीपालन
शेतकरी : गणेश अंकुश कदम
गाव : सोमपुरी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
एकूण शेती : १२ एकर
शेळी जात : बीटल
पैठण तालुक्यातील सोमपुरी येथील गणेश अंकुश कदम यांच्याकडे १२ एकर शेती आहे. शेतीला पूरक उद्योग व आवड म्हणून २०१८ मध्ये शेळीपालनाकडे वळले. शेळीपालनास सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी व्यवसायाविषयी सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर शेळीपालनासाठी बीटल जातीच्या शेळीची निवड केली. पूर्णतः बंदिस्त असलेल्या शेळीपालनात त्यांनी ५ गुंठ्यात चाऱ्याची सोय केली असून २०२१ पासून उत्पादन व विक्रीत सातत्य ठेवले आहे. शेळीपालन व्यवसायामध्ये पत्नी कावेरी, आई कमल, वडील अंकुश, भाऊ दिनेश कदम यांची मदत मिळते. त्यामुळे शेळीपालनामध्ये हंगामनिहाय काटेकोर नियोजन करणे शक्य होत असल्याचे गणेश कदम सांगतात.
बीटल जातीची निवड
शेळीपालन व्यवसाय करण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणच्या शेळी फार्मवर भेटी दिल्या. त्यावेळी विविध जातींच्या शेळ्यांची जवळून माहिती घेतली. त्यातून बीटल जातीची शेळी संगोपनासाठी योग्य वाटली. या शेळ्या कमी दिवसांत वजन वाढ, निरोगी आणि शांत असल्याने त्यांची निवड करण्यात आली. पंढरपूर व कर्जत येथून बीटल जातीच्या ४ शेळ्या आणि १ बोकड खरेदी केले. त्यासाठी सुमारे १ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे, असे श्री. कदम सांगतात.
बंदिस्त शेडची उभारणी
शेळीपालनासाठी २५ बाय ४० फुटांचे बंदिस्त प्रकारचे शेड उभारले. शेडमध्ये ४ बाय ४ फुटांचे पॅलेट सिस्टम उभे करून जमिनीपासून २२ इंचावर चाऱ्यासाठी गव्हाणी तयार केल्या आहेत. शेडमध्ये शेळ्यांना पाणी, खाद्य एकाच जागी उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. शिवाय थंडीच्या दिवसात शेळ्यांना ऊब मिळावी म्हणून शेडमध्ये वीजेचे बल्ब लावण्यात आले आहेत.
शेळ्यांच्या संख्येत वाढ
फेब्रुवारी २०१८ मध्ये बीटल जातीच्या ४ शेळ्या आणि एका बोकडापासून शेळीपालनास सुरुवात केली. त्यानंतर शेळ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. साधारण २०२० पर्यंत शेळ्यांच्या संख्येत वाढ करण्यावर त्यांनी भर दिला. २०२१ ते २०२४ या काळात सुमारे ४५ करडांची विक्री करण्यात आली. त्यात २० बोकड व २५ शेळ्यांचा समावेश होता. या विक्रीमधून चांगले उत्पन्न हाती आले. सध्या शेडमध्ये बीटल जातींच्या ७ शेळ्या आणि १ बोकड आहेत.
चारा पिकांची लागवड
दर्जेदार चाऱ्यासाठी स्वतःकडील पाच गुंठे क्षेत्रात चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात संकरित नेपियर गवत, लसूण घास, मुरघासासाठी मका लागवड केली जाते.
घरच्या शेतीतून उत्पादित होणाऱ्या मका लागवडीतून मुरघास निर्मिती केली जाते. त्यामुळे बाहेरून मका खरेदी करून मुरघास निर्मिती करण्यावर होणारा खर्च कमी करण्यात यश आले आहे.
शेळीपालनामध्ये सर्वाधिक खर्च हा चारा आणि आरोग्य व्यवस्थापनावर होतो. शेतामध्येच चारा पिकांची लागवड केल्यामुळे दर्जेदार चारा शेळ्यांना उपलब्ध होतो. शिवाय शेडमध्ये स्वच्छता राखण्यामुळे शेळ्या आजारा पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेळीपालनामध्ये खाद्य आणि आरोग्यावर होणारा खर्च नियंत्रित करण्यात श्री. कदम यशस्वी झाले आहेत.
आरोग्य व्यवस्थापन
शेळ्यांच्या शारीरिक वाढ उत्तम मिळविण्यासाठी आहार आणि आरोग्य व्यवस्थापनावर भर देणे अत्यंत आवश्यक असते. शेडमध्ये नियमित स्वच्छता राखण्यावर आणि लसीकरणावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
आजारी शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे इतर निरोगी शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार नियमित प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते.
शेळ्यांच्या वयानुसार खाद्य आणि लसीकरण केल्यामुळे त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते.
व्यवस्थापन पद्धतीमध्ये हंगामनिहाय आवश्यकतेनुसार वेळोवेळी योग्य बदल केले जातात.
जाग्यावर खाद्य, पाण्याची सोय
शेळीपालन करताना प्रत्येक बाबीचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असते. त्यासाठी आरोग्य, खाद्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. बंदिस्त शेळीपालनात शेळ्यांना शेडमध्ये जाग्यावरच दर्जेदार चाऱ्याची आणि पिण्यासाठी पाण्याची सोय करावी लागते.
चारा व्यवस्थापनानुसार दररोज सकाळी साडेसात वाजता रात्री भिजवून ठेवलेला गहू आणि मका भरडा दिला जातो. त्याची दोन भागांत विभागणी करून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा विभागून दिले जाते.
सकाळी नऊ वाजता मुरघास, दुपारी एक वाजता तूर भुसा, सायंकाळी सहा वाजता लसूण घास आणि नेपियर कुट्टी दिली जाते. असे दिवसभरात साधारण ५ किलो प्रति शेळी खाद्य दिले जाते.
दैनंदिन आहारामध्ये मका तसेच गव्हाचा भरडा, वाळलेल्या कडबा, तुरीचे भुसकट यांचा वापर केला जातो. शेळ्यांना शेडमध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची उपलब्ध केले जाते.
- गणेश कदम, ९७६३६ ६७०६१
(शब्दांकन: संतोष मुंढे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.