Vegetable Farming Management : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दानापूर हे सुमारे आठहजारांहून अधिक लोकसंख्येचे व भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. साधारण १९९० पासून टप्प्याटप्प्याने गावात भाजीपाल्याखालील क्षेत्र विस्तारण्यास मदत झाली आहे. गावात सिंचनाची सोय असलेला प्रत्येक शेतकरी काही ना काही क्षेत्रावर भाजीपाला पिकवतो.
टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, भेंडी, काकडी, कारले आदी विविधता गावात पाहण्यास मिळते. या विविधतेमुळेच गावात वर्षभर भाजीपाला लागवड पाहण्यास मिळते. यात जून ते ऑक्टोबर, ऑक्टोबर ते फेब्रुवारी व फेब्रुवारी ते मे अशा टप्प्यांमध्ये उत्पादन घेण्यात येते.
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर
दानापूरच्या शिवारापासून काही अंतरावर वारीहनुमान येथे मोठे धरण आहे. त्याचे पाणी कालव्याद्वारे सिंचनासाठी वापरण्यात येते. अर्थात पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी शेतकरी तुषार व अधिक प्रमाणात ठिबकचा वापर करतात. प्रत्येक पिकासाठी पॉली मल्चिंग पेपरचा वापरही केला जातो. अलीकडील काळात ‘क्रॉप कव्हर’ चाही वापरही वाढतो आहे. गावात ट्रॅक्टरही मोठ्या संख्येने आहेत.
एकीकडे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर असला तरी दुसरीकडे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून बाजारभावसुद्धा अस्थिर होत आहेत. यामुळे ताळेबंद जुळवताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. गावात मिरचीचे एकरी १५, २० ते कमाल ३०, ३५ टनांपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत.
वर्षभराचा विचार केल्यास त्यास सरासरी २५ रुपये प्रति किलो दर मिळतो. कारले उत्पादनही एकरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत आहे. त्याचेही दर किलोला २ ते २५ रुपयांदरम्यान राहतात. सर्व भाजीपाला पिकांचा विचार करता एकरी एक ते दीड लाख व काहीवेळा त्याहून अधिक उत्पन्न मिळते.
बदलले अर्थकारण
शेतकरी प्रतवारी, स्वच्छता करूनच बाजारपेठांमध्ये माल पाठवतात. त्यामुळे त्यास चांगला दर मिळतो. अकोट, अकोला, जळगाव खानदेश, नागपूर, नवी मुंबई, मध्यप्रदेशातील हुशंगाबाद आदी बाजारपेठा शेतकऱ्यांनी हस्तगत केल्या आहेत.
मालाच्या वाहतुकीसाठी अनेक शेतकऱ्यांनी वाहने घेतली आहेत. गावात आजमितीला ३० हून अधिक वाहने पाहण्यास मिळतात. या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा खेळू लागला आहे. संपूर्ण कुटुंब शेतात राबतेच. शिवाय शेकडो मजुरांच्या हाताला देखील दररोज काम उपलब्ध झाले आहे.
भाजीपाला पिकांमध्ये वेल, मांडव बांधण्यासाठी कुशल मजुरांची गरज भासते. त्यांना तासाच्या दराने मजुरी मिळते. या शेती पद्धतीमुळे पंचक्रोशीत बियाणे, खते, मल्चिंग पेपर, सूक्ष्मसिंचन यंत्रणा आदी निविष्ठा व्यवसायांना चालना मिळाली आहे.
गावात पाण्याची मुबलकता असल्याने केळी, पपई आदी पिकांकडेही शेतकरी वळले आहेत. भाजीपाला व फळबागांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधली. टुमदार घरे उभी राहिली. काहींनी शेती विकत घेतली. मोठ्या आकाराचे गोठे उभारले. सहाचाकी, चारचाकी वाहनांसह दुचाकी घरोघरी आल्या.
गावातील सुधारणा
गावातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थांना ‘आरओ फिल्टर’ च्या पाण्यासह अन्य सुविधा मिळतात. दोन्ही स्मशानभूमीचा विकास लोकसहभागातून सुरु आहे. या परिसरात सातशेंवर झाडांची लागवड झाली आहे.
बाहेरगावी नोकरीनिमित्त असलेल्या गावातील व्यक्तींनी गावपरिसरात वृक्षारोपणात योगदान दिले आहे. गावातील सुमारे ३५ जण भारतीय सैन्यात सेवा बजावत आहेत. पाच जण पोलिस उपनिरीक्षक तर ३० कॉन्स्टेबलपदी कार्यरत आहेत.
राष्ट्रसंतांचा पदस्पर्श
दानापूर हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. सन १९४८ मध्ये राष्ट्रसंतांनी येथे भेट दिली होती. महाराजांनी येथे सामुदायिक प्रार्थना व तरुणांसाठी व्यायाम वर्गाचे आयोजन केले होते. एक नोव्हेंबर १९६८ रोजी महाराजांचे निधन झाले. त्यांची आठवण म्हणून त्यांचे स्मारक गावकऱ्यांच्या पुढाकारातून उभारण्यात आले आहे
श्वेत’ क्रांतीच्या दिशेनेही पाऊल
गावात महेश खोने या युवकाचे दूध संकलन केंद्र असून दररोज १८ ते २० हजार लिटर दुधाचे संकलित होऊन एका डेअरीला ते पुरविले जाते. या व्यवसायामुळे गावातील शेतकऱ्यांनाही दुग्ध उत्पादक होण्यासाठी चालना मिळाली आहे.
वीस वर्षांपासून भाजीपाला शेतीत आहे. घरची २५ एकर तर भाडेपट्ट्याने २५० एकर शेती करीत आहे. आधुनिक तंत्रांचा अधिकाधिक वापर करतो. दिवसाला सुमारे ४०० या संख्येने मजुरांना माझ्या शेतीत रोजगार उपलब्ध करून दिला आहे.गोपाल येऊल
सुधारित तंत्राद्वारे शेडनेटमध्ये मिरची लागवड करतो. त्यामुळे दर्जेदार उत्पादन घेऊन त्यास दर चांगला मिळवणे शक्य झाले आहे.डॉ. अजय विखे
काकडी तसेच अन्य भाजीपाला शेतीने पाठबळ दिले आहे. याच शेतीतून प्रगती करून कुटुंबाचे अर्थकारण उंचावणे शक्य झाले आहे.अनिल खोडे, सुरेश पिलात्रे
भाजीपाला उत्पादन आज तुलनेने खर्चिक झाले आहे. मोठ्या प्रमाणात किडी-रोगांचा प्रादुर्भाव होतो. खर्च कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे.योगेश येऊल ७३८७८३१६४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.