Agriculture Success Story : आदिवासी पाड्यांवर महिलांनी घडवली धवलक्रांती

Dairy Milk Farming : २५ वर्षांपूर्वी गोंदुणे (ता. सुरगाणा,जि.नाशिक) शिवारात महिला बचत गट चळवळ सुरु झाली. त्यातून दुग्धव्यवसायाला गती मिळाली. महिलांनी एकत्र येत २००८ मध्ये बिरसा मुंडा महिला दूध उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना केली.
Dairy Milk Business
Dairy Milk Business Agrowon

Success Story of Dairy Business : पारंपारिक जिरायती पिकांमुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी सुरगाणा तालुक्यातून स्थलांतर ठरलेले. अशा परिस्थितीत नव्वदच्या दशकात २० जानेवारी, १९९६ रोजी गोंदुणे (ता. सुरगाणा, जि.नाशिक) येथे एकता महिला स्वयं सहाय्यता बचत गट आणि २० डिसेंबर, १९९९ रोजी महालक्ष्मी स्वयं सहाय्यता बचत गटाची सुरवात झाली. गटातील महिलांनी अवघ्या २० रुपयांपासून बचत सुरु केली. एकता गटाच्या मोहना गांगोडा आणि महालक्ष्मी गटाच्या जिवली भोये यांनी गटाचे नेतृत्व करत काम पुढे नेले.

बचतीतून आपण काहीतरी करू शकतो हा विश्वास निर्माण झाला. आदिवासी भागातील स्वावलंबनाची भूमिका घेणाऱ्या कष्टाळू महिलांनी एकत्र येत एक पाऊल पुढे टाकले. १९९९ मध्ये महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या मदतीने गटांना अडीच लाखांचे बँकेचे अर्थसाहाय्य मिळाले. सुरवातीला काही महिलांनी म्हशी विकत घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला. या प्रवासात दोन्ही गटांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यातून पुढे टप्प्याटप्याने व्यावसायिक पद्धतीने दुग्धव्यवसाय विस्तारत गेला आहे.

Dairy Milk Business
Dairy Business : चाळीस वर्षांची दुग्धप्रक्रियेची यशस्वी परंपरा

महिला सहकारी दूध संघाची स्थापना

महिला गटातील शिस्त, योग्य आर्थिक व्यवहार, दरमहा पाच तारखेची बैठक, प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त, कठोर परिश्रम, जिद्दीने काम करण्याची वृत्ती, सांघिक वृत्ती, परस्पर सहकार्य या गुणांमुळे बँकेच्या अडीच लाख कर्जाच्या निम्या कर्जावर अनुदान मिळाल्यानंतर नऊ महिन्यांच्या कालावधीत गटाने सव्वा लाखांची परतफेड केली.

अनेक अडचणींचा सामना करीत महिलांनी २००८ मध्ये बिरसा मुंडा महिला दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या नावाने नोंदणीकृत डेअरी सुरु केली. त्यामुळे जेथे दुधाचा एक थेंब नव्हता, कुठल्याही व्यावसायिक संधी नव्हत्या, अशा भागात आज बदल झाला आहे. या संस्थेचे कामकाज आणि व्यवस्थापनाची जबाबदारी मनोहर भोये यांच्याकडे आहे.

दुग्ध व्यवसायाचा झाला विस्तार:

संस्थेचे सचिव मनोहर भोये दुग्ध व्यवसायाच्या विस्ताराबाबत म्हणाले की, दररोज सुमारे ३०० महिला पशुपालकांच्या माध्यमातून सरासरी अडीच हजार लिटर दूध संकलन होते. हे दूध वघई (जि.डांग) येथील शीतकरण केंद्रावर जाते. त्यावर प्राथमिक प्रक्रिया करून आलीपूर (ता.चिखली,जि.वलसाड) येथील वसुंधरा डेअरीमध्ये जाते. संस्थेची दूध संकलन केंद्राची स्वमालकीची इमारत असून येथे सीमावर्ती भागातील गोंदणे, हडकाईचोंड, पांगारणे, केळीपाडा, गुजरात राज्यातील भुरभेंडी, दगडपाडा तसेच वस्तीवरील दुधाचे संकलन होते.

या परिसरात तीन ते साडेतीन हजार दुधाळ जनावरे आहेत. दरवर्षी आमच्या भागातून रोजगारासाठी गुजरात राज्यातील सुरत, चिखली, गणदेवी, बिलीमोरा आणि महाराष्ट्रातील निफाड, लासलगाव, पिंपळगाव, ओझर या भागात स्थलांतर होत असे. आता मात्र दुग्धव्यवसायाने पाच ते सात गावातील उदरनिर्वाहासाठी होणारे स्थलांतर थांबले, महिलांचे अर्थकारण उंचावले आहे. आजमितीला संस्थेची वार्षिक तीन कोटींची उलाढाल होत आहे.

Dairy Milk Business
Dairy Business : कुटुंबाच्या एकीतून घातली दुग्ध व्यवसायाला गवसणी

शोधल्या प्रगतीच्या वाटा

महिला बचत गटाच्या माध्यमातून दूध व्यवसाय विस्तारला. या महिला स्थानिक संधी ओळखून तीन वर्षांपासून देशी वृक्षांची रोपवाटिका, खत विक्री, मोह फूल खरेदी असे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांच्या कामाची दखल राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतली.

आर्थिक व सामाजिक प्रगती साधल्याबद्दल एकता व महालक्ष्मी स्वयं सहाय्यता बचत गटास २००७-०८ साली अनुक्रमे तालुकास्तरीय द्वितीय पाच हजार रुपये आणि जिल्हास्तरीय दहा हजार रुपयांचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

महिला झाल्या साक्षर :

बचत गट चळवळीत काम करताना महिलांनी अनेक बदल स्वीकारले. बँकेतून कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यायचे असेल तर सही करता येणे आवश्यक होते. सर्वच अशिक्षित निरक्षर महिलांना लाखो रुपयांचे कर्ज केवळ अंगठ्याच्या निशाणीवर वितरण करायचे कसे ? हा त्यावेळी बँकेला प्रश्न पडलेला होता. यावर उत्तर शोधत महिलांनी १९९६ साली महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या प्रौढ साक्षरता वर्गात रात्रशाळेत उपस्थिती लावली.

सहीपुरते प्राथमिक शिक्षण घेतले. दूध व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती महिलांनी करून दाखवली आहे. त्यामुळे आर्थिक स्वावलंबनासह मुख्य प्रवाहात महिला आल्या. स्थलांतर थांबल्याने मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत आहे. अनेक मुले नाशिक, पुणे शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. उत्पन्नवाढ झाल्याने आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा वाढली आहे. त्यातून घरांचे बांधकाम, वाहन खरेदी, शेती विकासाला गती मिळाली आहे.

महिलांचे संघटित प्रयत्न :

दूध संस्थेमध्ये जिवली भोये, सविता गावित, पारु गावित, मोहना गांगोडा, सुकरा पवार, सुशीला पवार, सिता गावित, जमू भोये, नीरु पवार, गजन भोये या महिला संचालक म्हणून कामकाज पाहतात. दूध संघाला महालक्ष्मी, एकता, भाविशा, सावित्रीबाई फुले, जिजामाता या महिला बचत गटाची खंबीर साथ आहे. बचत गटातील पारु गावित, लक्ष्मी भोये, तारा भोये, सीता भोये, सीता गावित, भारजू गावित, रंगली गावित, गणना गावित, चिनी गावित, लवंगी पवार, रंजना गावित, हिरा गावित,, भिमा चौधरी, गजन भोये, इंदू भोये, इंदू गावित,भिमा कुरंगुडा, जतरी गावित, लीना गावित, मैना घिसरा, जून दिवा, पुष्पा गावित या आदिवासी भगिनी खंबीरपणे दूध व्यवसायाला पुढे नेत आहेत. आता या व्यवसायाच्या विस्तारासाठी शासनाची साथ गरजेची आहे.

कामकाजाचे स्वरूप :

- उत्पादक सभासद...२७५
- सरासरी दैनंदिन दूध संकलन ....३००० लिटर
- गोंदुणे, हाडकाई चोंड, पांगरणे, केळीपाडा, उदमाळ, देवगाव, चिंचले, रांजुणे,भुरभेंडी गावातून संकलन.
- वार्षिक हिरव्या व कोरड्या चाऱ्याचे नियोजन.
- खासगी पशुतज्ज्ञांकडून जनावरांचे लसीकरण आणि तपासणी.
- लॅक्टो मीटरद्वारे दूध तपासणी, गुणवत्तेनुसार दुधाचा दर.
- संगणकीकृत पद्धतीने कामकाज.
- स्वमालकीचे दूध संकलन केंद्र.
-दुधाची रक्कम थेट सभासदाच्या खात्यावर जमा.

संपर्क ः मनोहर भोये (सचिव),७६२०८३६४९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com