Vegetable Farming : हंगामी भाजीपाला, फळपिकांतून मिळवले आर्थिक स्थैर्य

Agriculture Success Story : नाशिक जिल्ह्यातील खामखेडा (ता. देवळा) येथील संदीप व शरद या शेवाळे बंधूनी हंगामी भाजीपाला, कलिंगड, खरबूज यांसारख्या फळपिकांच्या शेतीतून प्रयोगशीलता जपली आहे.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon
Published on
Updated on

Fruit Crop Farming : वडिलोपार्जित शेतीपैकी वाट्याला आलेली सहा एकर शेती काशिनाथ मोहन शेवाळे यांनी २००९ मध्ये आपल्या संदीप आणि शरद या दोन मुलांकडे दिली. तेव्हा संदीपने कला शाखेतून पदवी घेतली होती.

नोकरीपेक्षा आपली शेतीच आदर्श पद्धतीने करू, हा संकल्प घेऊन त्याने शेतीत पदार्पण केले. पूर्वी असलेल्या ऊस आणि उन्हाळी कांदा या पारंपरिक पिकांना भाजीपाला पिकातून पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मर्यादित भांडवल, उपलब्ध साधनसामग्री यांचे आव्हान होते.

व्यावसायिक पद्धतीने भाजीपाला पिके घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटी देत अभ्यास केला. कमी कालावधीची हंगामी पीक म्हणन २००९ मध्ये सुरुवातीला कोबी लागवड केली. त्यानंतर २०१२ मध्ये त्याला कलिंगड लागवडीची जोड दिली. नवीन पिके असल्याने सुरुवातीला अडचणी आल्या, तरी अन्य शेतकऱ्यांची मदत घेत नियोजनामध्ये योग्य ते बदल केले. त्याचे चांगले परिणाम आल्याने आत्मविश्‍वास वाढला.

मर्यादित क्षेत्रावर कमी कालावधीची पिके

पारंपरिक पद्धतीने पीक उत्पादनाला व उत्पन्नाला मर्यादा असल्याचे संदीप आणि शरद यांच्या लक्षात आले. शेतीमध्ये सुधारित पद्धती आणि तंत्रज्ञान वापरत बदल करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्यांच्या वापरासाठी भांडवलाची मर्यादा आड येत होती. उसाऐवजी कमी कालावधीची पिके घेत त्यांनी उत्पन्नामध्ये वाढ मिळवू लागले. हळूहळू त्यात अधिक उत्पादन आणि उत्पन्न घेण्याचे कसब शेवाळे कुटुंबीयांनी प्राप्त केले. शेतीमालाच्या दरामध्ये अस्थिरता असल्याने हमखास इतके उत्पादन येईलच, याची कोणतीही खात्री देता येत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत करण्यासाठी विविध पर्याय ते शोधत असतात.

२०१२ मध्ये गावात प्रथमच त्यांनी मल्चिंग पेपरवर कलिंगड लागवड केली. थोडेसे धाडस केले होते. पण त्यातून पाण्याचा कार्यक्षम वापर, तणनियंत्रण खर्च कमी होत असल्याचे लक्षात आले. आत्मविश्‍वास वाढल्यामुळे त्यांनी आता संपूर्ण क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन, शक्य तिथे मल्चिंग पेपरचा वापर, भौतिक पद्धतीने कीड नियंत्रण व रासायनिक कीडनाशकाला शक्य तिथे जैविक घटकांचा पर्याय अशा सुधारित आणि प्रगत पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे.

Vegetable Farming
Agriculture Success Story : पारंपरिक काजू, सुपारीला दिली काकडीची जोड

कामकाजातील महत्त्वाच्या बाबी

कांदा पिकामध्ये इनलाइन ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे पिकांच्या गरजेनुसार पाणी आणि खते यांचे नियोजन करता येते. परिणामी वेळ व मजुरीची बचत होऊन कांदा गुणवत्ता वाढते, असे संदीप सांगतात.

कोबी, कलिंगडसारखी एक वेळ काढणीवर येणारी निवडत असल्याने मनुष्यबळ कमी लागते.

दरवर्षी १५ मेपासून कोबी लागवडीची तयारी सुरू होते. मात्र गेल्या दोन वर्षांत कोबी बियाण्याचे दर व त्यामुळे रोपांची किंमत वाढली आहे. हा रोपांचा खर्च कमी करण्यासाठी आच्छादनाखाली गादीवाफ्यावर बियाणे पेरून रोपे तयार करतात. त्यामुळे रोपांवरील खर्चात १२ ते १५ हजारांची बचत शक्य होते. आताही वेळ व कामांचे नियोजन या प्रमाणे रोपवाटिकेतूनही रोपांची खरेदी करावी लागते.

माती परीक्षणाच्या अहवालानुसारच मातीतील कमतरता आणि पिकांची गरज जाणून वाढीच्या अवस्थेनुसार योग्य ती खते योग्य मात्रेमध्ये दिली जातात. त्यामुळे मालाचा आकार, रंग व चव सुधारल्याने व्यापारी थेट बांधावर योग्य दर देऊन खरेदी करतात.

पीक संरक्षणासाठी रासायनिक घटकांचा वापर मर्यादित केला जातो. त्याऐवजी जैविक निविष्ठांचा वापर करतात. पिवळे चिकट सापळे, प्रकाश सापळे यांचा वापर करतात. यातून खर्चात बचतीसोबतच रासायनिक अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादन साध्य होते.

बाजारपेठेच्या अभ्यासावर भर

१५ जून ते १ जुलै दरम्यान कोबीची लागवड केल्यास प्रतिकूल वातावरणामुळे गुणवत्ता वाढीसाठी अधिक व्यवस्थापन करावे लागते. पण माल बाजारात येतेवेळी आवक कमी असल्याने चांगला दर मिळतो. अनेक व्यापारी थेट बांधावर खरेदीसाठी येतात. तरीही कोबीची अधिक मागणी असलेला काळ, बाजार समित्यामध्ये होत असलेली आवक यांची सतत माहिती घेत राहतो. दर्जेदार शेतीमालाला दोन पैसे अधिकच मिळतात. कोबी, कलिंगड, हिरवी मिरची यांची व्यापाऱ्यांना जागेवर विक्री होते. तर कांद्याची बाजारातील आवक व दराच्या माहितीनुसार वणी (दिंडोरी), उमराणे (देवळा) येथे विक्री होते.

Vegetable Farming
Agriculture Success Story : आदिवासी पाड्यांवर महिलांनी घडवली धवलक्रांती

बाजारातील पत महत्त्वाची...

सामान्यतः एका पिकातून आलेल्या उत्पन्नातून पुढील हंगामातील पिकांच्या लागवडीच्या खर्चाचे नियोजन केले जाते. पण दरातील चढ-उतारामुळे कधी अपेक्षित फायदा होत नाही. अशा वेळी विविध बियाणे, कृषी निविष्ठा यांच्या खरेदीसाठी क्रेडिट महत्त्वाचे ठरते. बाजारामध्ये आपले क्रेडिट हे उत्तम आर्थिक व्यवहारावर ठरते. त्यातून निर्माण झालेली पत अडचणीच्या वेळी उपयोगी येते, असे संदीप सांगतात.

कमी काळात उत्पन्नासाठी कोथिंबीर...

सप्टेंबर आणि एप्रिल अखेर किंवा मे महिन्याचा पहिला आठवडा या कालावधीत एक एकरभर कोथिंबीर लागवड केली जाते. त्याची काढणी अनुक्रमे ऑक्टोबर आणि जून, जुलैमध्ये होते. या काळात बाजारात बऱ्यापैकी दर मिळून जातो. गेल्या वर्षी कमाल १३० रुपये प्रति किलो आणि किमान ७० रुपये दर मिळाला.

भांडवली गुंतवणूक व उत्पन्नाचे गणित

एक रुपया गुंतवणूक केल्यास त्या माध्यमातून किमान दीड रुपया कसा मिळेल, असा प्रयत्न असतो. निर्यात होत असलेल्या हिरवी मिरची, कलिंगड या पिकांची लागवड करताना प्रामुख्याने त्यासाठी खास मागणी असलेल्या वाणांची लागवड करतात. सोबतच उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. सामान्यतः अन्य शेतकरी एकरी सरासरी १५ ते १६ टनांपर्यंत उत्पादन घेत असताना नियमितपणे शेवाळे कुटुंबीय २५ टनांवर उत्पादन घेतात.

त्यामुळे दरातील चढ-उतारामध्येही तग धरणे शक्य होते. गेल्या तीन वर्षांत कोबीची काढणी सुरू झाल्यानंतर प्रति किलो २० रुपयांच्या खाली दर मिळालेला नाही. तीन वर्षांपूर्वी कोबीची आवक कमी असताना कमाल दर ३५ रुपयांपर्यंत दर मिळाला तरी एकंदरीत सरासरी मात्र १० रुपयांच्या दरम्यान आली होती. त्यामुळे खर्च किमान पातळीवर राखेल, त्यालाच फायदा होतो, असे संदीप सांगतात.

वार्षिक आर्थिक नियोजन

वर्षाला सर्व पिकातून साधारणतः ७ ते ८ लाख रुपये उत्पन्न हाती येते. अर्थात, यात वातावरणातील बदल, बाजारपेठेतील दरांची चढ-उतार, रोग-किडींचा प्रादुर्भाव यामुळे कमी जास्त होऊ शकते. एखादा हंगाम खराब जातो. अशा वेळी वर्षाचे नियोजन करण्याचा प्रयत्न असतो.

पुढील हंगामाचे नियोजन म्हणून १ लाखाची तरतूद करण्याचा प्रयत्न असतो.

घरात दोघांची मिळून चार मुले. त्यांच्या शिक्षणाचा खर्च २.५ ते ३ लाख रुपये.

घरखर्च (२ लाख रुपये.), विम्याचे हफ्ते (४० हजार रुपये.) व अन्य कौटुंबिक खर्च (१ लाख रुपये) आदी विचारात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करण्याचा प्रयत्न असतो.

शेवाळे कुटुंबीयांच्या पीक नियोजनासह आर्थिक उत्पन्नाचा ताळेबंद

पीक क्षेत्र (एकर) पीक कालावधी (दिवस) लागवड कालावधी एकरी उत्पादन सरासरी दर

(रुपये प्रति किलो) एकरी उत्पादन खर्च (रुपये) निव्वळ उत्पन्न (रुपये)

कोबी २ ७५ १५ ते १ जुलै २५ ते २७ टन १० ६० ते ७०

हजार १.९० लाख ते २.१० लाख.

रब्बी कांदा ३ १२० १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०० क्विंटल १० ते १५ ५० हजार १.५० लाख.

हिरवी मिरची (निर्यातक्षम) १ २४० १ फेब्रुवारी ते १ मार्च २० ते २५ टन ३५ ३ लाख रु.

(मजुरीसह) ३ ते ४ लाख.

कलिंगड १ ६० ते ७० १ फेब्रुवारी ते १ एप्रिल २५ टन १० १.१० लाख १ ते १.५ लाख.

खरबूज १ पीक कालावधी १ जानेवारी ते १५ मार्च १५ टन १८ १.१० लाख १ ते १.५ लाख.

संदीप शेवाळे, ९०९६७०४१४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com