Agriculture Success Story : आजच्या दिवसाला (ता. ८) नारळी पौर्णिमेचे वेगळे महत्त्व आहे. विशाल समुद्रकिनारपट्टी लाभलेल्या कोकणात हा सण वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. उत्सव, संस्कृती आणि शेकडो वर्षाची परंपरा टिकविण्याचे काम त्या माध्यमातून होत असते. मच्छीमार या दिवशी नारळ अर्पण करून समुद्र देवतेला प्रार्थना करतात.
नव्या मासेमारी हंगामाचा प्रारंभ चांगला व्हावा अशा हेतूने समुद्राला गाऱ्हाणे घातले जाते. त्या दिवसांपासून खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरुवात होते. याशिवाय या सणाला नारळ लढविण्याच्या विविध स्पर्धा देखील विविध ठिकाणी घेतल्या जातात.
वायंगणीची मासेमारी संस्कृती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हे निसर्गसौंदर्य लाभलेले गाव आहे. पश्चिमेला अथांग अरबी समुद्र, दक्षिणेला खाडी तर पूर्वेस व उत्तरेस घनदाट दाटी असलेला डोंगर असा सभोवताल गावाला मिळाला आहे. फळबाग लागवड, भाजीपाला आदी पिकांसाठी ते ओळखले जाते. वायगंणी- तळेकरवाडी मिळून २२५० च्या आसपास लोकसंख्या आहे.
समुद्रकिनारा असल्याने येथील बहुतांशी ग्रामस्थांचा मासेमारी हाच मुख्य व्यवसाय आहे. साधारणपणे ३५० हून अधिक कुटुंबांचे अर्थकारण त्यावरच चालते. काहीजण पारंपरिक पद्धतीने तर काही आधुनिक पद्धतीने मासेमारी करतात. एक ऑगस्ट ते ३० मे हा मासेमारीचा कालावधी असतो.
पावसाळ्यातील दोन महिने व्यवसाय पूर्ण बंद असतो. समुद्रात वेळोवेळी निर्माण होणारी वादळी स्थिती, मासेमारीचे बदलते स्वरूप या माध्यमातून अनेक संकटे अलीकडील वर्षात उभी राहिली आहेत. दिवसभर समुद्रात राहिल्यानंतर तुटपुंजी मासळी घेऊनही अनेकदा परतावे लागते. त्यामुळे हा बेभरवशाचा व्यवसाय झाला असून मच्छीमारांनी शेतीच्या रूपात दुसरा पर्याय शोधला आहे.
नारळ उद्योगाचा पर्याय
मासेमारी हा बेभरवशाचा व्यवसाय झाला असल्याने मच्छीमारांनी शेतीचा आधार शोधला आहे. डोंगरदऱ्या, गर्द वनराजी आणि त्यातील झाडेझुडपे बाजूला करीत शेतकऱ्यांनी नारळ लागवड सुरू केली. टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ होऊ लागली. नारळ उत्पादन मिळू लागल्यानंतर थेट विक्रीवर ग्रामस्थांनी भर दिला.
गावातील शेतकऱ्यांना नारळ विकास मंडळाच्या माध्यमातून नारळ प्रकिया उद्योग प्रशिक्षणाचीसुविधा मिळाली. विविध योजनांचा प्रसार त्यांच्यापर्यंत झाला आहे. नारळ काढणी, सोलणी यातून रोजगार निर्माण झाला. गावातील काही शेतकरी त्यापुढे जाऊन नारळाच्या झावळ्यांपासून झाडू, सोडणापासून कोकोपीट आदी उत्पादने तयार करू लागले. त्याला बाजारपेठही मिळवू लागले.
काहींनी काथ्यावर पारंपरिक पद्धतीने प्रकिया करून दोरी तर काहींनी विविध उत्पादनांची निर्मिती सुरू केली आहे. गावातील एका गटाला दोरीनिर्मितीचे यंत्रही योजनेतून उपलब्ध करून दिले आहे.
गावातच काही नारळ व्यापारी तयार झाले. काही जण नारळ सुकवून तेल निर्मिती करतात. नारळाला घाऊकमध्ये प्रति नग २० ते २५ रुपये, तर थेट विक्रीतून ३० ते ४० रुपयांपर्यंत दर मिळतो. एकूणच नारळ उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे
आश्वासक उलाढाल
केवळ नारळाच्या शेतीवर अवलंबून राहण्यावर मर्यादा होत्या. अशावेळी गावातील शेतकऱ्यांनी आंबा, काजू लागवडीवरही भर दिला. त्यातून काही वर्षांत या दोन्ही फळपिकांमध्ये शेकडो हेक्टरने वाढ झाली आहे. गावात आजमितीला सुमारे १०६ हेक्टरच्या दरम्यान नारळ क्षेत्र आहे.
स्थानिक जातींसह बाणवली, टीडी, प्रताप आदी वाणांची लागवडही दिसून येते. आंब्याचे १५० हेक्टरच्या दरम्यान, तर काजूचे १५३ हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. वेंगुर्ला सात, वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला नऊ अशा काजूच्या वाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. भाजीपाला पिकांमुळे ताजा पैसा हाती येऊन दैनंदिन खर्च भागविणे शक्य झाले.
घरी देखील सेंद्रिय अन्न उपलब्ध होऊ लागले. आता बहुतांश शेतकरी भाजीपाला घेतात. या शिवाय सुपारी, कोकम, सुरंगी, भात, नाचणी आदी पिकांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांनी शेतीला आधार शोधला आहे. गावापासून अडीच- तीन किलोमीटवर वेंगुर्ले शहराची बाजारपेठ आहे. येथे विविध शेतमालाची शेतकरी थेट विक्री करतात.
व्यापारी गावात येऊन नारळ खरेदी करतात. काही शेतकरी वाशी मार्केट पसंत करून तेथे आंबा पाठवितात. गावातील अनेक आंबा उत्पादक कोल्हापूर, सांगली, गोवा येथेही आंब्याची विक्री करतात. कोरोना संकटानंतर थेट विक्रीचे तंत्र शेतकऱ्यांना चांगले अवगत झाले आहे.
नारळ, काजू, आंबा या तीनही पिकांपासून वर्षाला प्रत्येकी दोन ते तीन कोटीपर्यंत उलाढाल होत असावी. सुमारे साडेतीनशेच्या आसपास मच्छीमार असावेत. पारंपरिक पध्दतीच्या मासेमारी व्यवसायात आठ लाखांच्या दरम्यान तर आधुनिक नौकांचा वापर होणाऱ्या या व्यवसायातून त्याहून अधिक उलाढाल होते.
पर्यावरण व कासव संवर्धन
पर्यावरण संवर्धनात अग्रेसर अशी वायंगणीची ओळख आहे. येथील सुहास तोरसकर, चंद्रशेखर तोरसकर, प्रकाश साळगावकर यांच्यासह सुमारे १३ पर्यावरणप्रेमी कासव संवर्धनाचे कार्य अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने करीत आहेत.
दरवर्षी चारशेहून अधिक घरट्यांचे संवर्धन करण्याबरोबर दोन हजारांहून अधिक कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्याचे काम ते करतात.कांदळवन कक्षांकडून या पर्यावरणप्रेमीना प्रति घरटे दोन हजार रुपये देण्यात येतात. या माध्यमातूनही गावातील काही लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो. या व्यवसायातून वार्षिक सात लाखांपर्यंत उलाढाल होते. त्यातील उत्पन्नातून काटकसर व आर्थिक नियोजन करीत मुलांना उच्चशिक्षण देणे शक्य झाले. आता मुलगा आणि मुलगी चांगल्या ठिकाणी नोकरी करून स्थिरावले आहेत. पक्के घरही मी बांधले आहे.विजय धोंडू कोंडुरकर
पूर्वी मी मासेमारी करीत असे. परंतु गावात नारळ उत्पादनाकडे कल वाढल्यानंतर मी देखील त्या व्यवसायात उतरलो. या गावासह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून नारळ खरेदी करू लागलो. सुरुवातीला ग्राहकांना थेट विक्री करायचो. व्यापार वाढत गेला तशी काही वर्षे घाऊक विक्री करून त्यात स्थिरावलो आहे.गणेश यशवंत कोचरेकर
नारळाची सोडण पाण्यात भिजत ठेवून त्यापासून पारंपरिक पद्धतीने दोरी तयार करतो. या व्यवसायात अनेक वर्षांचे सातत्य निर्माण केले आहे. घरातील अन्य कामे करून हा व्यवसाय साधता येतो. त्यातून घरखर्चाला चांगला हातभार लागतो.सुभाष काशिनाथ मुणनकर
माझी नारळाची ८०० झाडे आहेत. सोडणांपासून कोकोपीट, खत, काथ्यांपासून कुंड्या, पायपुसणी आदीची निर्मिती करतो. त्यातून उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मी तयार केले आहे.समीर खानोलकर ९२०९११८५३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.