Coconut Farming : पारंपरिक माडी व्‍यवसायावर संकट

Bhandari Community : भंडारी समाजातील तरुण पिढीची इतर व्‍यवसायांकडे ओढ
Coconut Farming
Coconut FarmingAgrowon
Published on
Updated on

Shrivardhan News : श्रीवर्धन ः श्रीवर्धन तालुक्यातील भंडारी समाजाचा पारंपरिक, तसेच उदरनिर्वाहाचे साधन असणारा आरोग्यदायी माडी पेयाचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. निसर्ग चक्रीवादळात ६० टक्के माड भुईसपाट झाल्यामुळे या व्यवसायाला मंदी आली आहे.

त्‍यातच भंडारी समाजातील तरुण पिढीने माडी उतरवणे या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरवल्याने श्रीवर्धनची प्रसिद्ध अशी आरोग्यदायी, चविष्ट व गोड माडी आता इतिहासजमा होण्याच्‍या मार्गावर आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बहुतांश भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा आरोग्यदायी माडी पेय तयार करणे हा आहे.

Coconut Farming
Dashaparni Extract : शेतकरी गटाकडुन दशपर्णी अर्क निर्मितीचा प्रयोग

नारळाच्या माडावरील पोय (फुलोऱ्याच्या कोंब) हा औत हत्याराच्या सहाय्याने कापून झाल्यावर त्‍या ठिकाणावर लाल मातीचे किंवा प्लॅस्टिक मडके लावले जाते. त्‍यानंतर पोयातून बाहेर येणारा द्रव जमा करून त्‍यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया संपूर्ण झाल्यावर तयार माडी ड्रममधून शहरी भागात निर्यात केली जाते. अथवा बाटल्यांमधून स्टाॅलवर विक्रीकरिता ठेवली जाते. साधारण एका माडापासून दर महिन्याला ६० ते ७० लिटर माडीचे उत्पादन होते. श्रीवर्धन येथील आरोग्यदायी माडी पेयाला इतर तालुक्यातून, तसेच शहरातून चांगली मागणी आहे.

सद्यपरिस्थितीत हातात औत, सायकलला लावलेली कुंडी व घडी, कंबरेला बांधलेला आकडा व कापडी पिशवीत जास्वंदीची पाने ठेवून माडावरचा पोय कापणारा व माडी पेय उतरवणारा भंडारी समाजातील तरुण तालुक्यात कमी झाला आहे. या समाजातील तरुणांनी पूर्व परंपरागत व्यवसायाकडे पाठ फिरवून इतर उद्योग, व्यवसायाकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्‍यामुळे भविष्यात श्रीवर्धन येथील आरोग्यदायी माडी पेय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

अशी काढतात आरोग्यदायी माडी

माड बाजला अर्थात माडावर कोंब येण्यास सुरुवात झाली की, माडी पेय काढण्यास सुरुवात करण्यात येते. माडीसाठी मडके शक्यतो संध्याकाळी लावतात. फुलोऱ्याला जो कोंब असतो त्याला पोय म्हणतात. पोय तयार झाली की ती उलगडू (फुलू नये) नये याकरिता तिला दोरीने घट्ट बांधण्यात येते. पोयीच्या टोकाला औताने (कोयता) आडवी चीर देत टोकाकडचा भाग खालील बाजूने निमुळत्या आकारात कापला जातो. जेणेकरून द्रव खालील बाजूस पाझरेल.

हे सर्व झाल्यावर पोयीवर सांबर शिंगाने ठोकण्यात येते. यानंतर सावरीचा चिकट बोंड कापलेल्या ठिकाणावर फिरवतात. या प्रक्रियेमुळे पोयीतून माडीचा फवारा न उडता खाली लटकलेल्या मडक्यात माडी पडते. मडक्याचे तोंड पोयच्या टोकाला लावत टांगले जाते. यामुळे रात्रभर माडाच्या पोयीतून येणारा द्रव मडक्यात जमाहोतो. माडी पेयाबाबतीत असा समज आहे की या पेयाने नशा येते. ही समज चुकीची असून शुद्ध माडीने कधीच नशा येत नाही, या उलट माडी पेय हे आरोग्यदायी असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com