Sericulture
Sericulture  Agrowon
यशोगाथा

Sericulture : रेशीम शेतीतून गुंफले प्रगतीचे धागे

माणिक रासवे

Reshim Udyog Success Story नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरकडा येथील वर्षा आणि सुधाकर पंडित हे दांपत्य परभणी येथील विभागीय बीज प्रमाणीकरण कार्यालयांतर्गत कृषी सहायक म्हणून हिंगोली जिल्ह्यात कार्यरत आहेत.

शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे पंडित दांपत्याला पहिल्यापासूनच शेतीची (Agriculture) आवड आहे. २००२ मध्ये त्यांनी डोंगरकडा जवळील देववाडी शिवारात पाच एकर पडीक, माळरान खरेदी केले.

शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी (Agriculture Irrigation) विहीर देखील खोदली. सुधाकर यांनी सुरवातीचा हळद, एरंडी, झेंडू लागवडीस सुरुवात केली. शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुरुवातीला कुक्कुटपालन (Poultry Farming) आणि नंतर शेळीपालन (Goat Farming) हे व्यवसाय करून पाहिले.

परंतु या दोन्ही व्यवसायांत त्यांचा फारसा जम बसला नाही. आर्थिक नुकसान सोसावे लागले. दरम्यानच्या काळात परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुभवातून पंडित दांपत्याने शाश्‍वत उत्पन्न देणारी रेशीम शेती करण्याचे ठरविले.

रेशीम शेतीला सुरुवात ः

पंडित कुटुंबाने २०१२ मध्ये दीड एकरावर तुती लागवड केली. कुक्कुटपालनासाठी तयार केलेली ३० फूट बाय १५० फूट आकाराची शेड तयार होती. यामध्ये रेशीम कीटक संगोपनगृह तयार केले. पहिल्या वर्षी प्रत्येकी २०० अंडीपुंजांपासून तीन बॅचमध्ये पाच क्विंटल रेशीम कोष उत्पादन मिळाले.

दुसऱ्या वर्षी तुती उत्पादनात वाढ झाल्यामुळे प्रत्येकी २०० अंडीपुंजाच्या चार बॅच घेतल्या. त्यातून सहा क्विंटल कोष उत्पादन मिळाले. रेशीम कोष उत्पादनातून खात्रीशीर उत्पन्न मिळू लागल्यामुळे २०१४ मध्ये तुती लागवड क्षेत्राचा विस्तार केला.

आणखी तीन एकरांवर तुती लागवडकरून रॅकची संख्या वाढवली. त्यानंतर आता वर्षभराच्या कालावधीत प्रत्येकी ३०० अंडीपुंजाच्या ६ ते ७ बॅच घेतल्या जातात. वर्षाकाठी दहा क्विंटल कोष उत्पादन मिळाले.

कोरोना लॉकडाउनमध्ये कोषाचे दर कमी झाल्याने आर्थिक नुकसान झाले. परंतु पंडित दांपत्याने वर्षभर रेशीम कोष उत्पादनातील सातत्य ठेवले आहे.

शेती व्यवस्थापनासाठी त्यांनी एक सालगडी आहे. रेशीम शेती, तुती रोपवाटिकेसह अन्य शेती कामांसाठी पंडित कुटुंबाने वर्षभर दहा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पंडित दांपत्य सध्या नांदेड येथे वास्तव्यास आहे.

सुधाकर यांच्या आई रेश्माबाई या शेतातील घरामध्ये राहातात. पंडित दांपत्य प्रत्येक शनिवार आणि रविवार तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी पूर्णवेळ शेतावर असतात.

तुती बागेस पाणी, खते देणे, रेशीम कीटकास खाद्य देणे, कोष काढणीसह अन्य कामे मजुरांच्या सोबत करतात. या मजुरांना पुढील आठवड्यातील कामकाजाचे सविस्तर नियोजन दिले जाते.

शेतीविषयक उपक्रमामध्ये सहभाग ः

पंडित दांपत्याच्या पुढाकारातून देववाडी येथे पाच शेतकरी गट स्थापन झाले आहे.या गटांना एकत्रित करून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे.

पंडित दांपत्य शेतावर शेतकरी मेळावे, प्रशिक्षणाचे आयोजन करतात. गावातील विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. रेशीम रत्न पुरस्कार तसेच अन्य पुरस्काराने पंडित यांचा गौरव करण्यात आला आहे.

तुती बागेचे व्यवस्थापन ः

१) व्ही १ जातीची ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर लागवड.

२) बागेस ठिबक संचाव्दारे पाणी पुरवठा. प्रत्येक छाटणीनंतर १५ः १५ः १५ तसेच डीएपी खताची शिफारशीत मात्रा.

३) काटेकोर व्यवस्थापनातून तुतीच्या सकस पाल्याचे उत्पादन. परिणामी दर्जेदार कोष उत्पादन.

रेशीम कीटक संगोपनगृह ः

१) पुरेशा प्रमाणात तुती पाने उपलब्ध होत असल्यामुळे वर्षभर कोष उत्पादन.

२) हवामानानुसार संगोपनगृहात रेशीम किटकांच्या वाढीसाठी आवश्यक तापमान राखण्यासाठी विविध उपाय योजना.

३) उन्हाळ्यात शेडमध्ये फॉगर्सच्या साहाय्याने तापमान नियंत्रित केले जाते. उन्हाळ्यामध्ये कोष उत्पादन कमी मिळते. परंतु दर चांगले मिळून आर्थिक फायदा होतो.

कोष विक्रीचे नियोजन ः

१) सुरुवातीच्या काळात कर्नाटकातील रामनगरम येथील मार्केटमध्ये कोष विक्री केली जात असे. त्यानंतर तेलगंणातील जनगाव येथे कोष विक्री.

२) आता पूर्णा (जि. परभणी) आणि जालना येथील रेशीम मार्केटमध्ये कोषाची विक्री. वर्षभरात रेशीम कोषांच्या विक्रीतून दरवर्षी चार लाखांची उलाढाल.

तुती रोपवाटिकेची जोड ः

तुती रोपांची मागणी लक्षात घेऊन पंडित यांनी २०१९ मध्ये दोन एकरावर तुती रोपवाटिका सुरू केली. जानेवारी आणि सप्टेंबर अशी दोन वेळा रोपनिर्मिती केली जाते.

वाफे तयार करून त्यामध्ये सहा इंच अंतरावर तुती बेण्याच्या खुटांची लागवड केली जाते. दोन एकरांतून तुतीच्या २ ते २.५ लाख रोपांची उपलब्धता होते. रोपांच्या जुड्या बांधून मागणीनुसार पुरवठा केला जातो.

विविध शासकीय योजनांतर्गत अनुदान मिळत असल्यामुळे रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे तुती रोपांची मागणी वाढली आहे. पंडित यांच्याकडून बीड, लातूर, उस्मानाबाद, जळगाव, यवतमाळ यांसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तुती रोपांचा पुरवठा करण्यात येतो.

यंदा झारखंड राज्यामध्ये त्यांनी तीन लाख रोपांचा पुरवठा केला आहे. नागपूर जिल्ह्यातूनही रोपांना चांगली मागणी आहे. रोप विक्रीतून चार लाख रुपयांची उलाढाल होते.

कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क शेतकरी

पंडित दांपत्य हे तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क शेतकरी आहेत. केव्हीकेतर्फे आयोजित पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत एक महिना कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केले. रेशीम शेतीमधील स्वयंचलनाबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन पंडित यांच्या शेतावर करण्यात आले होते.

केव्हीकेचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, कीटकशास्त्र विशेषज्ञ अजयकुमार सुगावे, उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, कृषिविद्या विशेषज्ञ राजेश भालेराव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, तत्कालीन जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी. एस. ठावरे, स्वप्नील तायडे, सध्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांचे त्यांना नेहमी मार्गदर्शन मिळते.

रेशीम संचालक दिलीप हाके यांनी देखील पंडित यांच्या शेतावर येऊन रेशीम उद्योगाची पाहणी केली आहे.

संपर्क ः सुधाकर पंडित ः९३७०५७५१४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT