Sericulture : जावांच्या एकीतून होतेय कुटुंबाची प्रगती

कुटुंबांच्या एकीमध्ये महिलाच महत्त्वाची भूमिका निभावतात. देवगाव (जि. औरंगाबाद) येथील सौ. पार्वती सदाशिव गिते व सौ. शारदा मदन गिते या दोन जावांनी अंडीपुंजासाठी रेशीम कोषांच्या उत्पादनातून एकत्रित कुटुंबाच्या अर्थकारणाला मोठा आधार देत आहेत.
Women Story
Women StoryAgrowon

Women Farmer Story : देवगाव येथील गोपीनाथ गिते यांना सदाशीव, मदन आणि उद्धव अशी तीन मुले. त्यात उद्धव हे वाहनचालक म्हणून कार्यरत असून, सदाशीव व मदन हे वडिलांसोबत १४ एकर शेतीची जबाबदारी सांभाळतात.

तिन्ही भावंडांची मुले औरंगाबादला शिक्षणासाठी ठेवलेली असून, या नातवंडांसोबत गोपीनाथ यांच्या पत्नी सखुबाई राहतात. १४ एकर शेतीपैकी ४ एकर कपाशी, ३ एकर मोसंबी, एक एकर चारा पीक, २ एकर बाजरी व रब्बी ज्वारी, १ एकर हिरवी मिरची व तीन एकर तुती लागवड आहे.

सिंचनासाठी तीन विहिरी, दोन शेततळी असून, संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली (Agriculture Irrigation) आणले आहे. सोबतच दोन गायी, दोन म्हशी यांच्यापासून पारंपरिक दुग्ध व्यवसाय (Dairy Business) केले आहे.

वर्षात घेतात ६ ते ७ बॅच

२०१९ मध्ये दोन एकर तुती लागवडीपासून रेशीम उद्योगाला (Silk Farming) सुरुवात केली. चॉकी आल्यापासून संगोपन व कोष उत्पादनाची संपूर्ण जबाबदारी सौ. पार्वती व सौ. शारदा सांभाळतात. गिते कुटुंबीयांनी गावातील रेशीम कोष उत्पादक शहादेव ढाकणे यांच्याकडून रेशीम कोष उत्पादनाचे तंत्रज्ञान समजून घेतले.

पावसाळ्यात चॉकी मिळाल्यापासून एक बॅच साधारणतः १८ ते २१ दिवसांत, हिवाळ्यात २४ ते २५ दिवसांत, तर उन्हाळ्यात २० ते २२ दिवसांत बाजारात जाते. तीन एकरांतील तुती लागवड ही टप्प्याटप्प्याने केली आहे.

जून ते एप्रिलदरम्यान साधारणत: २०० ते २५० अंडीपुंजाच्या प्रत्येक बॅचमध्ये चार ते सहा दिवस अंतर ठेवून सहा ते सात बॅच घेतल्या जातात. १०० अंडीपुंजला ७० ते १०० किलोपर्यंतचे कोष उत्पादन त्या मिळवतात. उत्पादित रेशीम कोषाला ४० हजार ते १ लाख १५ हजारांपर्यंत प्रति क्‍विंटल असा दर मिळाला आहे.

Women Story
Egg Production : ‘एसपीईझेड’ वाढवेल अंडी उत्पादन

अंडीपुंजसाठीच्या कोषाचेही उत्पादन

रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या अंडीपुंज निर्मितीत मराठवाडा स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने रेशीम संचालनालयाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात महिको या बीजोत्पादक कंपनीने ४० शेतकऱ्यांची अंडीपुंजसाठी लागणाऱ्या कोषाचे उत्पादन करण्यासाठी निवड केली आहे.

त्यामध्ये गिते यांचाही समावेश आहे. त्यातही पार्वती व शारदा यांचा वाटा महत्त्वाचा ठरतो. आधीचे सर्व कोष उत्पादन इतर कोष उत्पादकांप्रमाणे घेणाऱ्या गिते यांनी अलिकडील दोन बॅचमध्ये रेशीम कोषासाठी लागणाऱ्या अंडीपूंजाचे उत्पादन घेतले आहे.

याची २७ ते २८ दिवसांत एक बॅच होते. याला तुतीचा पाला कमी लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी, तर दर अधिक मिळतो. त्यांच्या रेशीम कोषांना सुमारे १ लाख रुपये प्रति क्‍विंटलपर्यंतचा दर मिळू लागला आहे. एकूणच अर्थकारण बळकट होत आहे.

वर्षनिहाय रेशीम कोष उत्पन्न (रुपये)

२०१९-२० .....९५ हजार (एक बॅच)

२०२०-२१ .....५ लाख (६ बॅच)

२०२१-२२ .....७ लाख (७ बॅच)

२०२२-२३ .... ५ लाख ५० हजार (५ बॅच)(आणखी दोन बॅच होतील)

...अशी सांभाळतात जबाबदारी

सौ. पार्वती व सौ. शारदा या दोघी जावा एकत्रित कुटुंबाचा कणा आहे. त्या रेशीम उद्योगात शेडचे निर्जंतुकीकरण, अळ्यांचे संगोपन करताना चॉकी आल्यानंतर त्याचे समप्रमाणात शेडमधील ट्रेमध्ये वाटप करणे, शेडमधील तापमान नियंत्रित ठेवणे, गरजेनुसार पाला टाकत राहणे, अळी कोषावर आल्यावर चंद्रिका टाकणे, त्यानंतर त्यावर पेपर टाकणे, त्यानंतर सातव्या दिवशी कोष वेचणे, बॅच संपली की पुन्हा शेडचे निर्जंतुकीकरण करणे.

तुती मशिनने कट करून काड्या बाहेर टाकणे, तुती बागेत खुरपण करून घेऊन नवीन फुटवे येतील अशी व्यवस्था करणे, खत सोडण्यासाठी मदत करणे इ. कामे करतात. सोबतच अन्य शेतीतील निंदन, खुरपण, कापूस वेचणी, दुभत्या जनावरांच्या चारा- पाण्याची सोय, मिरची तोडणी, पिकांची कापणी, मळणी अशा कामांतही त्यांचा कुटुंबातील पुरुषांच्या बरोबरीने हातभार असतो.

बचत गटाचेही करतात काम

पार्वती व शारदा गिते या दोन्ही जावांनी बचतीचे महत्त्व ओळखले आहे. त्यामुळे दोघीही बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत. पार्वती गिते या पंचमुखी स्वयंसेवा समूह गटाच्या जवळपास तीन वर्षांपासून सदस्य आहेत. २०० रुपये प्रतिमहिना बचत करतात.

शारदा गिते या पंचायत समितीच्या माध्यमातून गावात सुरू केलेल्या ११ महिला बचत गटाच्या ‘सीआरपी’ म्हणून काम पाहतात. या गटांचे सर्व व्यवहार चोख आणि पारदर्शक राहतील, याची जबाबदारी सांभाळतात.

त्यापोटी त्यांना दरमहा ३ हजार रुपये मिळतात. सोबतच शिवणकाम व रेडिमेड कपड्यांची गावपातळीवरच विक्रीही करतात. यातून दरमहा १० ते १४ हजार रुपये मिळतात. अशा प्रकारे या दोघी जावांची एकी गिते कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावते आहे.

Women Story
Poultry Farming : ‘परसबागेतील कुक्कुटपालन’व्यवसायाद्वारे करा अंडी उत्पादन

महत्त्वाचे

१) ‘ॲग्रोवन’तर्फे पार्वती सदाशिव गिते यांचा प्रगतिशील युवा शेतकरी पुरस्काराने सन्मान.

२) दिवसाला १० ते १२ लिटर दुधाची स्थानिक घरगुती विक्री. त्यातून शेतीशी संबंधित छोटेमोठे खर्च निघतात.

३) हिरव्या मिरचीच्या विक्रीतून दर आठवड्याला सुमारे दोन ते तीन हजार मिळतात. त्यातून कुटुंबाचा वरखर्च भागतो.

शारदा गिते, ९३५६५५७६९४, पार्वती सदाशिव गिते, ८८८८५२४०७४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com