Onion Farming  Agrowown
यशोगाथा

Agriculture Technology : सुधारित तंत्रातून वाढले उत्पादन ; अन् दर्जाही

 गोपाल हागे

Agriculture Improvement Technology : अकोला जिल्‍ह्यात रब्बी हंगामात कांद्याचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा हे तालुके या पिकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हे लक्षात घेता पिकाची उत्‍पादकता व दर्जा वाढविण्‍यासाठी अकोला येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) व बार्शीटाकळी तालुका आत्मा विभाग यांनी संयुक्त प्रकल्प राबविण्याचे ठरविले.

यात सहा सत्रांमध्ये शेतीशाळा घेण्यात आल्या. केव्हीकेतील उद्यानविद्या विषय विशेषज्ज्ञ गजानन तुपकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. लागवडीपूर्व ते लागवड, काढणी, साठवणुकीपर्यंत सर्व तंत्रज्ञान यात देण्यात आले. बियाणे निवड, लागवडीचे अंतर, एकरी रोपांची संख्या, पाणी, खते, कीडनाशकांची फवारणी, वाढरोधकांचा वापर अशा विविध बाबी मुद्देसूदपणे सांगण्यात आल्या. शेतकऱ्यांकडे तशी प्रात्यक्षिकेही घेण्याचे नियोजन झाले.

समस्यांचा झाला विचार

पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेतकरी कांदा उत्पादन घ्यायचे. याच अनेक समस्या त्यांना जाणवायच्या. घरच्या बियाण्याचा वापर व्हायचा. उत्‍पादन खर्च अधिक असायचा. बीज आणि रोपेप्रक्रियेचा अभाव असायचा. पाण्‍याचा गरजेपेक्षा जादा वापर व्हायचा. अतिरिक्त व अवेळी नत्राचा वापर व्हायचा. साठवणुकीत ३० ते ४० टक्‍के कांदा सड व्हायची. काढणीपूर्व व्यवस्थापन सुयोग्य नसायचे.

सुधारित तंत्रज्ञानाचा झाला वापर

प्रकल्पांतर्गत समस्यांचा विचार करून भीमा शक्ती, पुणे फुरसुंगी आदी अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर करण्यावर भर देण्यात आला. रोपालागवडीपूर्वी कार्बोसल्‍फान व कार्बेन्‍डाझीम यांची प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे फूलकिडे व करपासारख्या बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध करता आला. माती परिक्षण अहवालानुसार खतांचा कटाक्षाने वापर झाला.

काही शेतकरी पाटसरी पद्धतीने वाफा भरेपर्यंत तुडूंब पाणी देत होते. ही पद्धत बदलून तुषार सिंचनाचा वापर सुरू केला. त्यातून दर्जा चांगला वाढल्याचे दिसून आले. आर्द्रता कमी राहिल्याने किडी-रोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले.

पाण्‍याची ३० ते ४० टक्के बचत झाली. खुल्या पद्धतीने पाणी देणे बंद केले. काढणीपूर्वी २० दिवस आधी काजळी रोखण्‍यासाठी कार्बेन्डाझीमची एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी घेतली. काही शेतकऱ्यांनी विद्राव्‍य खतांचा वापर केला. रुंद वरंबा सरी पद्धत, कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क अधिक स्टिकरचा वापर, चिकट सापळे आदी बाबींचाही यात वापर झाला.

उत्पादनवाढीचे शेतकरी अनुभव

वाघजाळी येथील कांदा उत्पादक गजानन जयराम शेंडे म्हणाले की

शेतीशाळेतून नवे तंत्र मिळाले. पूर्वी खताचे आणि पाण्याचे नियोजन पारंपारिक पद्धतीने करायचो. शेतीशाळेत या दोन्ही बाबींचा

कार्यक्षम वापर कसा करावा हे शिकलो. यावर्षी पिकाची वाढ खूपच चांगली आढळली. शेतीशाळेत सांगितल्याप्रमाणे विद्राव्य खतांचा आणि वाढरोधकांचा वापर केला. त्याचा खूप फायदा दिसून आला. पूर्वी एकरी ४० हजारांपर्यंत होणारा खर्च यंदा ७ ते ८ हजार रुपयांनी कमी झाला. पूर्वी

एकरी ८० पासून ते १२० क्विंटलपर्यंत मला उत्पादन मिळायचे. तीन-चार वर्षांपूर्वी याहीपेक्षा अधिक उत्पादन मिळत होते. मात्र मध्यंतरी वातावरण बदल व किडी-रोगांमुळे ते घटले होते. यावर्षी शेती शाळेतील मार्गदर्शनामुळे एकरी १७० ते १८० क्विंटलपर्यंत पोचणे शक्य झाले.

सुमारे ७० टक्‍के कांदा ‘ए’ ग्रेडचा होता.

गजानन शेंडे- ९०९६१६३१७५

येथील अभय शेंडे म्हणाले की मागील रब्बीत २० एकरांत कांद्याची लागवड होती. पूर्वी लागवडीवेळी मर्यादित रासायनिक खत द्यायचो. यंदा सुपर फॉस्‍फेट, गंधक, पोटॅश यांचा वापर केला. रोपप्रक्रिया केल्‍याने फूलकिडे कमी दिसले. पूर्वी लागवडीनंतर सातव्या दिवशी पाणी द्यायचो. यंदा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वाफसा अवस्‍थेत पाणी दिले. कांद्याच्या आकारमानात चांगली वाढ दिसली. जोड कांद्याचे प्रमाण नगण्य दिसून आले. पूर्वी उत्पादन १०० ते १२० क्विंटलच्या दरम्यान मिळायचे. मध्यंतरी हवामानाच्या परिस्थितीमुळे यात घसरण देखील झाली. पण यंदा १५० ते

१८० क्विंटल उत्पादनापर्यंत पोचणे शक्य झाले.

अभय शेंडे - ९०९६१६३१७५

पूर्वी नत्राचा आणि पाण्याचा अधिक वापर केल्याने कांदासड व्हायची. प्रकल्पात नवीन वाणा व अन्नद्रव्य व्यवस्थापन शिकायला मिळाले. पिकात चिकट सापळे लावण्याचे महत्त्वही समजले.
राजेश शेंडे, कांदा उत्पादक
कांदा पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र असल्याने शेतीशाळेसाठी वाघजाळी गावाची निवड केली. प्रत्येक सत्रात शेतकऱ्यांची चांगली उपस्थिती होती. ते आपल्या प्रश्नांचे निरसनही चांगल्या प्रकारे करून घ्यायचे.
मुरली इंगळे, प्रकल्प संचालक (आत्मा), अकोला. अर्चना पेठे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा (बार्शीटाकळी)
शेतीशाळा हे सुधारित लागवड तंत्रज्ञान प्रसाराचे अतिशय प्रभावी माध्यम आहे. यात रोपवाटिकेपासून ते काढणीपश्‍चात तंत्रापर्यंत प्रत्‍येक बाब शेतकऱ्यांना समजावून दिली. त्यातून कांद्याचे एकरी उत्पादन व त्याचा दर्जाही वाढण्यास मदत झाली.
-गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), केव्हीके अकोला, ८२७५४१२०६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT