Ancient Navigation: कोणत्याही प्रदेशाचा किंवा अगदी जगाचा इतिहास पाहिला तर असे समजले की ज्यांनी नव्या वाटा, रस्ते, मार्ग शोधले, तेच इतिहास घडवू शकले. त्यामुळेच तर नवनवे प्रदेश शोधणारे कोलंबस, वास्को, कॅप्टन कुक यांची इतिहासात दखल घेतली जाते. महत्त्वाचे म्हणजे हे एकूणच मानवजातीसाठी खूप उपयुक्त ठरले. कारण त्यामुळे जग जवळ आले. एकमेकांशी संवाद सोपा झाला. प्राणी-वनस्पती, वस्तू, तंत्रज्ञान, विविध पद्धती, संस्कृती, आचार-विचार अशा असंख्य गोष्टींची देवाणघेवाण सहज होऊ शकली. म्हणून तर माणसाच्या इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या गोष्टींमध्ये नव्या वाटा आणि मार्गांचा समावेश करावाच लागेल..वाटा-रस्ते-मार्ग... ही या वेळच्या ‘भवताल’च्या दिवाळी विशेषांकाची थीम होती. त्याचे नियोजन, संपादनकरत असताना याबाबत कितीतरी गोष्टी समोर आल्या, अनेक बाबींचा उलगडा झाला, नवे काही शिकता आले. त्यातून त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली. त्याबाबत व्यक्त झाल्यावाचून राहवले नाही, म्हणून ही मांडणी..हे एक उदाहरण पहा. काळ आहे पंधराव्या शतकाच्या अखेरचा. वर्ष- १४९७. युरोपातल्या मंडळींना भारतात पोहचायचं होतं. इथल्या अनेक गोष्टी त्यांना हव्या होत्या. त्यात मसाल्याचे पदार्थ (मिरी, पिपळी, आलं, वेलदोडे, हिरडा-बहेडा), लाकूड (शिसव, साग, चंदन), काही धातू, काही मौल्यवान खडे, विविध प्रकारचं कापड, तेलं, वन्य प्राणी यांचा समावेश होता. मसाल्याच्या पदार्थांना तर पिढ्यानपिढ्या मागणी होती, अगदी इसवी सनाच्या आधीपासून. पंधराव्या शतकात बराचसा व्यापार जमीनमार्गे सुरू होता..हा व्यापार तुर्कस्तानात असलेल्या कॉन्स्टन्टिनोपल अर्थात इस्तंबूल मार्गे चालायचा. त्यामुळे तिथे कोणाची राजवट आहे यावर बरंच काही अवलंबून असे. त्यात युरोप आणि भारत यांच्यात अरबी व्यापारी हा महत्त्वाचा दुवा असत. पण मध्यस्थ असल्यामुळे दोन्ही बाजूंना माल महाग मिळत असे. शिवाय जमिनीवरून व्यापार करायचा तर तो खर्चिक. आधीच ही परिस्थिती..Rural Motivational Story: कष्टी जीवनातही आनंदी जोडी.त्यात पंधराव्या शतकाच्या मध्यावर १४५०-५५ च्या दरम्यान कॉन्स्टन्टिनोपलवर ऑटोमन साम्राज्याचे वर्चस्व निर्माण झाले. त्यातून या व्यापारात अनेक अडथळे आले. या मार्गे होणारा व्यापार जवळजवळ ठप्प झाला. अशा परिस्थितीत भारतात पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागणार होते. कारण तिकडे भारतीय मालाची, विशेषत: मसाल्याच्या पदार्थांची प्रचंड मागणी होती..कारण हिवाळ्यात तिथे काही पिकत नसे, त्यामुळे हिवाळ्यासाठी खाण्याचे पदार्थ साठवून ठेवावे लागत. ते टिकवण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांची आवश्यकता होती. म्हणून व्यापार ठप्प होऊन चालणार नव्हते. मग युरोपीयांनी भारतात समुद्रमार्गे थेट पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले. तसाच एक प्रयत्न क्रिस्तोफर कोलंबस याने केला. तो भारताच्या शोधात निघाला, पण वेगळ्याच मार्गावर गेला आणि अमेरिकेत पोहोचला. ते वर्ष होतं १४९२. पाठोपाठ, वास्को द गामा हा पोर्तुगालवरून भारतात येण्यासाठी निघाला, १४९७ साली. तो दहा महिन्यांचा समुद्र प्रवास करून १४९८ मध्ये भारतात पोहोचला..कोलंबस आणि वास्को यांच्या मोहिमांमध्ये काहीतरी हाताशी लागले. पण त्याशिवाय कितीतरी अयशस्वी प्रयत्नसुद्धा झाले. भारतात पोहोचण्याची किती निकड होती, ते यावरून पाहायला मिळते. या यशस्वी प्रयत्नातून युरोपीयांचा भारताशी थेट व्यापार प्रस्थापित झाला. त्यात कोणी मध्यस्थ नव्हते. तो समुद्र मार्गे असल्याने तुलनेने कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण करणे शक्य झाले. त्यानंतर युरोपची झालेली भरभराट सर्वांनीच पाहिली..आता मुद्दा मार्गाचा. हे सारे घडले ते नवा मार्ग शोधल्यामुळे. कोणत्याही प्रदेशाचा किंवा अगदी जगाचा इतिहास पाहिला तर असे समजले की ज्यांनी नव्या वाटा, रस्ते, मार्ग शोधले, तेच इतिहास घडवू शकले. त्यामुळेच तर नवनवे प्रदेश शोधणारे कोलंबस, वास्को, कॅप्टन कुक यांची इतिहासात दखल घेतली जाते. अर्थात, या सर्वांच्या प्रवासात कितीतरी अनिश्चितता होती, जोखीम होती. विचार करा, पाचशे – सव्वा पाचशे वर्षांपूर्वीचा काळ. नेमका मार्ग माहीत नाही, ठरलेल्या ठिकाणाला पोहोचू का याबाबत शाश्वती नाही..त्या वेळचे तंत्रज्ञान आताच्या तुलनेत अगदीच प्राथमिक. तरीही समुद्रात शिडांची जहाजे सोडणे, याला काय म्हणायचे? या प्रवासात अनेकांचे मृत्यू झाले, अनेक संघर्ष झाले. तरीही त्यांनी नवे मार्ग शोधले. त्यात त्यांचा तात्कालिक फायदा झाला झाली, पण महत्त्वाचे म्हणजे हे एकूणच मानवजातीसाठी खूप उपयुक्त ठरले. कारण त्यामुळे जग जवळ आले. एकमेकांशी संवाद सोपा झाला. प्राणी-वनस्पती, वस्तू, तंत्रज्ञान, विविध पद्धती, संस्कृती, आचार-विचार अशा असंख्य गोष्टींची देवाणघेवाण सहज होऊ शकली. म्हणून तर माणसाच्या इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या गोष्टींमध्ये नव्या वाटा आणि मार्गांचा समावेश करावाच लागेल..Rural Motivational Story: कष्टी जीवनातही आनंदी जोडी.मानवी विकासाचे टप्पेविशेष म्हणजे हे माणसाच्या विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये घडत आले आहे. मागे जाऊन अगदी सुरुवातीच्या कालखंडात डोकावले तर असे दिसते की, आदिमानव आफ्रिका खंडात उत्क्रांत झाला आणि त्याने आपला प्रदेश सोडून जगाच्या सर्वच भागात स्थलांतर केले. त्याच्या दृष्टीने ती नवीच वाट होती. त्यामुळे या वाटेवर पुढे सरकताना त्याला काय अनुभवायला लागले असेल याची कल्पना करता येणार नाही. त्या काळात तर त्यात कमालीची अनिश्चितता होती आणि जोखीम सुद्धा. पण त्या काळातील माणसाने शोधलेल्या वाटांमुळे आणि त्यावर तो चालल्यामुळेच आजचा विकसित माणूस घडू शकला. पुढच्या टप्प्यांतीलही अशी अनेक उदाहरणे देता येतील..‘पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी’ हे असेच एक प्रसिद्ध प्रवासवर्णन. इसवी सनाच्या आसपास होत असलेल्या समुद्री प्रवासाच्या नोंदी त्यात आहेत. त्याचा लेखक अज्ञात असला तरी त्याने नोंदवलेली प्राचीन बंदरे-ठिकाणे, वस्तू, प्रवासाची साधने अशा सर्व गोष्टींची आज संगती लागते आणि अनेक गोष्टींचा उलगडा होतो. त्या काळात म्हणजे सुमारे २००० वर्षांपूर्वी हिंदी महासागर, भू-मध्य समुद्र, दक्षिण चिनी समुद्र या परिसरात कसे मोठे व्यापारी जाळेच विणले गेले होते, हे त्यातून ठळकपणे समोर येते..त्यासाठी शिडाच्या जहाजांद्वारे प्रत्यक्ष समुद्र-महासागर ओलांडले जात असत. आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील तत्कालीन सत्ताकेंद्रे एकमेकांशी जोडली गेली होती, अशा कितीतरी गोष्टींचा उलगडा यातून होतो. तेव्हाचा काळ पाहता ही वाट अतिशय खडतर होती. याचा महाराष्ट्राशी असलेला संदर्भ म्हणजे- आपल्याकडील सातवाहन राजवटीच्या काळात हे सुरू होते. महाराष्ट्रातील आताची सोपारा, कल्याण, चौल ही ठिकाणे तेव्हा त्या मार्गावरील बंदरे म्हणून प्रसिद्ध होती..तेथून मोठ्या प्रमाणात व्यापार आणि देवाणघेवाण होत असे. त्याच्या आधी भारतीय उपखंडाच्या संदर्भात, हडप्पा संस्कृती अर्थात सिंधू संस्कृतीच्या काळात, तब्बल ४०००-५००० वर्षांपूर्वीही हे घडले आहे. तेव्हा भारतातील हडप्पा प्रमाणेच पश्चिम आशियात मेसोपोटेमिया ही समृद्ध संस्कृती होती. तिच्याशी स्वत:ला जोडून घेण्यासाठी त्या काळीसुद्धा समुद्र मार्गही विकसित केले गेले. त्या काळात ही बाब किती बिकट असेल याची कल्पना करता येते..महाराष्ट्राला सातवाहनांच्या काळात अशा खडतर मार्गांवरून जाण्याचा वारसा लाभला आहे. तसाच तो पुढे किल्ल्यांच्या, खिंडींच्या, घाटांच्या, कधी निबिड जंगलांच्या वाटांच्या रूपात मराठेशाहीच्या काळातही लाभला आहे. आपले पूर्वज त्यावरून चालल्यामुळे आणि त्यांनी त्यातून मार्ग काढल्यामुळे अभिमान बाळगावा असा आपला इतिहास घडला, आपण तो आता पाहू शकतो. या खडतर आणि बिकट वाटांवर चालण्यासाठी किती साहस आणि चिकाटी दाखवावी लागली असेल हे आपण नक्कीच समजू शकतो..आधुनिक काळातही या खडतर वाटा शोधण्याचे आव्हान कायम आहे आणि ते पेलण्याची ताकदही माणसात टिकून आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माणसाने चंद्रावर टाकलेले पाऊल. अंतराळ प्रगती साधून डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा अदृश्य मार्गांनी अनेक अंतराळवीर मार्गस्थ झाले. त्यात अपोलो ११ मोहिमेत चंद्रावर पोहोचलेले पहिले नील आर्मस्ट्राँग, बझ ऑल्ड्रिन आणि यान चंद्राभोवती फिरवत राहून त्यांचे सारथ्य करणारा मायकल कॉलिन्स हे तिघे इतिहासातील मैलाचा दगड बनून राहिले आहेत. त्यांनी निवडलेल्या खडतर वाटेमुळेच ते इतिहासात अजरामर झाले..यावरून हेच दिसते, ज्यांनी अशी खडतर वाट निवडली त्यांनीच खऱ्या अर्थाने इतिहास घडवला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण हे नवे शोधल्यामुळेच जगाच्या वेगवेगळ्या भागात मोठी उलथा-पालथ घडून आली. हे वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या प्रकारे घडले आहे. त्यामुळे अजूनही ही परंपरा टिकून आहे असे निश्चितच म्हणता येईल. आता जग आणि संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे नवनिर्मिती, संशोधन-तंत्रज्ञान आणि इतर घटकांच्या बळावर कारकीर्द घडवण्याचे नवे मार्ग निवडले तर ते निश्चितच प्रगतीचे मार्ग ठरू शकतात. ही प्रगती वैयक्तिक असेलच, त्याचबरोबर एकूण माणसाची सुद्धा असू शकेल. अशा वाटा आणि मार्ग निवडण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा!abhighorpade@gmail.com(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.