Agriculture Technology : जंगलप्रवण, दुर्गम भागात तंत्रज्ञानयुक्त यशस्वी शेती

Article by Vinod Ingole : यवतमाळ जिल्ह्यातील निंबादेवी या अत्यंत जंगलप्रवण, दुर्गम व सर्व बाबी प्रतिकूल असलेल्या भागात सेवानिवृत्त वनाधिकारी सुनील पाटील यांनी अत्यंत धडाडीने शेतीत प्रयोगशीलता जपली.
Sunil Patil
Sunil PatilAgrowon

Success Story of farming with technology :

विनोद इंगोले

यवतमाळ जिल्ह्यात सालबर्डी- बोरगाव (ता. पांढरकवडा) हे मूळ गाव असलेले सुनील पाटील विभागीय वन अधिकारी म्हणून जुलै २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले. वडिलोपार्जित ४० एकर शेतीपैकी बारा एकर विक्री करून त्यांनी निंबादेवी येथे शेती खरेदी केली. नातेवाइकांकडून मातीचे बांधकाम असलेला वाडा देखील त्यांना याच रकमेत देण्यात आला. त्याची डागडुजी करून तो राहण्यायोग्य केला आहे.

निंबादेवीची भौगोलिक परिस्थिती

तीनशेपर्यंत लोकसंख्या असलेले निंबादेवी व परिसरातील गावे ज्यात समाविष्ट आहेत तो झरी जामणी तालुका आदिवासीबहूल आहे. येथून अवघ्या चार किलोमीटरवर टिपेश्‍वर अभयारण्य असून, यात तब्बल ५० वाघांचा वावर आहे. दुर्गम, जंगलप्रवण अशा या गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याचा पाणीप्रश्‍न गंभीर होतो.

पंधरा वर्षांत या गावांना जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. परंतु पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठीचे प्रयत्न अद्याप झालेले नाहीत. निंबादेवी गावापर्यंत येण्यासाठी पक्‍का डांबरी रस्ताही नव्हता. परिणामी, पावसाळ्यात गावाचा इतर गावांशी संपर्क तुटे. वीज जोडणी देखील नव्हती. सुनील पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर वीज आली आहे. आता डांबरी रस्त्याने देखील गाव तालुक्‍याशी जोडले आहे.

Sunil Patil
Agriculture Technology : रोटाव्हेटरला पर्याय पॉवर हॅरो

प्रतिकूलतेत शेती

सर्व बाबी प्रतिकूल असताना शेती करणे आव्हानात्मक होते. पण ‘एमएस्सी’ ॲग्रीचे शिक्षण घेतलेल्या पाटील यांनी ते लीलया पेलत एकेक सुविधा तयार करून शेती प्रगत करण्याकडे वाटचाल सुरू केली. उन्हाळ्यातील पाणी समस्या लक्षात घेऊन त्यांनी दोन किलोमीटरवर तलाव बांधला आहे.

पाइपलाइनद्वारे येथून पाणी उपसा करणे वनव्याप्त भागामुळे कठीण असले तरी ते काम यशस्वी पेलले. एक विहीर, तीन बोअरवेल्स, चार शेततळी व एक मोठे तळे व जोडीला ठिबक असे सिंचनाचे भक्कम स्रोत तयार केले. त्या माध्यमातून ५६ एकर शेतीचे व्यवस्थापन करणे शक्य झाले.

पिकांची जपली विविधता

प्रत्येकी १५ एकर सोयाबीन, कापूस, पाच एकर हरभरा, एक एकर तूर अशी हंगामी पिके असताच. शिवाय लिंबू-संत्रावर्गातील पोमेलो, पेरू, चार एकर बांबू, जोडीला चिया, कलिंगड, खरबूज, टोमॅटो, वांगी, काकडी, ढेमसे, दोडकी आदी भाजीपाला अशी विविधता राखली आहे. तैवान पिंक जातीच्या पेरूच्या पाच हजार रोपांची लागवड सघन पद्धतीने केली आहे. तेवढ्याच केसर आंबा रोपांची लागवडही सुरू आहे. मोसंबी तीन एकर आहे.

सुधारित तंत्राचा वापर

रायगड जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी व ‘एसआरटी’ तंत्राचे प्रवर्तक चंद्रशेखर भडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील विविध पिकांत हे तंत्रज्ञान कसे वापरता येईल याचे प्रयत्न करीत आहेत. भडसावळे यांनी या तंत्रज्ञानात कुशल असलेल्या दोन व्यक्तींना तेथे पाठवून त्याबाबत मार्गदर्शन केले आहे. सध्या पाटील प्रत्येक पिकासाठी गादीवाफा (बेड) पद्धतीचा वापर करतात. साधारण तीन फुटी रुंद, दीड फुटी उंच असा बेड असतो. दोन सरींतील अंतर साडेचार फूट असते. अर्थात, हे प्रातिनिधिक अंतर असून पीकनिहाय त्यात बदल होतो.

यांत्रिकीकरण

डोंगरमाळात असलेल्या निंबादेवी परिसरात केले यांत्रिकीकरण.

५५ अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर, मिनी ट्रॅक्टर, बेडमेकर, पॉवर टिलर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, श्रेडर, रिजर, बीबीएफ प्लॅंटर, पॉली मल्चिंग, ठिबक अंथरणे व बेड तयार करणे असे बहुपयोगी यंत्र, हॅण्ड पूश सीडर, पॉवर वीडर.

वीजपुरवठा खंडित झाल्यास ४० किलोवॉट क्षमतेचा जनरेटर, सौर ऊर्जाचलित दोन पंप.

खत एकसमान पसरून देण्यासाठी डिस्पेंसर. प्रत्येक बाजूला २० फुटांपर्यंत असे दोन्ही बाजू मिळून ४० फुटांपर्यंत खत देण्याचे काम हे यंत्र करते. व्हर्मिकंपोस्ट, शेणखत तसेच धैंचा, बोरू आदी हिरवळीच्या खताचे बियाणेही याद्वारे पसरून देणे शक्य.

सर्व यंत्रसामग्रीवर सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च. कृषी विभागाकडून काही अनुदान.

Sunil Patil
Agriculture Technology : शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठीची अवजारे

सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर

परिसरातील गावांमधून दरवर्षी सुमारे ५० ट्रॉली शेणखताची खरेदी.

१२ फूट लांब, चार फूट रुंद व दोन फूट उंची असलेले पॉलिथिनचे बेड्‍स. प्रति बेडमध्ये सुमारे एक ते दीड टन याप्रमाणे एकूण २५ टन गांडूळ खत निर्मिती.

सर्व पिकांच्या अवशेषांचा वापर. बांबूचे बन असल्याने त्याची पाने जमिनीवर पडतात.

त्यापासून दर्जेदार सेंद्रिय खतनिर्मिती. याच बांबू झाडांखाली गांडूळ खताचे बेड असल्याने त्यांच्या सावलीसाठी बांधकामावर होणारा मोठा खर्च वाचविला.

‘वेस्ट डीकंपोजर’साठी पाच हजार लिटरचा टॅंक. दहा लाख लिटरच्या तलावात त्याचे मिश्रण तयार करून त्याचा शेतीला पुरवठा.

सेंद्रिय पद्धतीच्या वापरामुळे पोषक सूक्ष्मजीव, गांडुळांची संख्या वाढली. जमिनीची सुपीकता वाढली.

उत्पादकता वाढली

सर्व प्रकारच्या तंत्रांचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढविण्यास पाटील यांना यश आले आहे.

पूर्वी हरभऱ्याचे एकरी सात ते आठ क्‍विंटल उत्पादन मिळायचे. आता ते १२ क्‍विंटलवर पोहोचले आहे.

तुरीचे एकरी दोन क्‍विंटल उत्पादन सात क्‍विंटलवर पोहोचले आहे. सोयाबीनचे एकरी तीन ते चार क्‍विंटल उत्पादन मिळायचे. आता फुले संगम, फुले किमया या सुधारित वाणांचा वापर होतो. उत्पादनही १० ते ११ क्विंटलपर्यंत मिळत आहे. कपाशीचे उत्पादन एकरी सात क्विंटलवरून १० क्विंटलपर्यंत पोचले आहे.

बांध केले उत्पन्नक्षम

बांधावर सागवान, निलगिरी, बांबू, करवंद अशा प्रकारची दहा हजारांपेक्षा झाडे लावली आहेत. गेल्या वर्षी निलगिरीच्या झाडांची कटाई केली. चार हजार रुपये प्रति टन दराने १०० टन त्याचा पुरवठा नजीकच्या बल्लारशाह पेपरमिलला केला. त्यापासून काही लाखांचे उत्पन्न मिळाले. पुढील काही वर्षांत सागवानापासूनही उत्पन्न सुरू होईल.

मत्स्यपालनातून उत्पन्न

एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यात रोहू, मृगल, कतला जाती विविध माशांचे संगोपन होते.

आजवर सुमारे ५० क्‍विंटल माशांची विक्री करून ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मोटरबोटही

खरेदी केली आहे. चार राजहंस, गीर गाय, कडकनाथ, गावरान कोंबडी यांचेही संगोपन सुरू आहे.

पुढील काळात कृषी पर्यटनावर पाटील यांचा भर आहे.

‘ॲग्रोवन’ ठरला प्रेरक

पाटील अगदी सुरुवातीपासून ‘ॲग्रोवन’चे वाचक आहेत. त्यांनी विविध लेख, यशकथा यांची कात्रणे काढून त्यांचे नेटक्या पद्धतीने ‘फायलिंग’ केले आहे. ॲग्रोवनमुळे शेतीचा विकास करणे सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

सुनील पाटील, ७७६९९०७०४७, ८३०८३०४७९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com