Fruit Orchard Management : गारखेडा (ता.जि. छत्रपती संभाजीनगर) येथील चौधरी कुटुंब सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्याला आहे. उदयराज चौधरी यांना शेतीच्या विकासात पत्नी सुप्रिया, आई कुसुम, वडील बाबूराव, भाऊ अक्षय, वहिनी विश्वा आणि बहीण वर्षा काकडे यांची चांगली साथ मिळाली आहे.
उदयराज हे सिडकोमध्ये सहायक कार्यकारी अभियंता आणि अक्षय हे हॉटेल व्यवसाय सांभाळतात. उदयराज यांचे वडील बाबूराव चौधरी हे एमआयडीसी कार्यालयात क्षेत्र व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. २०१५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीपूर्वीपासूनच बाबूराव चौधरी यांनी नोकरी सांभाळून वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष दिले होते.
नोकरीमध्ये असताना ते शनिवार आणि रविवार शेतीमध्ये रमायचे. २०१० मध्ये त्यांनी चार एकर क्षेत्रावर मोसंबी बाग लावली. पुढे टप्प्याटप्प्याने गावशिवारात कोरडवाहू शेत जमीन विकत घेतली. मोसंबी बागेव्यतिरीक्त इतर जमीन फारशी सुपीक नसल्याने जमेल तशी पारंपरिक पद्धतीने त्यांनी पीक नियोजन ठेवले.
उदयराज चौधरी यांनी २०१५ पासून नोकरी सांभाळून शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सध्या चौधरी कुटुंबाची चित्तेपिंपळगाव शिवारात १४ एकर आणि जाखमाथा शिवारात चार एकर शेती आहे.
शेती नियोजनाला सुरुवात
उदयराज चौधरी यांनी वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. जाखमाथा शिवारातील मोसंबी बाग वगळता चितेपिंपळगाव शिवारातील शेती जवळपास पडीक होती. पहिल्यांदा ही जमीन लागवडीखाली आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
या जमिनीत धरणातील गाळ मिसळला. साधारणपणे २०१५ पासून या शिवारात कपाशी, तूर, मका, बाजरी लागवडीस सुरुवात केली. परंतु या पिकांचे अपेक्षित आर्थिक उत्पन्न मिळायचे नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार फळबागेकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
मोसंबी, आंबा फळबागेचे नियोजन
शेती नियोजनाबाबत उदयराज चौधरी म्हणाले, की पारंपरिक शेतीमधील कापूस वेचणीला आला, की मजुरांचा प्रश्न तयार व्हायचा. नोकरी करून शेती सांभाळत असल्याने सुट्टीच्या दिवशी कापूस वेचणीला मजूर मिळाले नाही की मग हे नियोजन पुढच्या आठवड्यावर जायचे. अनेकदा नुकसानही व्हायचे. हे थांबविण्यासाठी मी मोसंबी फळबाग वाढविण्याचा निर्णय घेतला.
२००९ मध्ये फळबागेला पाण्याची सोय होण्यासाठी चित्ते पिंपळगाव शिवारातील जमिनीमध्ये सुखना धरणावरून पाइपलाइनने पाणी आणले. शासनाच्या योजनेतून एक विहीर खोदून त्यामध्ये पाणी सोडले. २०१९ मध्ये तयार केलेल्या शेततळ्यात विहिरीतील पाणी भरण्यास सुरुवात केली. आता शेततळ्यातून हे पाणी ठिबकच्या माध्यमातून मोसंबी, आंबा बागेला दिले जाते.
मी २०१७ मध्ये १४ बाय १४ फूट अंतरावर ५०० आणि २०१८ मध्ये ५०० आणि २०२२ मध्ये २५० मोसंबी कलमांची लागवड केली. यासाठी न्यूसेलर, काटोल गोल्ड आणि फुले संगम या जातींची निवड केली आहे. अलीकडच्या काळात लागवड केलेली २५० झाडे वगळता उर्वरित सर्व मोसंबी बाग उत्पादनक्षम आहे. मोसंबीच्या आंबे बहराचे नियोजन असते. २०२० मध्ये दीड एकरात १४ बाय ६ फूट अंतरावर केसर आंबा कलमांची लागवड केली.
यंदा पहिल्यांदाच केसर आंब्याचे सुमारे दोन टन उत्पादन मिळाले. या कलमांची अलीकडेच छाटणी करून विश्रांती काळातील व्यवस्थापनावर भर देणे सुरू आहे. सध्या मोसंबी बाग फळांनी भरून गेली आहे. सध्या माझ्याकडे चौदा एकरांवर मोसंबी फळबाग आणि दीड एकर आंबा बाग आहे. गेल्या नऊ वर्षांत मी कापूस, ज्वारी या पिकांच्या बरोबरीने अडीच एकरांत मिरची, खरबूज, टरबूज, टोमॅटो आणि कांदा लागवडीचेही चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. परंतु व्यवस्थापनाच्या दृष्टीने मला मोसंबी, आंबा बाग आर्थिकदृष्टया किफायतशीर झाली आहे.
पूरक उद्योगाची जोड
उदयराज चौधरी यांनी फळबागेला पूरक उद्योगाची जोड दिली आहे. २०१७ मध्ये चौधरी यांनी दहा उस्मानाबादी शेळ्यांची खरेदी केली. त्यांच्यासाठी मुक्त संचार गोठा बांधला. संगोपनाच्या दृष्टीने शेळ्यांची संख्या आवाक्यात ठेवली आहे. सध्या त्यांच्याकडे २४ शेळ्या आहेत. यामध्ये सिरोही, सोजत, उस्मानाबादी तसेच स्थानिक जातीच्या शेळ्या आहेत. दरवर्षी पाच बोकड आणि काही शेळ्यांच्या विक्रीतून पन्नास हजारांची उलाढाल होते.
शेळीपालनामुळे शेतीसाठी लेंडीखताची उपलब्धता होते. उदयराज चौधरी यांनी २०१९ मध्ये पशुपालनास सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे दोन संकरित गाई, २ म्हशी, १ गीर व एक गावरान गाय आहे. दररोज १५ लिटर दूध खासगी डेअरीला दिले जाते. म्हशीच्या दुधाला ५० रुपये आणि गाईच्या दुधाला २५ रुपये प्रति लिटर दर मिळतो. गीर गाईचे दूध स्वत:च्या कुटुंबासाठी ठेवतात. चौधरी यांनी २५ गावरान कोंबड्यांचे देखील संगोपन केले आहे. कोंबड्यांमुळे गोठ्यातील गोचिडांचे नियंत्रण होते.
शेतीबांधावर नारळ, सागवान
चौधरी यांनी शेती परिसर आणि बांधावर विविध फळझाडांची लागवड केली आहे. शेती बांध, गोठा, शेततळ्याभोवती, शेतातील अंतर्गत रस्त्यालगत नाराळाच्या डॉर्फ ग्रीन जातीची ५०, चिंच, जांभूळ प्रत्येकी ३, खजूर, अंजीर प्रत्येकी २, सीताफळ ५, पेरू ५, लिंबू ७, स्टार फ्रूट १ आणि सागवानाची सुमारे २०० रोपांची लागवड केली आहे.
फळबाग, पूरक उद्योगाचे नियोजन
फळबाग व्यवस्थापनासाठी दोन कायमस्वरूपी मजूर कुटुंब. हंगामानुसार परिसरातील २० मजुरांना रोजगार.
मावस भाऊ संजय गवळी, नारायण गवळी यांच्यासह परिसरातील शेतकरी मित्रांचे मार्गदर्शन.
संपूर्ण फळबागेला ठिबक सिंचन. तण नियंत्रणासाठी यंत्रांचा वापर.
जनावरांसाठी दोन एकरांवर चारा लागवड. मुरघास निर्मितीवर भर.
फळबाग,चारा लागवडीस शेणस्लरी, शेणखताचा पुरेपूर वापर.
दहा गुंठे क्षेत्रावर शेळ्या, गाई, म्हशींसाठी गोठा, कोंबड्यांसाठी स्वतंत्र शेड.
कुटुंबासाठी लागणाऱ्या बहुतांश भाजीपाल्याचे उत्पादन.
यंदाच्या वर्षी थेट ग्राहकांना १२० रुपये किलो दराने दोन टन केसर आंबा विक्री. मोसंबीची व्यापाऱ्याला १५ ते २० हजार रुपये प्रति टन दराने विक्री.
शेतशिवारात सीसीटीव्हीची नजर.
उदयराज चौधरी, ९८२३४४४४९७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.