Fruit Orchard Management : उन्हाळ्यात फळबागांची काळजी कशी घ्यावी

Article by Dr. Adinath Takte : उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजेल, यासंदर्भातील माहिती या लेखातुन पाहुयात.
Fruit Orchard Care
Fruit Orchard CareAgrowon

Fruit Orchard : उन्हाळ्यामध्ये फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धती, आच्छादन, बाष्परोधकांचा वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरून वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम फळझाडांवर होणार नाही.

सध्या कमाल आणि किमान तापमानात चांगलीच वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळी व सायंकाळी थोडा गारवा तर दिवसा सर्वसाधारण ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान अशी स्थिती पाहायला मिळते आहे. मागील पावसाळ्यात राज्यातील बहुतांशी भागांत कमी पाऊस झाल्याने सिंचनाचे स्रोत खालावले आहेत. त्याचा परिणाम फळबागांवर होत आहे.

सूर्यप्रकाश, उष्ण वारे, कोरडी हवा यांचा विपरीत परिणाम नवीन लागवड केलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणाऱ्या झाडांवर होत होतो. यामुळे मुख्यत्वे कोवळी फूट करपणे, खोड तडकणे, फळगळ होणे, फळांचा आकार लहान होणे तसेच पाने, फळे गळून झाडे वाळून जाणे, झाडांची वाढ थांबणे आणि शेवटी झाड मरणे असे प्रकार होतात. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान होते. याकरिता पाण्याचा आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर होऊन उन्हापासून फळबागांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

पाण्याचा कार्यक्षम वापर

उन्हाळ्यामध्ये शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी देणे फायदेशीर ठरते. या पद्धती दुष्काळी किंवा पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्राकरिता अत्यंत फायदेशीर ठरतात. या पद्धतीत इतर प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होते आणि उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ मिळू शकते. या पद्धतीमुळे झाडांना गरजेनुसार पाणी उपलब्ध होऊन पाण्याचा अपव्यय टाळला जातो. याशिवाय सिंचनाच्या पाण्याबरोबर खतमात्रा देखील देणे शक्य होते. त्यामुळे खतांवरील खर्चात बचत होते.

फळबागेस किंवा पिकांना शक्यतो सकाळी अथवा रात्री सिंचन करावे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.

पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात एकआड एक सरीने पाणी द्यावे. तसेच पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये वाढ करावी. उदा. एखाद्या बागेस १० दिवसांच्या अंतराने पाणी देत असल्यास पुढील पाणी १२ दिवसांनी, त्यापुढील पाणी १५ दिवसांनी द्यावे. अशा प्रकारे जमिनीचा मगदूर, तापमान आणि पाण्याची उपलब्धता या बाबी विचारात घ्याव्यात.

Fruit Orchard Care
Orchard Development : अभ्यासातून विकसित झालेली ३५ एकर फळबाग

मडका सिंचन पद्धत

ही पद्धती कमी क्षेत्रातील व जास्त अंतरावरील फळझाडांना पाणी देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

मडकी शक्यतो जादा छिद्रांकीत किंवा आढीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे व त्यात कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. एका झाडासाठी दोन मडकी जमिनीत खड्डा खोदून त्यात ठेवावीत. त्या मडक्यात संध्याकाळी पाणी भरून त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी. त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. या पद्धतीमुळे पाण्याची ७० ते ७५ टक्के बचत होते.

लहान झाडांना (दोन ते तीन वर्षांकरिता) ५ ते ७ लिटर पाणी बसेल इतक्या क्षमतेची लहान

मडकी वापरावीत. जास्त वयाच्या मोठ्या झाडांकरिता १० ते १५ लिटर पाणी बसेल अशी मडकी वापरावीत.

बाष्परोधकांचा वापर

फळझाडांनी जमिनीमधून शोषलेल्या एकूण पाण्यापैकी ९५ टक्के पाणी वनस्पती पर्णोत्सर्जनाद्वारे हवेत सोडतात. हे वाया जाणारे पाणी बाष्परोधकाचा वापर करून अडविता येते. बाष्परोधकांचे पर्णरंध्रे बंद करणारी आणि पानांवर पातळ थर तयार करणारी असे दोन मुख्य प्रकार आहेत. पर्णरंध्रे बंद करणाऱ्या बाष्परोधकांमध्ये फिनील मरक्युरी ॲसिटेट (Phenyal mercury acetate), ॲबसिसिक ॲसिड तर पानांवर पातळ थर तयार करणाऱ्या बाष्परोधकांमध्ये केओलीन, सिलिकॉन ऑइल, मेण यांचा समावेश होतो.

लहान रोपांना सावली करणे

कडक उन्हापासून नवीन लागवड केलेल्या फळझाडांच्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी पहिली १ ते २ वर्षे रोपांवर सावली करावी. त्यासाठी रोपाच्या दोन्ही बाजूंना ३ फूट लांबीचे बांबू रोवावेत. या बाबूंना चारही बाजूंनी व मधून तिरकस असे बांबू किंवा कामट्या बांधून त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतावरून तिरकस काड्या सुतळीने व्यवस्थित बांध्याव्यात. वाळलेल्या गवता ऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा.

Fruit Orchard Care
Orchard Cultivation : फळबाग लागवडीतून साधली आर्थिक उन्नती

वारा प्रतिरोधकाचा किंवा कुंपणाचा वापर

बागेभोवती अगदी सुरुवातीलाच शेवरी, मलबेरी, चिलार, विलायती चिंच, सुबाभूळ, ग्लिरिसिडीया, सुरू, शेर, निवडुंग यापैकी उपलब्ध वनस्पतींची

सजीव कुंपण म्हणून लागवड करावी. त्यामुळे फळबागेचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण होते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.

खतांची फवारणी

उन्हाळी हंगामात बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाचा वेग जास्त असल्यामुळे फळझाडांची पाने कोमजतात. पानांतील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते. अशावेळी पोटॅशिअम नायट्रेट (KNO३) १० ते १५ ग्रॅम आणि विद्राव्य डायअमोनियम फॉस्फेट (DAP) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे २५ ते ३० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होते.

बोर्डो पेस्टचा वापर

उन्हामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास झाडांच्या खोडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी झाडांचे बुरशीजन्य व इतर रोगांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने खोडांना बोर्डो पेस्ट लावणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे १ ते २ मीटर उंचीपर्यंत चुन्याची पेस्ट किंवा बोर्डोपेस्ट लावावी. बोर्डो पेस्ट लावण्याने सूर्यकिरण परावर्तीत होण्यास मदत होते तसेच साल तडकत नाही.

आच्छादनांचा वापर

उन्हाळ्यात जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन अधिक होते. आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भुस्सा, उसाचे पाचट, गव्हाचे काड, भाताचे तूस अशा सेंद्रिय संसाधनांचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ सेंमी असावी. सेंद्रिय आच्छादनाच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

आच्छादनासाठी पॉलिथीन फिल्मचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो.

आच्छादनासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यामुळे कालांतराने ते कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्याचा जमिनीस आणि पिकांना फायदा होतो.

फायदे

पावसाचा जमिनीवर पडण्याचा वेग मंदावतो. जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरले जाते.

जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीची धूप कमी होते.

जमिनीतील पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी होते. ओलावा जमिनीत जास्त काळ टिकतो.

जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.

तणांच्या वाढीस आळा बसतो.

जमिनीत योग्य तापमान राखण्यास मदत होते.

वनस्पतींना खतांचा जास्त कार्यक्षमतेने उपयोग करून घेता येतो.

उन्हाळी हंगामात दोन पाण्याच्या पाळ्यातील कालावधी वाढविता येतो.

जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

महत्त्वाच्या बाबी

नारळाच्या लहान रोपांना सावली करणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा रोपांची मरतुक होते.

केळीचे घड झाकून घ्यावेत. म्हणजे करपणार नाहीत.

डाळिंब फळे तडकण्याची शक्यता असते. फळांचे कडक उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी कागदी पिशव्या बांधाव्यात.

बागेभोवती शेवरी, ग्लिरिसिडीया, मलबेरी, विलायती चिंच, सुबाभूळ यांचे कुंपण करावे. अशा सजीव कुंपणामुळे उष्ण वारे किंवा वादळांमुळे बागेचे नुकसान होत नाही.

द्राक्ष, संत्रा, मोसंबी आदी फळझाडांना बोर्डो पेस्ट लावावी.

लहान झाडावरील फुले, फळे काढून टाकावीत. झाडांची हलकी छाटणी करून घ्यावी. उन्हाळ्यात आवश्यकता असेल तर रासायनिक खते थोड्या प्रमाणात द्यावीत.

फळझाडांवर १ ते १.५ टक्का म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी केल्यास फळझाडांना पाण्याचा ताण बसणार नाही.

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृदा शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com