laxmuna sule Agrowon
यशोगाथा

Farmer Success story : तंत्र- शास्त्रशुद्ध पद्धतीने गाठला उसाचा एकरी १०० टन पल्ला

सुदर्शन सुतार

sugarcane production : सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात नातेपुतेनजीक मोरोची गाव आहे. नीरा उजव्या कालव्याचा पाट फिरल्याने मोरोची परिसर पाण्याच्या दृष्टीने सधन राहिला आहे. त्यामुळेच या भागात ऊसशेती सर्वाधिक होते. मोरोचीचे भौगोलिक क्षेत्र पाच हजार एकर, पैकी एक हजार एकरांवर ऊसच असावा. अन्य क्षेत्रात केळी, डाळिंब आदी पिके आहेत. याच गावचे लक्ष्मण सूळ यांची ३१ एकर शेती आहे. जिल्हा बँकेमार्फत गावपातळीवर चालणाऱ्या विकास सेवा सोसायटीमध्ये सचिव म्हणून त्यांनी ३६ वर्षे नोकरी केली. नोकरीचे ठिकाण नऊ किलोमीटरवर असल्याने नोकरी सांभाळून घरच्या शेतीकडेही सूळ चांगल्या प्रकारे लक्ष देत. सन २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शेतीत पूर्णवेळ रमले. सुमारे २० वर्षांहून अधिक काळ केळी, डाळिंबाचा दीर्घ अनुभव होता. दरातील चढ-उतारांमुळे केळीचे क्षेत्र कमी केले. डाळिंबाच्या जुन्या बागेत किडी-रोगांच्या समस्या असल्याने ती काढून नव्याने तीन एकरांत लागवड केली आहे. सध्या दीड एकर केळी, पाच एकर सीताफळ, सीताफळात पपई आणि डाळिंबात शेवग्याचे आंतरपीक आहे.

उसाची अभ्यासपूर्ण शेती

ऊस हे सूळ यांचे मुख्य पीक असून, दरवर्षी त्याचे १३ ते १४ एकर क्षेत्र असते. सांगली जिल्ह्यातील

प्रगतिशील ऊस उत्पादक संजीव माने, सुरेश कबाडे आदींकडून मार्गदर्शन व त्यांच्या प्रयोगांचा अवलंब करीत त्यांनी अभ्यासपूर्ण व शास्त्रशुद्ध पद्धतीची ऊसशेती सुरू केली. त्यांच्या व्यवस्थापनातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे.

१) रोपेनिर्मिती ः उसाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कांड्यांऐवजी रोपांची लागवड. त्यासाठी ऊसतज्ज्ञ डॉ. जमदग्नी (नृसिंहवाडी, जि. सांगली) यांच्या सुपरकेन नर्सरी तंत्राचा वापर. रोपेनिर्मितीसाठी एक गुंठे क्षेत्र निवडण्यात येते. रासायनिक खते, शेणखत व ह्युमिक ॲसिड यांचा वापर करून जमीन तयार करण्यात येते. सुमारे ३० दिवसांत रोप लागवडीसाठी तयार होते.

२) लागवडीपूर्वीची मशागत ः खोडवा ऊस निघाल्यानंतर पाचट कुट्टी करून त्यावर सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया यांचा वापर. दोन वेळा रोटावेटरचा वापर. त्यानंतर ताग पेरून ५० दिवसांनी जागेवरच गाडण्यात येतो. पुढे तीन आठवडे जमीन तापत ठेवली जाते.

३) शंभर टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून त्यानुसार पूर्वनियोजन व रोपांची एकरी संख्या निश्‍चित केली जाते. पाच बाय दोन किंवा साडेपाच बाय दीड फूट असे लागवडीचे अंतर.

४) उसाचे वाण ः को ८६०३२, लागवड हंगाम ः आडसाली.

५) लागवडपूर्व ते मोठी भरणी इथपर्यंतचा बेसल डोस ः एकरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १२० किलो पालाश. हा डोस चार वेळा विभागून पुढीलप्रमाणे.

अ) लागवडीपूर्वीची मात्रा, सोबत सेंद्रिय खत २०० किलो.

ब) लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी दुसरी मात्रा, सोबत सेंद्रिय खत १०० किलो

क) तिसरी मात्रा ६० ते ७० दिवसांनी, सोबत १०० किलो सेंद्रिय खत

ड) मोठ्या भरणीवेळी चौथी मात्रा व सोबत २०० किलो सेंद्रिय खत.

६) लागवडीपासून ते मोठ्या भरणीपर्यंत संजीवकांच्या दोन आळवणी व तीन फवारण्या.

७) लागवडीच्या आठ ते नऊ महिन्यांनी ठिबकद्वारे एकरी १२ किलो अमोनिअम सल्फेट, ६ किलो पोटॅश, तीन किलो मॅग्नेशिअम सल्फेट. ऊस काढणीच्या एक महिन्यापर्यंत ही मात्रा.

उत्पादन व अर्थकारण

सूळ सांगतात की एकरी ऊससंख्या ४० हजार ते ४५ हजारांच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न असतो.

प्रत्येक उसाचे वजन दोन ते तीन किलोपर्यंत मिळाले तरी एकरी शंभर टन किंवा

त्यापुढे उत्पादन साध्य होऊ शकते. आतापर्यंत एकरी ८० ते ९० टनांपर्यंत उत्पादन मी साध्य केले

आहे. मागील वर्षी १०० टन उत्पादनाचा पल्ला गाठला. एकरी उत्पादन खर्च किमान एक लाख

रुपयांपर्यंत असतो. माळेगाव साखर कारखान्याला ऊस दिला जातो. प्रति टन ३१०० रुपये दर सध्या दिला जात आहे. खोडव्याचे एकरी ५० ते ६० टन उत्पादन मिळत आहे.

सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापर्यंत

ऊस शेतीत शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करताना जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष दिले. त्यातून मातीचा सेंद्रिय कर्ब ०.७५ ते एक टक्क्यापर्यंत पोहोचला असल्याचे सूळ म्हणाले. दरवर्षी माती परीक्षण करून त्यानुसारच मुख्य तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

घरच्यांची साथ, उच्चशिक्षणाची परंपरा

सूळ यांना पत्नी अरुणा यांची शेतात मोलाची साथ आहे. आज सत्तरीच्या उंबरठ्यात आले असले, तरी हे दांपत्य मोठ्या उत्साहाने, हिरिरीने शेतीत अविरत कार्यरत आहे. केळीचे ग्रॅंड नैन वाण असून, त्याचे एकरी ३५ ते ४० टनांपर्यंत उत्पादन घेतात. भगवा वाणाच्या डाळिंबाचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. प्रभारी मंडल कृषी अधिकारी उदय साळुंखे, कृषी सहायक विजय कर्णे यांचे मार्गदर्शन मिळते. घरातील मुलांना चांगले शिक्षण देता आल्याचा अभिमान असल्याचे सूळ सांगतात. मुलगी ज्योती डॉक्टर आहे. प्रदीप व रणजितही उच्चशिक्षित आहेत. आज ती आपल्या व्यवसायात रमली आहेत.

संपर्क ः लक्ष्मण सूळ, ९५६१२६०१५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT