
Chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील पाल हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील पुरातन सिद्धेश्वर संस्थान हे गावकऱ्यांच्या आस्थेचे स्थान आहे. गावातील सुमारे १६७७ हेक्टर क्षेत्रापैकी १३२६ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. गावाच्या एका बाजूने गिरजा नदी, तर दुसऱ्या बाजूने
बाबरा नदी वाहते. या नदीवर वाकोद मध्यम प्रकल्प आहे. त्यामुळे प्रकल्पाखालील काही भागात सिंचन होण्यास मदत होते. मका, कपाशी, भाजीपाला ही शिवारातील मुख्य तर सोयाबीन, आले, ऊस, गहू, हरभरा अशीही अन्य पिके आहेत. दुभती जनावरं असल्याने काही क्षेत्रावर चारा पिकांचे नियोजन करण्यात येते.
सिंचन व्यवस्था
गावशिवारात २५० ते ३०० हेक्टरवर बांधबंदिस्ती झाली आहे. तीन ‘रिचार्ज शाफ्ट’, १५ ते २० शेततळी आहेत. गिरजा नदीवर दोन केटीवेअर्स आहेत. यंदा पाऊस नसल्याने आताच्या घडीला पाणी साठलेले नाही. कृषी विभागाच्या योजनांमधून ३४० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सूक्ष्मसिंचनाखाली असून, पैकी ३० हेक्टर क्षेत्र तुषार पद्धतीचे आहे.
कापूस मूल्य साखळी प्रकल्प
गावात साडेसहाशे हेक्टरवर कपाशी आहे. कृषी विभागाने यंदा कापूस मूल्य साखळी प्रकल्प हाती घेतला. सुमारे १०० हेक्टरवर राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात १५० शेतकरी सहभागी आहेत. या अंतर्गत जैविक व रासायनिक कीडनाशकांचे वाटप, कामगंध सापळ्यांचा वापर, बियाणे अनुदान हेक्टरी एक हजार रुपये असा लाभ देण्यात आला आहे. शेतीशाळांच्य माध्यमातून प्रशिक्षणे घेतली आहेत.
कपाशी व्यतिरिक्त ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी आदी बारा ते पंधरा प्रकारचा भाजीपाला गावात १० ते २० गुंठ्यांपासून पाच एकरांपर्यंत दिसून येतो. गावातून दररोज आठ टनांपर्यंतचा ताजा भाजीपाला विदर्भासह राज्याच्या विविध बाजारांत पाठविला जात असल्याची माहिती या विषयाचे अभ्यासक किरण जाधव यांनी दिली.
दुग्ध व्यवसाय बनला उत्पन्नाचे साधन
गावातीलस कुटुंबाकडे पूर्वी घरच्यापुरती दुधाची सोय म्हणून गाय किंवा म्हैस असायची. परंतु जसजसा मुरघासाच्या माध्यमातून चाऱ्याचा प्रश्न सुटू लागला व दुधाला अपेक्षित दर मिळू लागले त्यानुसार संकरित गायींची संख्या वाढू लागली. आजच्या घडीला गावात ५०० च्या आसपास दूध उत्पादक, तर
एकूण संकरित गायींची संख्या एकहजाराहून अधिक असावी. दररोज १० ते १५ हजार लिटर दूध निर्मिती होते. खासगी, शासकीय मिळून सुमारे नऊ डेअऱ्यांमधून दूध संकलन होते. हातात खेळता पैसा राहात असल्याने शेतकऱ्यांची दुग्ध व्यवसायाला पसंती आहे.
मक्यापासून मुरघास
पाल गावात पावणेसहाशे हेक्टरवर मका आहे. प्रत्येक हंगामात मका व त्यात सुधारित जोडओळ पद्धतीचा वापर करणारे शेतकरी गावशिवारात आहेत. या मक्यापैकी किमान ३० ते ४० टक्के पिकाचा मुरघास निर्मितीसाठी वापर होतो. प्रत्येक घर किंवा गोठ्यासमोर मुरघासाच्या बॅग्ज पाहण्यास मिळतात. प्रत्येकाकडे नेपिअर गवत, मेथी, लसूण घास आदी चारा पिकेही ५ ते २० गुंठ्यांपर्यंत आहेत. जनावरांच्या आरोग्यासाठी वर्ग १ चा पशुवैद्यक दवाखाना आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.