
गणेश कोरे
Vagheshwari Women Milk Producers Agricultural Self-Help Group : जातिवंत दुधाळ गाईंच्या संगोपनातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्यासाठी पिंगोरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील वाघेश्वरी महिला दूध उत्पादक कृषी बचत गटातील २५ महिलांनी सामूहिक गोठा उभारला आहे. केवळ दूध उत्पादनावर न थांबता प्रक्रिया आणि ब्रॅण्डिंगद्वारे या गटाने पुण्यातील बाजारपेठेत चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू केली आहे. यामुळे शेतीला पूरक उद्योगाची चांगली जोड मिळाली आहे.
पुरंदर (जि. पुणे) तालुक्यातील पिंगोरी हे डोंगरांनी वेढलेले गाव. गेल्या काही वर्षांमध्ये गावात विविध सामाजिक संस्था, उद्योगांचा सामाजिक दायित्व निधी आणि जलयुक्त शिवार योजनेद्वारे शाश्वत सिंचनाची सोय झाली. शेतकऱ्यांनी एकत्र येत पिंगोरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन आणि विक्री व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू असताना, शेतीबरोबरच पूरक उद्योग म्हणून पशुपालन सुरू करण्याचा विचार ग्रामस्थ करत होते. या वेळी सामूहिक गोठा करण्याचा विचार बाबा शिंदे यांनी मांडला.
मुक्त संचार गोठ्याची उभारणी ः
महिला बचत गटातील २५ महिलांकडे प्रत्येक एक दुधाळ गाय असावी आणि दूध संकलनातून पूरक उद्योगाची उभारणी करण्याचा विचार पिंगोरी शेतकरी उत्पादक कंपनीचा होता. मात्र गटातील महिलांची घरे विखुरलेली होती. यामुळे दूध संकलन, चारा, पाणी, पशुखाद्य व्यवस्थापनासाठी प्रत्येकीचे वेगळे श्रम आणि पैसा जाणार होता. हे टाळण्यासाठी सर्वांनी एकाच ठिकाणी गोठ्याबरोबर चारा, पाणी, पशुखाद्य व्यवस्थापन, दूध संकलन आणि प्रक्रिया केली तर ते अधिक फायदेशीर ठरेल असा विचार पुढे आला. याबाबत शिंदे यांनी ‘रोटरी क्लब ऑफ औंध'च्या माजी अध्यक्षा भावना उलंगवार, पदाधिकारी रवी उलंगवार आणि ‘रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट्स सिटी, पुणे’चे माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी ब्रिझ सेठी यांच्या समोर सामूहिक गोठ्याचा प्रस्ताव मांडला. संबंधितांनी याबाबत सकारात्मक विचार करून, ही संकल्पना ‘ॲटोस’ उद्योग समूहाकडे मांडली. या उद्योग समूहाने या संकल्पनेला मान्यता देत बचत गटाच्या २५ महिलांसाठी २५ संकरित जर्सी दुधाळ गायी आणि सामूहिक गोठा बांधण्यासाठी सीएसआर फंडामधून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. सामूहिक गोठ्यासाठी ॲटोस उद्योग समूहाने मान्यता दिल्यानंतर गावालगत महिला बचत गटाने २० गुंठे जागा भाडेतत्त्वावर घेऊन, या ठिकाणी पशुपालन आणि दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला. नुकत्यात मुक्त संचार गोठ्याचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ औंधचे मावळते अध्यक्ष सुखानंद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक मुक्त गोठ्याची उभारणी, गोठा व्यवस्थापकासाठी स्वतंत्र रूम, पशुखाद्य साठवणुकीसाठी गोदाम, प्रत्येकी संकरित गाईसाठी ९० हजार रुपये, सौरऊर्जेवर गोठा कार्यान्वित करण्यासाठी चार लाखांचा निधी, दूध काढणी यंत्र, शीतकरण यंत्रणा, कडबाकुट्टी आदी विविध यंत्रणांचा समावेश आहे. पशू व्यवस्थापनाबाबत गटातील सर्व सदस्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.
...असे आहे गोठा व्यवस्थापन ः
गोठा व्यवस्थापनाची जबाबदारी रोहन ताकवले यांच्याकडे, समीर शिंदे हे दूध वाहतूक आणि पॅकिंग व्यवस्था पाहतात. पुणे शहरातील विक्री व्यवस्थापन रोहित शिंदे यांच्याकडे आहे. मुक्त संचार गोठा व्यवस्थापनातून रोहन ताकवले या तरुणाला गावामध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. रोहन पुण्यातील एका मॉलमध्ये कामाला होता. तो पिंगोरी गावातील असल्याने त्याला गोठा व्यवस्थापनाबाबत विचारणा केली. त्याने होकार दिल्यानंतर सावंत डेअरी येथे दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर त्याला गोठ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे.
गोठा व्यवस्थापनाबाबत रोहन म्हणाला, की गोठ्यातील वासरे, दुधाळ गायी, गाभण गायी अशी वर्गवारी करून त्यांना पशुखाद्य आणि चारा दिला जातो. आजारी आणि अशक्त गाईंचे वेगळे व्यवस्थापन केले जाते. त्यांना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार आणि औषधोपचार केले जातात. गोठ्याची दररोज स्वच्छता ठेवली जाते.
शिफारशीनुसार लसीकरण केले जाते. सकाळी, संध्याकाळी यंत्राद्वारे दूध काढून शीतकरण केले जाते. वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी बचत गटातील महिलांच्या शेतीसह गावतील काही शेतकऱ्यांसोबत करार शेती करण्यात येत आहे. त्यांच्याकडून वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होणार आहे. सध्या गोठ्यातील गाईंपासून दररोज २०० लिटर दूध उत्पादन होते. तसेच गावातील शेतकऱ्यांकडून ३०० लिटर दुधाचे संकलन केले जाते. संकलित झालेले दूध पुण्यातील ॲमेनोरा सिटी येथे १५० लिटर, हडपसर येथे ८० लिटर, औंध येथील रोटरी क्लबच्या सदस्यांकडे ५० लिटर दुधाची विक्री होत आहे. उर्वरित १५० लिटर दूध पिरंगुट येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिक शाळेसाठी पाठविले जाते.
‘पिंगोरी गोल्ड- माउंटन मिल्क’ ब्रॅण्ड
पुणे शहरातील ग्राहकांना शुद्ध आणि खात्रीशीर दूध मिळावे यासाठी महिला गटाने ‘पिंगोरी माउंटन काउ’ ब्रॅण्ड तयार केला. यासाठी विशेष लोगो आणि पॅकिंग मटेरिअल वापरण्यात आले आहे. दररोज पिंगोरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पिशवी पॅक दुधाची विक्री पुण्यातील ग्राहकांना केली जाते.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आम्ही फळे भाजीपाला उत्पादन आणि पुरवठ्यामध्ये कार्यरत आहोत. ग्राहकांकडून दुधाची मागणी होऊ लागल्याने आम्ही सामूहिक स्तरावर २५ संकरित गायींचा गोठा उभारला. या गोठ्याचे अर्थकारण स्थिरस्थावर झाल्यावर आम्हाला आणखी २५ संकरित गायी मिळणार आहेत.
- अर्चना शिंदे, ७७६७९५६१९४
अध्यक्षा, वाघेश्वरी महिला दूध उत्पादक कृषी बचत गट
रोटरी क्लब आणि ॲटॉस कंपनीने प्रत्येकीला एक दुधाळ संकरित गाय दिल्याने शाश्वत उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. गाईंचे संगोपन, दूध प्रक्रिया उद्योगातून आम्हाला चांगला आर्थिक नफा मिळणार आहे.
- सुवर्णा शिंदे
(सदस्या, वाघेश्वरी महिला दूध उत्पादक कृषी बचत गट)
दुष्काळग्रस्त पिंगोरी आता जलयुक्त पिंगोरी झाली आहे. भाजीपाला उत्पादनाबरोबर गोपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी आम्हाला रोटरी क्लब आणि ॲटॉस कंपनीने मदत केल्याने सामूहिक गोठा उभा करू शकलो. सामूहिक गोठा केल्याने सदस्यांचे श्रम आणि पैशांची बचत झाली आहे.
- बाबा शिंदे (समन्वयक, सामूहिक गोठा)
गावाच्या विकासासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून पाण्यासाठी तळे उभारण्यात आले. आता महिला गटातर्फे सामूहिक गोठा उभारण्यात आल्याने हक्काचा रोजगार तयार झाला आहे.
- संदीप यादव, सरपंच
पिंगोरी गावातील महिलांना सामूहिक गोठ्यामुळे कायम स्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध झाली. पुढच्या टप्प्प्यात रोटरी क्लबद्वारे दूध प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्नशील आहोत.
- रवी उलंगवार, रोटरी क्लब ऑफ औंध
आर्थिक प्रगतीसाठी आम्ही महिला बचत गटाला पहिल्या टप्यात २५ संकरित गायी दिल्या आहेत. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर सामूहिक गोठ्यातील गाईंची संख्या शंभरावर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
- ब्रिझ सेठी, रोटरी क्लब ऑफ पुणे, स्पोर्ट्स सिटी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.