Spices Production Agrowon
यशोगाथा

Spices Industry : मसाले उद्योगात ‘सुजलाम्’ची भरारी

कृष्णा जोमेगावकर

Agriculture Success Story : नांदेड जिल्हा हळद पिकासाठी प्रसिद्ध आहे. शेजारील हिंगोली व परभणी जिल्ह्यांतही सर्वाधिक क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. यामुळेच केंद्र सरकारने नांदेडची निवड एक जिल्हा- एक पीकयोजनेत केली आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन नांदेडपासून नजीक असलेल्या धनेगाव येथील शेतकरी चांदपाशा शेख यांनी समविचारी शेतकऱ्यांना एकत्र केले. हळद तसेच अन्य शेतीमालांवर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायचे ठरवले. त्यानुसार जून २०२१ मध्ये ॲग्रो जी-वन नावाने कंपनीने स्थापना झाली.

आपल्या भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हळदीला चांगला दर मिळावा हे देखील कंपनी स्थापन करण्यामागील मुख्य उद्दिष्ट होते. कंपनीचेपाच संचालक तर स्थानिक भागातील सुमारे एक हजार शेतकरी सभासद आहेत. संचालकांनी वेगवेगळ्या कामांची जबाबदारी वाटून घेतली आहे.

प्रक्रिया युनिटची संपूर्ण जबाबदारीकंपनीचे अध्यक्ष चांदपाशा शेख स्वतः: सांभाळतात. त्यांचे चिरंजीव मोहम्मद गौस कंपनीचा लेखा विभाग (सेक्रेटरी) तर विपणन व्यवस्था शाईस्ता बेगम सांभाळतात. शेख अन्सार यांच्याकडे खरेदी व्यवहार व शेख अजहर यांच्याकडे कंपनी व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. बाळासाहेब धपाटे- पाटीलकंपनीचे व्यापार प्रमुख आहेत. कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे.

कंपनीची कार्यव्यवस्था

कंपनीने प्रारंभी ‘मिनी प्रोसेसिंग युनिट’ सुरू केले होते. मात्र शेतीमालाची उपलब्धता वाढू लागल्याने प्रक्रिया युनिटही वाढविण्याचा निर्णय घेतला. यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनीप्रकल्प (पोखरा) अंतर्गत प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी मदत झाली. यात २४ लाखांचे अनुदान मिळाले. भारतीय स्टेट बँकेकडून ९५ लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. या संपूर्ण रकमेतून तीन पल्वरायझर्स,तीन ग्राइंडर्स, ग्रेडिंग मशिन्स व पॅकिंग मशिन्स घेणे शक्य झाले आहे.

आधुनिक यंत्रांमुळे उत्पादनांची निर्मिती वेळेत व पूर्ण कार्यक्षमतेने होण्यास मदत झाली. कंपनीने सुमारे सहा हजार ६०० चौरस फूट आकाराची जागा भाडेतत्त्वावरील कराराने घेतली आहे. तेथे सुमारे तीन हजार चौरस फुटात प्रक्रिया युनिट आहे. तर उर्वरित जागेत गोदामाची सुविधा तयार केली आहे. प्रक्रिया उद्योगात कंपनीने बहुतांश सर्व महिला कामगारांची नेमणूक केली आहे. त्या योगे १५ महिलांसाठी हळद, मिरची स्वच्छ करणे, मसाले कांडपासह पॅकिंग आदी कामांसाठी स्थानिक रोजगार तयार झाला आहे.

पंधरा प्रकारची उत्पादने

सुजलाम् या ब्रॅण्डखाली कंपनीने सुमारे १५ उत्पादनांची निर्मिती केली आहे. ५० ग्रॅमपासून ते पाचशेग्रॅम, वीस किलो, पन्नास किलो अशा बाजारपेठेतील मागणीनुसार वजनी पॅकिंगमध्ये ती उपलब्ध केली आहेत. हळद, मिरची व धणे पावडरी तसेच भाजीसाठीचा, गरम, काळा, मटण, चिकन,भुर्जी, बिर्याणी, आमचूर, जलजिरा, चटपटा असे मसाल्यांचे विविध प्रकार तयार केले जातात.

विक्री व्यवस्था

कंपनीने विक्री- विपणनासाठी सुमारे १५ कर्मचारी तैनात केले आहेत. त्याशिवाय विविध जिल्ह्यांमध्ये ८० पर्यंत वितरक नेमले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिवसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर तसेच मुंबई, ठाणे, नाशिक आदी जिल्ह्यांत कंपनीची उत्पादने पोहोचली आहेत. यासोबतच तेलंगण राज्यातील आदिलाबाद, भैसा, निजामाबाद, आसिफाबाद या जिल्ह्यांमध्येही बाजारपेठ मिळवली आहे.

ऑनलाइन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरही कंपनीने आपली उत्पादने सादर केली आहेत. कंपनीने आपल्या जिल्ह्यातील महिला स्वयंसाह्यता गटांना सक्रिय केले आहे. त्यांच्या मार्फत उत्पादनांच्या विक्रीला चालना मिळावी ठरावीक मोबदला देण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

उलाढाल वाढतेय

कंपनीच्या स्थापनेला सुमारे तीन वर्षे झाली आहेत. त्या दृष्टीने या स्टार्ट अपच्या उलाढालीत व कामगिरीत चांगली वाढ करण्याचा संचालकांचा प्रयत्न सुरू आहे. विक्रीच्या पहिल्या वर्षी कंपनीने दोन कोटी रुपयांची उलाढाल केली. तर मागील वर्षी (२०२३-२४) सात कोटी ८२ लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली. यंदाच्या वर्षी कंपनीने आत्तापर्यंत दोन कोटींची उलाढाल पूर्ण केली असून आर्थिक वर्षात एकूण १० कोटींचे उद्दिष्ट ठेवल्याचे कंपनीचे संचालक सांगतात. यंदाच्या वर्षापासून आखाती देशांत थेट निर्यातीचेही प्रयत्न सुरू केले जाणार आहेत.

शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची खरेदी

प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची बहुतांश खरेदी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जाते. यासोबत वसमत (जि. हिंगोली), पूर्णा (जि. परभणी) या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडूही दर्जेदार हळद उपलब्ध होते. धणे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात उपलब्ध होतात. धर्माबाद बाजारसमितीच्या बाजारातही ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. हे धने गावरान असल्याने त्याची चव अधिक सरस असते. त्यामुळे कंपनीच्या धणे पावडरीला मोठी मागणी असते.

नांदेड जिल्हा तेलंगणाच्या सीमेनजीक असल्याने धर्माबाद बाजारात गावरान मिरची उपलब्ध होते. यासोबत तेलंगण राज्यातील वरंगल, गुंटूर या जिल्ह्यात पिकणारी लाल मिरची तेथील शेतकरी उत्पादक कंपनीकडून तसेच त्या भागातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येते. त्यातून तेथील शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होते. कंपनीलाही चांगल्या दर्जाच्या कच्चा माल उपलब्ध झाल्याने बाजारातून ‘सुजलाम्’ ब्रॅणेडच्या मसाल्यांना मागणी वाढल्याचे चांदपाशा शेख सांगतात.

चांदपाशा शेख ७०२०४३९७०२

(अध्यक्ष, ॲग्रो जी-वन शेतकरी कंपनी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे हरभरा दर ?

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’बाबत अपेक्षा

Heavy Rain Damage : पुसदमध्ये अतिवृष्टिग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याची मागणी

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी प्रतीक्षाच

Crop Insurance : पालम तालुक्यातील शेतकरी पीकविमा परताव्यापासून वंचित

SCROLL FOR NEXT