Spices Production : मसाला निर्मितीमध्ये वृंदावन समूहाची आघाडी

Success Story of Spices : फोंडा (ता. कणकवली, सिंधुदुर्ग) येथील विविध बचत गटांतील २१ महिलांनी एकत्र येत वृंदावन उत्पादक समूहाची स्थापना केली. परिसरातील बाजारपेठेची गरज ओळखून समूहातर्फे विविध मसाल्यांची निर्मिती केली जाते.
Spices Industry
Spices IndustryAgrowon

Spices Business : फोंडा हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ. घाटरस्ता होण्यापूर्वी फोंडा येथूनच जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत विविध माल वितरित व्हायचा. त्यामुळे या गावाला पूर्वीपासून महत्त्व आहे. या गावशिवारातील बहुतांश शेतकरी भात, नाचणी लागवड करतात.

अधिकतर महिला गृहिणी आणि शेतीच्या कामात व्यस्त असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २००५ पासून महिला बचत गटाची चळवळ चांगल्या प्रकारे विकसित झाली. या काळात फोंडा परिसरात महिला बचत गट स्थापन झाले. प्रत्येक गट आपापल्या परीने त्या कालावधीत काम करीत होता. परंतु त्यामध्ये सातत्य राहिले नाही.

या कालावधीत मात्र काही बचत गट प्रक्रिया उत्पादन आणि विक्रीमध्ये विविध प्रयोग करीत होते. या काळात फोंडा येथील दुर्गेश्वर महिला बचत गट, आई सावरी बचत गटांतील महिलांनी विविध खाद्य पदार्थ आणि मसाल्याची निर्मिती करून स्वतःची बाजारपेठ तयार केली.

वृंदावन उत्पादक समूहाची सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१८ मध्ये उमेद अभियानाला प्रारंभ झाला. या अभियानाची वर्धिनी फेरी फोंडा येथे आली होती. या फेरीत फोंडा परिसरातील अनेक महिला बचत गट सहभागी झाले होते. या माध्यमातून बचत गटातील महिला उमेद अभियानासोबत जोडल्या गेल्या. याचवेळी उमेद अभियानाच्या माध्यमातून फोंडा येथे महिला बचत गट स्थापन करण्यात आले.

महिला बचत गटांचा ग्रामसंघ स्थापन करण्यात आला. त्यानंतर या गटांतील काही प्रयोगशील महिलांनी एकत्र येत वृंदावन उत्पादक समूह स्थापन केला. सध्या या समूहात २१ महिला सदस्या आहेत.

उत्पादक समूह स्थापन झाल्यानंतर महिलांनी शिस्तीवर भर दिला.आठवडा बैठक नियमित घेणे, गैरहजर राहणाऱ्या सदस्यांवर अकुंश राहावा यासाठी दंडाची तरतूद केली. या महिलांनी उमेद अंतर्गत काही प्रशिक्षण घेतली.

बँकेच्या कामकाजाची माहिती घेतल्याने आता या महिला सर्व व्यवहार करतात. सुरुवातीला वैयक्तिक पातळीवर व्यवसाय करणाऱ्या महिलांना समूहाने कर्जपुरवठा केला. त्यातून काही महिलांनी मसाला, पापड, कुळीथ पीठ या उत्पादनांची निर्मिती करून विक्री सुरू केली.

Spices Industry
Spice Industry : चौदा जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला मुंढे यांचा मसाला उद्योग

गुणवत्तापूर्ण आणि हंगामनिहाय उत्पादने

वृंदावन उत्पादक समूहाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन दररोजच्या आहारात असलेल्या पदार्थांच्या उत्पादनावर भर दिला. याचबरोबरीने दिवाळी फराळ बनविणे, लग्न हंगामात रुखवाताच्या साहित्याची निर्मिती सुरू केली. बारमाही नियमित उत्पादन निर्मितीचा चांगला आर्थिक फायदा समूहाला झाला. याशिवाय महिलांनी सामूहिक पद्धतीने भात आणि नाचणी लागवडीवर भर दिला आहे.

महिला समूहाला सुरुवातीला शासनाकडून १५ हजार रुपयांचा फिरता निधी मिळाला. त्यानंतर व्यवसायवृद्धीसाठी दोन लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून मसाले निर्मितीसाठी विविध घटकांची खरेदी या समूहाने केली आहे. ग्राहकाकडून विविध उत्पादनांना मागणी वाढल्याने समूहाने शासनाकडे बीज भांडवलासाठी चार लाख रुपयांची मागणी केली आहे.

गुणवत्तेवर भर दिल्याने समूहाच्या विविध उत्पादनांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ मिळाली. समूहाने कुडाळ येथे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सिंधुसरस प्रदर्शनात उत्पादनांची विक्री केली. या तीन दिवसांत तब्बल साठ हजार रुपयांची उलाढाल झाली.

सामूहिक पद्धतीने भात लागवड

कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना रत्नागिरी आठ या जातीचे बियाणे पुरविले होते. याचबरोबरीने वृंदावन उत्पादक समूहाला देखील भात बियाणे आणि खते मिळाली होती. कृषी सहाय्यक अक्षया परब यांनी समूहातील महिलांना श्री पद्धतीने भात लागवडीबाबत माहिती दिली.

त्यानुसार समूहातील महिलांनी स्वतःच्या शेतीमध्ये सामूहिक पद्धतीने श्री पद्धतीने भात लागवड केली. रोपवाटिका तयार करणे, रोपांची पुनर्लागवड करणे, पीक व्यवस्थापन तसेच कापणी,झोडणी ही सर्व कामे या महिलांनी केली होती. यातून पारंपरिक लागवडीपेक्षा चांगले भात उत्पादन मिळाले.

महिला समूहाचे वैशिष्ट

२००७ पासून उत्पादनांचा अनुभव.

२०२१ पासून सामूहिकरीत्या उत्पादन निर्मितीवर भर.

विविध बचत गटातील २१ महिलांनी एकत्र येत तयार केला उत्पादक समूह.

समूहातर्फे भाजका मसाला, कच्चा मसाला, तांदूळ पापड, नाचणी पापड, पोहे पापड, कुरडई, कुळीथ पीठ, सांडगे, सांडगे मिरची, ताक मिरची, वडा पीठ, घावन पीठ, डांगरपीठ, मेतुकट, चिंच गोळे, आंबा साठ, आंबा पोळी, कच्चा आंबा, आदी उत्पादनांची निर्मिती.

दिवाळीत लाडू, करंजी, चिवडा, चकली, शंकरपाळी आदी फराळ पदार्थांची निर्मिती. लग्नसराईमध्ये रुखवत आदी साहित्याची निर्मिती आणि विक्री.

वैयक्तिक पातळीवर काही महिला शेतीमध्ये चवळी, मटकी उत्पादन घेतात. याशिवाय परसबागेत कुक्कुटपालन करतात.

उत्पादक समूहाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महिला चहा, नाश्‍ता, जेवणाचा मागणीनुसार ग्राहकांना पुरवठा करतात. यातून त्यांना चांगला नफा मिळतो.

Spices Industry
Spices Price : तडक्याचा लागणार ठसका! मसाल्याचे कितीने वाढले भाव जाणून घ्या

उत्पादन आणि दर (प्रति किलो)

भाजका मसाला ८०० ते ८५० रुपये, कच्चा मसाला ६५० ते ७०० रुपये, तांदूळ पापड, पोहे पापड, कुरडई २८० रुपये, सांडगे मिरची ८०० रुपये, कुळीथ पीठ ३५० रुपये, मेतकुट, उडीद पीठ ३५० रुपये.

कच्चा मालाच्या किमतीवर उत्पादनांचे दर निश्चित केले जातात. या वर्षी मिरचीचा दर ६०० रुपयांपर्यंत गेल्यामुळे भाजका मसाल्याचे दर वाढले आहेत. यंदाच्या वर्षी समूहाने मसाला विक्रीतून पन्नास हजारांची उलाढाल केली.

बाजारपेठेत मागणी

फोंडा गावातील ग्राहक विविध उत्पादनांची थेट समूहातील सदस्यांकडून खरेदी करतात. याचबरोबरीने कणकवली शहरातील काही व्यापारी वर्षभर समूहाकडून विविध मसाल्यांची खरेदी करतात.

जिल्ह्यातील सिंधूसरस कृषी प्रदर्शन याशिवाय इतर प्रदर्शनात विविध उत्पादनांची विक्री.

वृंदावन उत्पादक समूहातील महिला दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करून परिसरातील बाजारपेठेत विक्री करतात. यातून चांगली उलाढाल होते. महिला आता स्वतः बॅंकेचे सर्व व्यवहार करतात.
सोनाली कोदे,(सीआरपी,उमेद)
महिला समूहाच्या माध्यमातून आम्ही विविध उत्पादनांची निर्मिती करतो. टप्प्याटप्प्याने या व्यवसायात आम्ही वाढ केली आहे. सर्वच सदस्य सक्रियपणे काम करतात.त्यामुळे भविष्यात अधिक उत्पादन निर्मिती करण्यासाठी काही यंत्रांची आम्ही खरेदी करणार आहोत.
- प्रमिला प्रकाश लाड, ९६९९५९०७७६ (अध्यक्ष,वृदांवन उत्पादक समूह)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com