Spices Production : कोल्हापुरी मसाल्याचा ‘चिकोत्रा ब्रॅण्ड’

Agriculture Success Story : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे अनुराधा मोहन पाटील यांनी प्रक्रिया उद्योगाची आवड आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन खास कोल्हापुरी चवीच्या कांदा लसूण मसाला निर्मितीला सुरुवात केली.
Spices Production
Spices ProductionAgrowon
Published on
Updated on

राजकुमार चौगुले

Kolhapur News : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे अनुराधा मोहन पाटील यांनी प्रक्रिया उद्योगाची आवड आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन खास कोल्हापुरी चवीच्या कांदा लसूण मसाला निर्मितीला सुरुवात केली. स्वतःच्या शेतीमध्ये विविध पिकांची लागवड करत गेल्या दहा वर्षांत सात प्रकारच्या मसाल्यांच्या निर्मितीतही त्यांनी हातखंडा मिळवला आहे. चिकोत्रा गृह उद्योगामध्ये गावातील दहा महिलांना रोजगारदेखील दिला आहे.

कागल तालुक्यातील चिकोत्रा खोरे. काही वर्षांपूर्वी कोरडवाहू असणारा हा भाग चिकोत्रा प्रकल्‍पामुळे हिरवा झाला. याच परिसरातील बेलेवाडी काळम्मा (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील अनुराधा मोहन पाटील या उपक्रमशील प्रक्रिया उद्योजिका आहेत. त्यांचे सासरे आनंदराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील मोठे प्रस्थ. पतीही सेवा निवृत्त प्राध्‍यापक. पाटील कुटुंबाची साडेनऊ एकर शेती आहे. दहा वर्षांपूर्वी अनुराधाताईंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन घरगुती चवीचा खास कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला, तसेच बिर्याणी मसाला, सांभार मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, गोडा मसाला, गरम मसाला निर्मितीला सुरुवात केली. आज देश, परदेशात त्यांच्या मसाल्याचे ग्राहक पसरले आहेत.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात ः
अनुराधा पाटील यांचे शिक्षण बीए (अर्थशास्त्र) पदवीपर्यंत झाले आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आईनी त्यांना मोठ्या प्रमाणात स्वतःसाठी कांदा-लसूण मसाला करायला सांगितला. पण काही कालावधीनंतर हा मसाला घ्यायच्या त्या विसरल्या. आता इतक्या मसाल्याचे करायचे काय, म्हणून त्यांनी बहिणाला संपर्क केला. बहिणीच्या पतीने त्यांच्या मुंबई कार्यालयातील सहकाऱ्यांना या मसाल्याचे सॅंपल दिले. लोकांना हा गावरान चवीचा मसाला आवडला. कार्यालयातील एका सहकाऱ्याने चार किलो मसाल्याची मागणी नोंदवली आणि अनपेक्षितपणे प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली. यातून पुढे तीस किलो मसाल्याची पुन्हा मागणी मिळाल्याने आत्मविश्‍वास मिळाला, घरच्यांचीही साथ मिळाली. सुरुवातीच्या काळात अनुराधा पाटील यांनी परिसरातील भिशी मंडळातील महिलांना घरगुती मसाल्याची चव दाखवत ग्राहक मिळविण्याचा प्रयत्न केला. मित्र मंडळी, सहकारी तसेच पुणे शहरातील ग्राहकांच्या मागणीतून मसाल्याची मागणी वाढत गेली. घरगुती स्तरावर तयार केलेल्या मसाल्यांची विक्री आता वर्षाला सुमारे चारशे किलोपर्यंत पोहोचली आहे.

Spices Production
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्ड

मिरची लागवडीवर भर ः
अनुराधाताई स्वतःच्या शेतात दरवर्षी एक एकरावर जवारी, संकेश्‍वरी, लवंगी मिरची लागवड करतात. तसेच उपलब्ध क्षेत्रानुसार कांदा, लसूण, तीळ, कोथिंबीर, आले, मेथी, मोहरी आदी पिकांची हंगामानुसार लागवड केली जाते. बांधावर नारळ लागवड केली आहे. या पिकांसाठी सेंद्रिय खते, सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करतात. या पिकांचे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे व्‍यवस्‍थापन त्या स्वतः करतात. काढणीनंतर त्याची साठवण करून ठेवली जाते. ब्याडगी, काश्मिरी आदी मिरच्या त्या खात्रीशीर दुकानातून खरेदी करतात. अनुराधाताईंचा मुलगा आणि सून पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. यामुळे त्या काही दिवस बेलेवाडी आणि काही दिवस पुण्यात असतात. याचा मोठा फायदा मसाला विक्रीसाठी होतो.

मसाला निर्मितीला चालना ः
उन्हाळ्यामध्ये कांडप यंत्र सुरू असल्याने बहुतांश मसाला निर्मिती या कालावधीत केली जाते. उन्हाळ्याच्या कालावधीत अनुराधाताईंचा मुक्काम बहुतांशी करून बेलेवाडीमध्ये असतो. प्रामुख्याने फेब्रुवारी आणि मे महिन्याच्या कालावधीत स्‍थानिक दहा महिलांना रोजगार देत घरगुती स्तरावर विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती केली जाते. मसाल्यासाठी लागणारे घटक कुटण्यापासून ते मसाला तयार करण्यापर्यंत कोल्हापुरी पारंपरिक पद्धत वापरली जाते. लाकडी घाण्यावरील शेंगतेलाचा वापर केल्याने मसाला दीर्घकाळ टिकतो, असा त्यांचा अनुभव आहे.


मिळविली शहरी बाजारपेठ ः
मसाला विक्रीबाबत अनुराधाताई म्हणाल्या, की बाजारपेठेत उत्पादनांची वेगळी ओळख तयार होण्यासाठी ‘चिकोत्रा गृह उद्योग’ हा ब्रॅण्ड तयार केला. पॅकिंग डिझाइन स्वतःच्या कल्पकतेने तयार केले आहे. मसाला तयार केल्यानंतर शंभर ग्रॅम, पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलोपर्यंत पॅकिंग केले जाते. पॅकिंग करून स्‍वतःच्या गाडीने मसाला पाकिटे पुण्यात आणली जातात. तेथून कुरिअरने मागणीप्रमाणे पुरवठा केला जातो. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरी चवीचा मसाला बेलेवाडी येथील घरी तयार करते. कांदा- लसूण मसाला बाराशे रुपये किलो आणि इतर मसाले १६० ते १७५ रुपये प्रति १०० ग्रॅम या दराने विक्री होते. मसाला विक्रीतून तीस टक्क्यांपर्यंत नफा राहतो.
पुण्यातील काही स्थानिक विक्रेत्यांकडे मसाला विक्रीसाठी ठेवला जातो. मागणीनुसार विक्रेत्यांना पुरवठा केला जातो. सोशल मीडियामुळे गुजरात, झारखंड, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यांतून नियमित ग्राहकांची मागणी असते. मसाला विक्रीसाठी विविध संस्‍थांच्या वतीने आयोजित प्रदर्शनामध्ये माझा सहभाग असतो. यातून ग्राहकांशी थेट संपर्क साधता येतो. विविध मसाल्यांच्या बरोबरीने माडग पीठ आदी चविष्ठ व आरोग्यदायी स्थानिक प्रक्रिया पदार्थ गावातील महिलांकडून तयार करून घेऊन त्याचीही विक्री केली जाते. या उपक्रमातून ग्रामीण भागातील गरजू महिलांना वर्षभर रोजगार देण्याचा प्रयत्न आहे.

परदेशातही ग्राहक ः
अनुराधा पाटील सोशल मीडियातून मसाला उत्पादनांची माहिती ग्राहकांना देतात. जी मुले, कुटुंबीय शिक्षण, नोकरीसाठी परदेशात आहेत, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळा आणि नाताळच्या सुट्टीत मसाल्याची खरेदी होते. त्यामुळे परदेशातही कायमस्वरूपी ग्राहक तयार झाले आहेत.
----------------------------------------------------
संपर्क ः अनुराधा पाटील, ९८९०२३४६३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com