Spices Production : घरगुती मसाले निर्मितीत हातखंडा

Agriculture Success Story : विविध मसाल्यांबरोबर प्रीमिक्स, चटणी मसाले, इतर चटण्या असे मिळून सुमारे साठ प्रकार त्या तयार करतात.
Spices Production
Spices ProductionAgrowon

Agriculture Success Story : इचलकरंजी वस्त्रोद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. या गावामध्येच रूपालीताईंचे माहेर आणि सासर आहे. लग्न झाल्यानंतर त्या गणेशनगर भागात सासरी आल्या. २०१० पर्यंत त्या घरकाम करत होत्या. मात्र काही वर्षांनी पती आनंदा यांच्या आजारपणामुळे कौटुंबीक आर्थिक अडचण तयार झाली.

याच वेळी रूपालीताईंनी आर्थिक मिळकतीच्या दृष्टीने मसाला निर्मिती सुरू करण्याचे ठरविले. याबाबत त्यांनी विविध ठिकाणांहून माहिती घेण्यास सुरुवात केली. स्वयंपाकाची आवड असल्याने त्यांनी २०१७ पासून घरगुती स्तरावर मसाला निर्मिती सुरू केली.

या दरम्यान त्यांना मसाला निर्मिती ते विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सौ. गंधाली दिंडे यांचे चांगले मार्गदर्शन मिळू लागले. पहिल्या टप्यात ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गरम मसाला, पुलाव मसाला, मटण मसाला आदी मसाले तयार केले. सुरुवातीला पाहुणे, मित्र मंडळींना तयार मसाले देऊन चवीचा अंदाज घेतला. मसाले चांगले होत असल्याचे लक्षात आल्यानंतर विक्रीचे नियोजन सुरू झाले.

सुरुवातीला साध्या पॅकिंगमधूनच स्थानिक ठिकाणी किरकोळ स्वरूपात विक्री सुरू केली. यानंतर स्थानिक बाजारपेठेत हळूहळू व्यवसाय वाढविला. या दरम्यान मसाला निर्मिती उत्पादन वाढविण्यासाठी कर्ज काढून पल्व्हरायझर, रोस्टर, बॅंड सिलर, मोठा मिक्सर आदी यंत्रसामग्री विकत घेतली. गेल्या दोन वर्षांत यांत्रिकीकरणाच्या जोरावर त्यांनी काही किलोवरून आता टनांपर्यंत मसाले निर्मितीपर्यंत मजल मारली आहे.

घरच्यांची मिळाली साथ

मसाला निर्मिती व्यवसाय यशस्वी करण्यात रूपालीताईंना माहेरचे नातेवाईक तसेच घरच्या सदस्यांची सातत्याने मदत होत असते. प्रत्येक दुकानदारांकडे जाणे, मसाल्याची माहिती देणे आदी कामे आव्हानात्मक होती. मात्र त्यांना यासाठी पती आनंदा यांनी चांगली मदत होत आहे. या बरोबरच मसाल्याची सर्वत्र ओळख होण्यासाठी त्यांनी प्रदर्शनातील सहभागावर अधिक भर दिला.

कोल्हापूर, सांगली भागांत होणाऱ्या प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेऊन ग्राहकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. यातून त्यांना जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील ग्राहकांकडून मसाल्याची मागणी येऊ लागल्याने उत्साह वाढला. घरची स्वतःची जागा असल्याने त्यांनी तेथेच मसाले निर्मिती केली जाते. यासाठी त्यांना पतीबरोबरच पीयूष आणि श्रेयस या दोन मुलांची चांगली साथ मिळाली आहे.

Spices Production
Spice Industry : चौदा जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला मुंढे यांचा मसाला उद्योग

मसाला निर्मितीचे नियोजन ः

सकाळी दहा वाजता घरचे काम आवरल्यानंतर रूपालीताई मसाला निर्मितीस प्रारंभ करतात. सर्व कच्चा माल स्थानिक ठिकाणाबरोबर कोल्हापूर, सांगली बाजारपेठेतून आणला जातो. कच्चा माल आणल्यानंतर स्वच्छता केली जाते. कच्चा माल निवडताना दर्जा पाहिला जातो. कारण यावरच मसाल्याची चव अवलंबून असते. दोन महिला मसाले तयार करण्यासाठी आणि दोन महिला मसाला विक्रीचे काम पाहतात. मागणीनुसार कोणता मसाला तयार करायचा याचा अंदाज घेऊन निर्मिती केली जाते. मसाला तयार करताना वेळेची मर्यादा पाळली जाते.

अतिरिक्त मसाले तयार करून ठेवले जात नाहीत. ठरावीक कालावधीतच मसाल्यांची विक्री करणे गरजेचे असते. जादा कालावधी झाल्यानंतर चव बिघडण्याची शक्यता असते. हिवाळ्यात मसाल्यांची अधिक विक्री होते. दिवाळीमध्ये चिवडा, चकली मसाल्याची अधिक विक्री होते.

कोजागिरी पोर्णिमेच्या दरम्यान दूध मसाल्याची विक्री होते. मसाल्याचे पाच ग्रॅमपासून एक किलोपर्यंतचे पॅकिंग होते. कमीत कमी पाच रुपये पाऊचपासून पुढे किलोपर्यंत मसाला पॅकेट विकले जातात. विक्रीनंतर सातत्याने ग्राहकांकडून दर्जाबाबत अभिप्राय घेतला जातो. त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर केल्या जातात.

Spices Production
Spices Production : मसाला निर्मितीमध्ये वृंदावन समूहाची आघाडी

मसाल्याचा ‘तेजम’ ब्रॅंड

रूपालीताईंनी मसाला विक्रीसाठी ‘तेजम’ ब्रॅंड तयार केला आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार गरम, सांबर, पावभाजी, गोडा मसाला, चिकन, मटण, चाट, मालवणी, किचन किंग, अख्खा मसूर, छोले, मिसळ, पंजाबी, व्हेज पुलाव, बिर्याणी, चिवडा, भडंग, चकली, चहा दूध आदी मसाले तयार केले जातात.

याशिवाय कांदा-लसूण चटणी, काळे तिखट, जैन चटणी, शुगर स्पेशल कारले चटणी आदी चटण्या तयार केल्या जातात. मागणीनुसार पंजाबी रेड ग्रेव्ही, शेवया खीर, मूगडाळ खिचडी, फालुदा, इडली डोसा, मसाले भात, कढीपत्ता, आवळा सरबत आदी पदार्थही तयार करून विविध ठिकाणी विक्री केली जाते. शेंगदाणा, जवस, कारळा, मेतकुट चटण्यांनाही ग्राहकांची चांगली मागणी असते.

विकसित केली बाजारपेठ

मसाले तयार झाल्यानंतर तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोच केले जातात. बहुतांशी विक्री रोखीने होते. शहरातील नामवंत निवासी शाळा, हॉटेल व्यावसायिक हे मसाल्याचे नियमित ग्राहक आहेत. अनेक ग्राहक स्वतः येऊन मसाल्यांची खरेदी करतात. अनेक जण दरवर्षी परदेशी नातेवाइकांकडे मसाले पाठवितात.

विशेष करून थालीपीठ भाजणी, फालुदा मिक्स आदी उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. किराणा दुकान, बेकरी व्यावसायिकांनीही मसाल्यांना पसंती दिली आहे. दरवर्षीच्या उलाढालीतून पंचवीस टक्क्यांपर्यंत निव्वळ नफा राहतो. घरखर्च वगळता व्यवसायातील नफा व्यवसायात गुंतवला जातो. पुढील काळात रोटो मशिन आणून पॅकिंगमध्ये बदल करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

संपर्क ः सौ. रूपाली म्हेतर, ९४२३२७५४११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com