Dairy Business Agrowon
यशोगाथा

Dairy Business : आईच्या शिकवणीमुळेच दुग्धव्यवसायात प्रगती

विकास गाढवे

Agriculture Success Story : भिसेवाघोली (ता. जि. लातूर) येथील गणेश पानखडे (वय वर्षे २६) यांचा दुग्धव्यवसायातील चौदा वर्षांचा अनुभव संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. कुटुंबाची सुमारे सहा एकर शेती असून त्यात सोयाबीन हे मुख्य पीक व चारा पिके असतात. वडील तुकाराम शेतीसह किराणा व्यवसायात गुंतले होते. त्यावेळी आई आशाबाई घरच्या जबाबदारीसह शेतीचाही भार सांभाळत.

घरच्या दोन म्हशीही होत्या. आईकडून गणेश यांना शेती व दुग्धव्यवसायाचे बाळकडू मिळाले. कोरोना काळात आईचे निधन झाले. त्यानंतर शेतीची मुख्य जबाबदारी गणेश यांच्याकडे आली. ते दहावीत असताना ज्या म्हशीचे दूध काढायला शिकले त्या लक्ष्मी म्हशीचा आवडीने सांभाळ करीत आहेत. तिचे आत्तापर्यंत १३ वेत झाले असून सध्या ती गाभण आहे.

दुग्धव्यवसायाची जुळली नाळ

मध्यंतरीच्या काळात कुटुंबाला दुग्धव्यवसायातील एका प्रतिकूल घटनेला सामोरे जावे लागले. काही काळ कुटुंबाला नैराश्‍य आले. परंतु त्यातून सावरत वडिलांनी मांजरा शेतकरी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष (कै.) ॲड. बी. व्ही. काळे यांच्याकडून दोन गायी आणल्या. त्यामुळे गणेश यांना उत्साह आला. सन २०१० पासून ते जोमाने मन लावून कालवडींचे संगोपन करू लागले.

विकत घेऊन गायींची संख्या वाढवणे शक्य नव्हते. त्यामुळे गोठ्यातच पैदास करण्यावर भर दिला. त्यातून गायींची संख्या दोनवरून २२ पर्यंत नेण्यात यश मिळाले. आजमितीला १२ गायी (एचएफ), चार कालवडी व दोन म्हशी असे पशुधन आहे. सुमारे १४ वर्षात सुमारे २५ गायींच्या विक्रीची उलाढाल केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले. काही गायी शेतकऱ्यांना मोफतही दिल्या.

चाऱ्याचे गणित समजले

दीड एकरांत नेपियर गवताची लागवड केली आहे. सुमारे ५५ दिवसांत हा चारा बारा फूट उंचीपर्यंत वाढतो. वर्षाला तीन हजार कडबा, वाळलेला ऊस, सोयाबीन व हरभरा गुळीची खरेदी केली जाते. प्रति जनावराला दररोज २५ किलो जारा व चार किलो खुराक दिला जातो. सरकी, मका भरडी, खापरी, , मिनरल मिक्चर आदी खुराक भिजवून व कालवून दिला जातो.

सुरवातीला गणेश दोनपेक्षा अधिकवेळा चारा खाऊ घालायचे. त्यामुळे पोट गच्च होऊन गायी आजारी पडू लागल्या. त्यानंतर चाऱ्याचे गणित कळाले. दिवसातून दोनवेळा दूध काढल्यानंतर गरजेनुसारच चारा देण्यास सुरवात केली. त्याचा परिणाम चांगला झाला. गायींचे आजार कमी झाले. दूध उत्पादनात वाढ झाली.

आईचे संस्कार, पहाटे पाचपासून काम

गायींचे नियमित लसीकरण करण्यात येते. दीर्घ अनुभवातून आजार, निदान व उपचारांचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे गरज भासली तरच पशुवैद्यकांची मदत घेण्यात येते. अन्यथा स्वतः काही औषधोपचार करण्यावर भर असतो. पूर्वी शेतीला रस्ता नव्हता. आई चिखल तुडवत घरापासून दीड किलोमीटरवर असलेल्या शेतात पहाटे पाच वाजता जायची. सकाळी कामे करून दूध घेऊन यायची. गायींची संख्या वाढली.

दूध काढण्याचे यंत्र नव्हते. तेव्हा ती ८० लिटरपर्यंत दूध हाताने काढायची. तिचे संस्कार व वारसा गणेश यांनी कायम ठेवला आहे. ते दररोज पहाटे पाच वाजता कामास सुरवात करतात. अधिक उत्पादनक्षम गायींचे दूध ‘मशिन’ द्वारे तर उर्वरित गायींचे दूध हाताने काढतात. ओसूर (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील गंगाधर कवडे येथील गोठ्यात २०१७ पासून कामाला असून कुटुंबीयांसह शेतात वास्तव्याला आहेत. त्याशिवाय गणेशही कष्ट उचलतात. पशुखाद्य विक्री केंद्र, शेती व प्रापंचिक व्यवहार सांभाळतात.

कुटुंबाची प्रगती

दुग्धव्यवसायामुळे पानखडे यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचा ताजा स्रोत तयार झाला. समृद्धी व रूद्र अशी दोन मुले असून त्यांचे शिक्षण चांगल्या प्रकारे करणे शक्य झाले. ट्रॅक्टर खरेदी करून त्यातून व्यवसाय सुरू केला. वर्षाला चाळीस ट्रॉलीपर्यंत शेणखत मिळते. काही शेतीसाठी ठेवून उर्वरित विक्री केली जाते. पशुखाद्य विक्रीतूनही उत्पन्न मिळते. गणेश आता अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात. वडिलांबरोबर पत्नी विश्वमेघा यांचीही समर्थ साथ मिळते. बहिण शुभांगी लातूर येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे.

दुग्धव्यवसायातील बाबी

  • ११० बाय १४ फूट आकाराचा व पत्र्याचे शेड असलेला गोठा. ४० बाय ३५ फूट आकाराचा पाचटीचा अन्य गोठा. उन्हाळ्यात जनावरे तेथे बांधली जातात.

  • तीन गुंठे जागेत मुक्तसंचार गोठ्यासह शेळी व कुक्कुटपालनाचे नियोजन.

  • कालवडी संगोपनाचे कौशल्य अवगत झाले आहे. नऊ महिन्याच्या चार कालवडी कृत्रिम रेतनाद्वारे १८ महिन्यात दुधावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

  • दररोज ७० ते ८० लिटर दूधसंकलन. मदर डेअरीकडून जागेवरच खरेदी.

  • ३.७ ते चारपर्यंत फॅट व ८.५ ते ८.७ पर्यंत एसएनएफ मिळते. त्यास लिटरला २८ ते ३० रुपये दर मिळतो.

  • म्हशीपासून दररोज सात लिटरपर्यंत दूध मिळते. ते कुटुंबासाठी उपयोगात आणले जाते. घरी पाच ते सात किलो तूप कायम.

दुग्धव्यवसाय चिकाटीचा, कसरतीचा व खर्च भरपूर व नफा कमी असलेला व्यवसाय आहे. मात्र आईची शिकवण पदोपदी कामी येत आहे. आईची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. आई जशी चिवटपणे झोकून देऊन काम करायची, त्याच पद्धतीने मीही नेटाने व्यवसाय करतो.
- गणेश पानखडे, ९५६१८७८९९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nagar Rain Update : नगर जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Crop Harvesting : खरिपातील पिकांच्या काढणीला पावसाचा अडथळा

Banana Market: नवरात्रीमुळे केळीचे भाव टिकून राहण्याचा अंदाज

Assembly Election : शेवगाव-पाथर्डी मतदार संघात आमदारकीसाठी ‘रस्सीखेच’

Palm Oil Import : भारताकडून एक लाख टन पामतेल आयातीचे सौदे रद्द

SCROLL FOR NEXT