Dairy Business : नियोजनातून वाढवला दुग्ध व्यवसाय

Dairy Farming : सातारा जिल्ह्यातील मांडवखडक (ता. फलटण) येथील आरती सस्ते यांनी पती आप्पासो यांच्या मदतीने दुग्धव्यवसायात प्रगती साधली आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

Dairy Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : गोपालन

शेतकरी : आरती सस्ते

गाव : मांडवखडक, ता. फलटण, जि. सातारा

एकूण गाई : २०

सातारा जिल्ह्यातील मांडवखडक (ता. फलटण) येथील आरती सस्ते यांनी पती आप्पासो यांच्या मदतीने दुग्धव्यवसायात प्रगती साधली आहे. दोन गाईंपासून सुरू केलेला दुग्धव्यवसाय तब्बल ३० गाईंवर पोचला आहे. व्यवसायात नियोजन, चिकाटी, शिकण्याच्या वृत्ती या बाबींचे काटेकोर पालन करत यश संपादन केले आहे. सध्या गाईंपासून प्रतिदिन अडीचशे लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळत आहे.

आरतीताई वाणिज्य शाखेतील पदवीधर असून गोपालनातील कसलाही अनुभव त्यांना नव्हता. असे असताना देखील त्यांनी २०१४ मध्ये एक गाय खरेदी केली. मात्र ही गाय गाभण असताना मरण पावली. गोपालनासाठी घेतलेली पहिलीच गाई मरण पावली तरी तरी सस्ते दांपत्य निराश झाले नाही. घरचा एक बैल विकून त्यांनी दुसरी गाय खरेदी केली. घरासमोरील बंदिस्त गोठ्यात गाईचे संगोपन सुरू केले. व्यवस्थापनातील बाबींची माहिती गोळा करण्यास सुरवात केली. फलटण येथील दूध संघाकडून प्रोत्साहन व प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळू लागले. हळूहळू गाईंची संख्या वाढवीत नेली. या दरम्यान गोपालनासाठी मुक्तसंचार गोठा पद्धती फायदेशीर असल्याचे सस्ते दांपत्याच्या लक्षात आले. त्यातूनच मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली.

Dairy Business
Dairy Business : दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड

मुक्त संचार गोठ्याची उभारणी

सध्याच्या परिस्थितीत या घरासमोर आधी ४० बाय ४० बंदिस्त गोठा होता. त्याचा विस्तार करत १०० बाय ४० फूट लांबी रुंदीचा मुक्तसंचार गोठा तयार केला. या गोठ्यात एकही गाई बाहेरून खरेदी आणलेली नाही. सर्व गायी गोठ्यातच तयार केल्या आहेत. सध्या गोठ्यात लहान-मोठ्या मिळून ३० गायी आहेत. यामध्ये २९ एचएफ व एक देशी गाय आहे. सध्या दोन्ही वेळचे मिळून प्रतिदिवस २७० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळत आहे.

Dairy Business
Dairy Farming : सचोटी, प्रामाणिकता अन् एकीतून यशस्वी दुग्ध व्यवसाय

व्यवस्थापनातील बाबी

सकाळी सहा वाजल्यापासून गोठ्यातील कामांना सुरुवात होते.

प्रथमतः गाई सकाळी गोठ्यात बांधून त्यांना पशुखाद्य दिले जाते. दुभत्या गाईंना आणि कालवडींना क्षमतेनुसार खाद्य दिले जाते.

दूध काढण्यापूर्वी प्रत्येक गाईची कास स्वच्छ धुतली जाते. जेणेकरून जंतुसंसर्ग होऊ नये. दूध काढण्यासाठी दूध काढणी मशिनचा वापर केला जातो. ही मशिन देखील दररोज गरम पाण्याने स्वच्छ धुतली जाते. त्यामुळे सडांना होणारा संसर्गाचा धोका कमी होतो.

दूध काढल्यानंतर गाईंना मुक्त संचार गोठ्यात सोडले जातात. दररोज फक्त सकाळी अडीच तास व सायंकाळी अडीच तास गाई बंदिस्त गोठ्यात बांधल्या जातात.

आहार व्यवस्थापन

ओल्या चाऱ्यात सुपर नेपियर व मक्याचा वापर केला जातो. गाईंना पोषक हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी अर्धा एकरमध्ये चारा पिकांची लागवड केली आहे.

आरोग्य व्यवस्थापन

प्रत्येक दहा दिवसांनी मुक्तसंचार गोठ्यातील शेण बाहेर काढले जाते. त्यानंतर गोठ्याची स्वच्छता केली जाते.

नियमितपणे विविध आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. वर्षातून एकदा लाळ्या खुरकूत, लम्पी त्वचा आजार लसीकरण तसेच इतरही लसीकरण पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने केले जाते.

प्रत्येक गाईला टॅंगिग केले आहे. गाईंच्या आरोग्य, आहार आणि रेतनाच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात.

आरती सस्ते, ९३०७११०२३६

(शब्दांकन : विकास जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com