Soybean Price Support: देशात यंदा सोयाबीन उत्पादन कमी होऊनही दर कमीच आहे. पण महाराष्ट्राची हमीभावाने आणि मध्य प्रदेशची भावांतरमधून खरेदी पूर्ण झाल्यानंतर आवक कमी होऊन दराला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांमध्ये विक्रीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हमीभावाचाच पर्याय योग्य असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बियाणे दर्जाच्या सोयाबीनला चांगला दर मिळविण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे सोयाबीन ठेवण्यास हरकत नाही, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..देशात यंदा सोयाबीनची लागवड जवळपास १० टक्क्यांनी कमी झाली होती. त्यानंतर सोयाबीन पिकाला पावसाने जोरदार दणका दिला. केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर मध्य प्रदेश, राजस्थान याही राज्यांमध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. उत्पादकता कमी झालीच शिवाय गुणवत्ताही कमी झाली आहे. तरीही बाजारात सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. सोयाबीनचा हमीभाव यंदा ५ हजार ३२८ रुपये आहे. तर बाजारात सोयाबीन प्रति क्विंटल सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयाने विकले जात आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आणि सरासरी बाजारभाव यात जास्त फरक दिसत आहे. .त्याचे कारण म्हणजे बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता कमी असलेल्या मालाचे प्रमाण जास्त असल्याचे व्यापारी सांगत आहे. प्रक्रिया प्लांट्सचे दर मागील आठवडाभर ४ हजार ६५० ते ४ हजार ७५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान राहिले. तसे पाहिले तर प्रक्रिया प्लांट्स आणि बाजारातील सरासरी दर यातील फरक ३०० ते ४०० रुपयांपेक्षा जास्त नसावा. पण सध्याचा फरक जास्त आहे. व्यापारी सांगतात त्याप्रमाणे सोयाबीन खरेच बाजारातील मालामध्ये कमी गुणवत्ता असलेल्या सोयाबीनचे प्रमाण जास्त आहे, की ही एक खेळी आहे? हे शेतकरी सांगू शकतात. पण यंदा उत्पादन कमी आणि दरही कमी, अशी परिस्थिती आहे..उत्पादनाचे अंदाज?देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी झाले, हे मागील महिनाभरापासून पुढे आले आहे. पण जसे सोयाबीनची काढणी पूर्ण होत गेली आणि शेतकऱ्यांना उत्पादकतेचा अचूक अंदाज येत गेला तसे उत्पादन किती कमी आहे? हे देखील स्पष्ट होत गेले. आतापर्यंत सोयाबीन उत्पादनाविषयीचे अंदाज पाहिल्यानंतर सोयाबीन उत्पादन १६ ते २० टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट होते. तसेच विविध संस्थांच्या अंदाजात आतापर्यंत जास्त तफावत दिसत नाही. .यंदा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक सर्वच राज्यांमध्ये उत्पादनाला फटका बसला. असे शक्यतो घडत नाही. पण यंदा पावसाने देशभरात सोयाबीन पिकाला जोरदार दणका दिला. ‘सोपा’च्या अंदाजानुसार यंदा उत्पादन १०५ लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल. तर विविध व्यापारी संस्था आणि प्रक्रियादारांच्या मते, यंदा उत्पादन ९५ ते १०० लाख टनांच्या दरम्यान होईल. म्हणजेच यंदा उत्पादन कमी झाल्याचे सर्वांचे म्हणणे आहे..सोयापेंड उत्पादनही कमी होणार?देशातील सोयाबीन उत्पादन कमी झाले. सोबतच गेल्या वर्षीचे सोयाबीनही कमी प्रमाणात शिल्लक आहे. २०२३-२४ मध्ये हंगाम सुरू झाला तेव्हा २४ लाख टन सोयाबीन शिल्लक होते. मागच्या वर्षी हंगाम सुरु झाला तेव्हा जवळपास ९ लाख टन सोयाबीन शिल्लक होते. मात्र यंदा केवळ ४ लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन शिल्लक आहे. म्हणजेच यंदा पुरवठाच कमी आहे. यंदा सोयाबीनचा पुरवठा १०५ ते ११० लाख टनांच्यावर नसेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोयापेंडीचा साठा नगण्य आहे. .यांपैकी थेट वापर आणि बियाण्यासाठी १२ ते १५ लाख टन जाते. म्हणजेच गाळपासाठी ९० ते ९५ लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन उपलब्ध असेल. यातून ७५ ते ८० लाख टनांपेक्षा जास्त सोयापेंड उत्पादन होणार नाही. देशात मागील हंगामात पशुखाद्य आणि इतर क्षेत्रात ७० लाख टन सोयापेंडीचा वापर झाला होता. हा वापर यंदा कायम राहिला किंवा.काहीसा कमी झाला तरी भारतात गेल्या वर्षीपेक्षा सोयापेंडीचा शिल्लक साठा निम्म्यावर असेल. गेल्या वर्षभरात देशातून २० लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती. यंदा एवढी निर्यात करावी लागणार नाही, कारण यंदा सोयापेंड निर्मितीच कमी असेल. भारताला कमाल पातळीवर १० लाख टनांच्या दरम्यान निर्यात करावी लागेल. नॉन जीएम असल्याने यंदा सोयापेंड निर्यातीचे उद्दिष्ट सहज शक्य आहे, असे निर्यातदारांनी सांगितले..Soybean Rate: बांगलादेश भारताची सोयापेंड कमी घेण्याची शक्यता.दराचे नेमके काय होणार?पुढील काळात सोयाबीन दरात निश्चित सुधारणेला वाव असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशात शेतकरी भाववाढीसाठी थांबताना दिसत नाहीत. कारण पुढील काळातही हमीभावाचा टप्पा बाजारभाव ओलांडण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे हमीभावाचा पर्याय चांगला असल्याने मध्य प्रदेशातील शेतकरी भावांतर योजनेतून विक्री करत आहेत. महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपासून हमीभावाने खरेदी सुरु होणार आहे. तसेच अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तडजोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सुधारणा पाहायला मिळाली. .यामुळे देशातही सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे दर सुधारले आहेत. पुढे बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरालाही आधार मिळेल. महाराष्ट्रात हमीभावाने खरेदी आणि मध्य प्रदेशात भावांतरची खरेदी संपल्यानंतर दर पाच हजारांच्या दरम्यान जाऊ शकतात, असा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला. यंदा देशात उत्पादन कमी आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण मालाचा पुरवठा कमी आहे. या सोयाबीनचा भाव पुढील काळात हमीभावाच्याही दरम्यान जाऊ शकतो. पण त्यासाठी तूर्तासतरी वाट पाहावी लागेल, असेही अभ्यासकांनी सांगितले..बियाण्याचे सोयाबीन खाणार भावदेशात यंदा सोयाबीनची गुणवत्ता कमी झाली आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तेचे सोयाबीन बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध आहे. आताच अशा सोयाबीनचा दर ५ हजारांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. काही बाजारात तर ५ हजार ३०० रुपये दराने बियाणे दर्जाचे सोयाबीन विकले गेले. बियाणे कंपन्या याची खरेदी करत आहेत. पुढे बाजारात आवक कमी झाल्यानंतर बियाणे दर्जाचे सोयाबीन चांगलाच दर मिळवण्याची शक्यता आहे. उपलब्धताच कमी असल्याने यंदा हे सोयाबीन चांगले तेजीत येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे दर्जाचे सोयाबीन विक्रीची घाई न करता आणखी काही दिवस वाट पाहावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे..मध्य प्रदेशचा दिलासामध्य प्रदेशमध्ये सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादकता कमी झाली. महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्य प्रदेश सरकारने यंदा सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू केली. योजनेचा कालावधी २४ ऑक्टोबर ते १५ जानेवारी ठेवण्यात आला आहे. तर भावांतर योजनेसाठी ३६ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना मॉडल रेट आणि हमीभाव यातील फरक देणार आहे. यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सोयाबीनसाठी हमीभाव मिळणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना आवश्यक तेव्हा शेतकरी सोयाबीनची विक्री करू शकतात. हमीभावाने विक्रीसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते..काय आहे भावांतर?भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना सरकारने ठरवलेला मॉडल रेट आणि हमीभाव यातील फरक दिला जातो. सरकारने यंदा सोयाबीनसाठी ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. बाजारभावाच्या आधारे मॉडेल रेट ठरवला जातो. पण बाजारात या मॉडेल रेटच्या खाली सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना काहीसे नुकसान सोसावे लागते. मॉडेल रेट आणि त्यांच्या विक्री दरात जेवढी तफावत जास्त तेवढे त्यांना मिळणारा दर कमी असतो. समजा, सरकारने मॉडेल रेट ४ हजार काढला आणि उरलेले १,३२८ रुपये भावफरक जाहीर केला. पण काही शेतकऱ्यांचे सोयाबीन ३,८०० रुपयाने विकले गेले. तर अशा शेतकऱ्यांनाही १,३२८ रुपयेच मिळतील. म्हणजेच हमीभावापेक्षा या शेतकऱ्यांना २०० रुपये कमी मिळतील..Soybean Export: बांगलादेशच्या निर्णयाचा सोयाबीनला धोका नाही.काय आहे प्रक्रिया?भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने यंदा शेतकऱ्यांसाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकरी आपले सोयाबीन सरकारची मान्यता असलेल्या मंडी म्हणजेच बाजार समित्यांमध्ये विकू शकतात. केवळ सरकारी मान्यता असलेल्या बाजारांमध्ये सोयाबीन विकणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन भावांतर योजनेत खरेदी केले जाते. सोयाबीन विकल्यानंतर त्या बाजार समितीतील पावती घेणे बंधनकारक केले आहे..मॉडेल रेट कसा काढणार?दर फरक देण्यासाठी बाजारातील मॉडेल रेट महत्त्वाचा आहे. हा मॉडेल रेट योजनेच्या पूर्ण काळासाठी एकच नसेल. तर प्रत्येक १५ दिवसाला मॉडेल रेट काढला जाईल. या १५ दिवसांमध्ये बाजारात जो भाव मिळाला त्यावरून हा रेट ठरवला जातो. पहिल्या टप्प्यात २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या १५ दिवसांसाठी ४ हजार रुपये मॉडेल रेट काढण्यात आला. तर सरकारने शेतकऱ्यांसाठी १३०० रुपये प्रति क्विंटल भाव फरक जाहीर केला. उरलेले २८ रुपयेही दिले जातील, असे मुख्यमंत्री यादव यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. १३ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात भावफरक जमा केला जाणार आहे. तसेच पुढच्या १५ दिवसांसाठी वेगळा मॉडेल रेट काढला जाईल. त्यानंतर जो दर फरक येईल तो शेतकऱ्यांना दिला जाईल..गुणवत्तेचा निकष?भावांतर योजनेत सोयाबीनची खरेदी करताना तसा गुणवत्तेचा निकष ठरविण्यात आलेला नाही. सोयाबीनच्या गुणवत्तेनुसार बाजारात दर मिळतो. गुणवत्ता कमी असेल तर हे सोयाबीन मॉडेल रेटपेक्षा कमी दरात विकलेले असेल. मध्य प्रदेशात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन ३ हजार ६०० रुपयांपासून विकल्याचे सांगितले. या शेतकऱ्यांना गुणवत्ता कमी असल्याने कमी दर मिळाला, असे मध्य प्रदेशच्या मंडी प्रशासनाने स्पष्ट केले. पण शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे..केंद्र सरकारचा निधीमध्य प्रदेशात भावांतर योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने या योजनेसाठी मध्य प्रदेश सरकारला १,७७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेचा भार मध्य प्रदेश सरकारवर येणार नाही..Soybean Bhavantar: मध्य प्रदेशने भावांतरमधून सोयाबीनसाठी जाहीर केला भाव फरक.अमेरिका, चीनमधील सोयाबीन तोडगा: अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक अडचणीत आले होते. सोयाबीनचा सर्वात मोठ्या खरेदीदाराने अमेरिकेच्या सोयाबीनकडे पाठ फिरवली होती. नव्या हंगामातील सोयाबीन काढून झाले, पण विक्री होत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्याच देशातील सोयाबीन उत्पादकांच्या टिकेला सामोरे जावे लागले. चीनसोबत व्यापार तोडगा काढण्यासाठी यामुळे ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत गेला. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. .या बैठकीत जगातील सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आणि दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक यांच्यात शेतीमाल व्यापार विषयक तोडगा काढण्यात आल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले. अमेरिका १० नोव्हेंबरपासून चीनच्या वस्तूंवर लावलेले शुल्क १० टक्क्यांनी कमी करणार आहे. तर चीनही अमेरिकेतून आयात होणाऱ्या मका, सोयाबीन, गहू, चिकन, पोर्क, बीफ आणि डेअरी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करणार आहे. चीनने सोमवारपासून (ता.१०) या उत्पादनांवरील आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत घटविण्याचे ठरविले आहे. सोयाबीनवरील अतिरिक्त १० टक्के शुल्कही कमी करण्याचा निर्णय चीनने घेतला. मात्र तरीही अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर १३ टक्के शुल्क लागणार आहे. त्यामुळे शुल्क कपातीनंतरदेखील अमेरिकेचे सोयाबीन चीनमधील आयातदारांना ब्राझीलच्या तुलनेत महागच पडणार आहे..दोन्ही देशांमध्ये झालेल्या वाटाघाटीनंतर चीन नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात १२० लाख टन सोयाबीनची आयात करेल. तसेच पुढील ३ वर्षे दरवर्षी २५० लाख टनांची आयात करणार आहे. चीनने २०२४ मध्ये एकूण १ हजार ५० लाख टन सोयाबीनची आयात केली होती. त्यांपैकी २२१ लाख टन सोयाबीन अमेरिकेतून आयात केले. म्हणजेच एकूण आयातीच्या २१ टक्के सोयाबीन अमेरिकेतून घेतले आहे..या वाटाघाटीनंतरही ब्राझीलचे सोयाबीन स्वस्त असल्याने “ब्राझीलमधूनच सोयाबीनची आयात परवडणारी आहे,” असे मत व्यक्त केले आहे. केवळ चीनच नाही तर जगातील इतर देशही ब्राझीलमधून सोयाबीनची खरेदी करत आहेत. काही दिवसांपर्यंत ब्राझीलच्या सोयाबीनचे दर अमेरिकेच्या तुलनेत जास्त होते. पण चीनमध्ये अमेरिकेच्या सोयाबीनवर २३ टक्क्यांपर्यंत शुल्क होते त्यामुळे चीनमधील आयातदारांना अमेरिकेचे सोयाबीन महाग पडत होते. पण चीन आणि अमेरिका यांच्या वाटाघाटी होत आयात शुल्काविषयी तोडगा निघत गेला तसे ब्राझीलच्या सोयाबीनचे दर कमी होत गेले. .आता ब्राझीलचे सोयाबीन अमेरिकेपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे चीनमधील खरेदीदार आजही ब्राझीलमधून सोयाबीनची खरेदी करत आहेत. अमेरिकेच्या सोयाबीनचा स्पॉटचा भाव २.४० डॉलर प्रति बुशेल्स (एक बुशेल्स २७.२१ किलो) आहे. तर ब्राझीलचे सोयाबीन २.२५ डॉलर प्रति बुशेल्सने मिळत आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापार कराराविषयी सकारात्मक घडामोडींमुळे ऑक्टोबरच्या शेवटपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारले आहेत. अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनचा दर मागील १६ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोचला. .मागच्या १५ दिवसांमध्ये सोयाबीनचे दर ९ टक्क्यांनी वाढले. शनिवारी जानेवारीचे वायदे ११.१७ डॉलर प्रति बुशेल्सवर होते. बांगलादेशसोबत झालेल्या व्यापार कराराचाही आधार बाजाराला मिळत आहे. बांगलादेशने अमेरिकेतून होणारी सोयाबीनची आयात १२५ कोटी डॉलरपर्यंत वाढविण्याचा करार केला आहे. यंदा बांगलादेशमध्ये सोयाबीनची मागणी वाढत आहे. पोल्ट्री, पशुखाद्य आणि मत्स्यखाद्यासाठी वापर वाढला आहे. सोयाबीनची आयात गेल्यावर्षीच्या ९ टक्क्यांनी वाढण्याची असून २४ लाख टन सोयाबीनची आयात होण्याची शक्यता आहे..‘यूएसडीए’च्या अहवालाकडे लक्ष अमेरिकेचा कृषी विभाग (युएसडीए) आपला नव्या हंगामाचा अहवाल १४ नोव्हेंबरला जाहीर करणार आहे. या अहवालाकडे बाजाराचे लक्ष आहे. कारण सोयाबीन उत्पादन आणि वापराविषयी वेगवेगळे अंदाज सध्या बांधले जात आहेत. ब्राझील यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन घेईल, या चर्चेने बाजारावर दबाव निर्माण केलेले आहे. यंदा अमेरिका आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादनात घट होईल, असाही अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला. ‘यूएसडीए’च्या नोव्हेंबरच्या अंदाजात जगातील उत्पादन आणि वापर तसेच प्रत्येक देशांची आयात आणि निर्यातीचेही अंदाज येतील. नोव्हेंबरच्या अंदाजात काय असणार? याचेही अंदाज सध्या बांधले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.