Success Story of Dairy Farming : मूळ देवगाव येथील सुधाकर यांचे प्राथमिक शिक्षण बाभूळगाव येथे, तर १२ वी पर्यंतचे शिक्षण यवतमाळमध्ये झाले. बी.ए. साठी ॲडमिशन घेतली असली, तरी महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी एसटी बसच्या पासकरिता २५६ रुपयेदेखील त्यांच्याकडे नव्हते.
परिणामी, शिक्षण सोडून त्यांनी काही दुकानांमध्ये कामही केले. दरम्यान, बहिणीचे लग्न झाल्याने कुटुंबावरील कर्जही वाढले होते. शेतमजूर असलेल्या वडिलांना पाच मुलांसह ९ जणांचे कुटुंब चालवताना ओढाताण होत होती. आपणच काहीतरी केले पाहिजे, या उद्देशाने सुधाकर यांची धडपड सुरू झाली.
उसनवारीतून उभारला व्यवसाय
चहाचे कॅन्टीन सुरू करण्यासाठी २००१ मध्ये सुधाकर यांनी आपले मित्र सुधीर रोकडे यांच्याकडून ५०० रुपये उसने घेतले. तहसील मार्गावर ‘एस. कुमार टी सेंटर’ सुरू केले. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. पुढे वाढलेल्या व्यवसायात चहा बनविण्यासाठी सुमारे १५० लिटर दूध लागू लागले. नफाही चांगला राहत असल्याने २००५ मध्ये पहिल्यांदा एक म्हैस खरेदी केली. टप्प्याटप्प्याने एकेक म्हैस वाढवत त्यांची संख्या १५० वर पोहोचली.
दुग्ध व्यवसायात घेतली भरारी
गेल्या वर्षीपर्यंत गोठ्यात २५ गावरान म्हशी, ६५ मुऱ्हा म्हशी व उर्वरित दुधाळ गाई अशी १५० जनावरे होती. ४०० ते ४५० लिटर दूध संकलन होत होते. मात्र वडील महादेवराव यांना दुर्धर आजाराने ग्रासले. त्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे फारसे लक्ष देणे शक्य होईना. कामगारांच्या उपलब्धतेची अडचण होती. अशा स्थितीमध्ये आपल्याकडील म्हशी त्यांच्या नियमित दुग्धोत्पादकांना देत त्याचा परतावा दुधातून करण्यास सांगत जनावरांचे वितरण केले. आज त्यांच्याकडे केवळ ४२ दुधाळ जनावरे आहेत.
दुग्ध व्यवसायात केली वाढ
चहा दुकानाची गरज भागूनही दूध शिल्लक राहू लागले. चहा कॅन्टीन शेजारीच एक दुकान खरेदी करून २००९ पासून डेअरी सरू केली. त्यातून स्वतःच्या जनावरांचे दूध विक्री सुरू केली. भेसळीविरहित चांगल्या दुधाला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग सुरू केली. अन्य दुग्धोत्पादकांच्या दुधाचे संकलन सुरू केली. त्यांच्याकडे हंगामातील दूध संकलन ११ ते १२ हजार लिटर राहते, तर अन्य वेळी ८ हजार लिटरपर्यंत राहते.
दुग्धोत्पादकांना म्हशीच्या दुधाला ५० ते ७५ रुपये, गाईच्या दुधाला ३२ ते ४० रुपये दर दिला जातो. दर दहा दिवसांनी चुकारे केले जातात. गरज आणि मागणीनुसार दुग्धोत्पादकांना पशुखाद्याचा पुरवठाही केला जातो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी बाभूळगाव येथे चार आउटलेट, धामणगाव (रेल्वे), कळंब, देवगाव, यवतमाळ या ठिकाणीही आउटलेट सुरू केले आहेत. म्हशीच्या दुधाची विक्री ७०, तर गाईच्या दुधाची ५५ रुपये लिटरने होते. यवतमाळ येथील काही डेअरी व्यावसायिकांनाही दुधाचा पुरवठा होतो.
तांत्रिक मार्गदर्शनातून व्यवसायात भरारी
दूध व्यवसायामध्ये अनुभवामधून ते अनेक बाबी शिकत गेले असले तरी त्यांनी वेळोवेळी वरूड (ता. पुसद, यवतमाळ) येथील डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता दिनकर बाजड, सचिन शिंदे, अनिल वाकोडे यांचे मार्गदर्शन केले. विशेषतः प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्मितीमध्ये त्यांना शास्त्रीय माहितीची खूप मदत होती. त्यासोबतच जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ आणि शासकीय दुग्ध योजनेतील गुण नियंत्रण अधिकारी प्रमोद देशमुख यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे सुधाकर यांनी सांगितले.
...असे आहे अर्थकारण
दूध विक्रीसोबतच अडीच ते तीन हजार लिटर दुधापासून पनीर, खवा, दही, ताक, लोणी, पेढा, बासुंदी, श्रीखंड या सारखे प्रक्रियाजन्य पदार्थांच्या उत्पादनावरही त्यांचा भर राहिला आहे. यवतमाळ शहरातील अन्य ७५ ते ८० डेअरींना केवळ दूध, दही, लोणी यांचा मागणीनुसार पुरवठा होतो. अन्य तालुक्यामध्ये ७० ते ७५ डेअरी दुग्ध विक्री केली जाते. अन्य दुग्धजन्य पदार्थांची विक्री स्वतःच्या आउटलेटद्वारे केली जात असल्याचे सुधाकर सांगतात.
हायटेक यंत्रणा उभारली
सुधाकर यांच्याकडे दुग्ध व्यवसायाकरिता आवश्यक सर्व प्रकारच्या यंत्रणा उदा. पाश्चराझेशन, स्टीम ऑपरेटेड खवा मशिन इ. आहेत. दोन कोल्ड स्टोअरेज देखील त्यांनी व्यवसायस्थळी उभारले आहेत. इनक्युबेशन रुम, दही लावण्यासाठी हिटिंग क्वॉइलचा वापर होतो, असे त्यांनी सांगीतले. याकरिता २५ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. आइस्क्रीम उत्पादन घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे युनिट उभारण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहेत. त्यांच्याच माध्यमातून आइस्क्रीमचे विक्री केली जाणार आहे. कधीकाळी शेतमजूर असलेले हे कुटुंबीय आज १२ एकर शेतीचे मालक आहेत.
कोट्यवधीच्या उलाढालीचा गाठला पल्ला
सुधाकर यांनी शून्यातून उभारलेल्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १० ते १२ कोटी रुपयांपर्यंत होत आहे. कधीकाळी शेतमजूर असलेले हे कुटुंबीय आज १२ एकर शेतीचे मालक आहेत. दुसऱ्याच्या दुकानात नोकरी मागणाऱ्या सुधाकर यांच्याकडे आज प्रयोगशाळा तज्ज्ञांसह तब्बल ३३ कामगार आहेत.
...असे आहे कुटुंब
ठाकरे कुटुंबात सुधाकर यांची आई कलावती, वडील महादेवराव, पत्नी प्रगती आणि तीन मुले यांचा समावेश आहे. मुली समृद्धी आणि चैतन्या या अनुक्रमे दहावी आणि पाचवीत आहेत, तर मुलगा अभिराज हा तिसऱ्या वर्गात आहे. एकेकाळी पाससाठी पैसे नसल्याने शिक्षण सोडावे लागले असले तरी आपली मुले उच्चशिक्षित व्हावीत, यासाठी सुधाकर यांची धडपड आहे.
सुधाकर ठाकरे, ९८९०९७६५९२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.