रवींद्र पालकरलिंबूवर्गीय फळ पिकांवर लीफ मायनर ही कीड पावसाळ्यात अधिक प्रमाणात आढळते. या वर्षीही रोपावस्थेत तिचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला. नवीन लागवडाच्या बागांसोबतच जुन्या बागांमध्येही या किडीचा प्रादुर्भाव आढळला. या किडीचे संपूर्ण जीवनचक्र पानांवर पूर्ण होते. पानांच्या वरच्या व खालच्या पृष्ठभागाच्या दरम्यानचा हरितद्रव्याचा भाग खात ती पुढे जाते. तिने केलेल्या या बोगद्यामुळे पानांवर चमकदार नागमोड्या रेषा दिसतात. .त्यामुळे पाने फिकट पडतात, वाकतात आणि शेवटी सुकतात. याशिवाय, अळ्यांमुळे झालेल्या या जखमांमधून Xanthomonas axonopodis pv. citri हे जिवाणू पानांच्या उतींमध्ये प्रवेश करतात. या जिवाणूमुळे देवी किंवा सिट्रस कॅंकर रोग होतो. थोडक्यात लीफ मायनर ही कीड ‘सिट्रस कॅंकर’ रोगाच्या प्रसारामध्ये वाहक म्हणून अप्रत्यक्षपणे कार्य करते. या किडीची छायाचित्राद्वारे जाणून घेऊ..लीफ मायनरशास्त्रीय नाव : फायलोक्निस्टिस सिट्रेलाखाद्य पिके व वनस्पती : लिंबूवर्गीय गटातील सर्व पिके, मोगरा, बेल, करंज, इ.किडीची ओळखअंडी : किडीची अंडी घुमटाच्या आकाराची असतात. ती जवळ जवळ पारदर्शक असली तरी पिकाच्या पानांच्या रंगामुळे हिरवट दिसतात..Citrus Farming: संत्रा काढणी होईपर्यंत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.अळी : अळ्या अतिशय लहान (१ ते ३ मि.मी.) आकाराच्या, पारदर्शक हिरवट-पिवळ्या रंगाच्या असतात. त्या पानांच्या आतील भागात (माइनमध्ये) राहून अन्न घेत राहतात. पानाच्या आतमध्येच त्यांच्या चार अवस्था वाढतात. पहिल्या तीन अवस्था प्रत्यक्ष अन्न ग्रहण करतात, तर चौथी अवस्था (प्री-प्युपा) ही रेशमासारख्या धाग्याच्या साहाय्याने कोष तयार करण्यासाठी आवरण विणते.कोष : कोष अवस्थेत कीड पिवळसर तपकिरी रंगाची दिसते.प्रौढ : प्रौढ पतंग अतिशय लहान असतो. त्याचे पंख पूर्णपणे पसरल्यावर त्याची लांबी सुमारे ४ मि.मी. इतकी भरते. पुढील पंखांवर पांढरे व रुपेरी चमकदार खवले (स्केल्स) असतात, ज्यावर काही काळे आणि तपकिरी ठिपके दिसतात. प्रत्येक पंखाच्या टोकावर एक काळा डाग असतो. मागचे पंख आणि शरीर पांढऱ्या रंगाचे असते. मागच्या पंखांच्या कडेवर लांब केसांसारखे शल्क असतात. डोके गुळगुळीत व पांढरे असते..जीवनक्रममादी कीड पानाच्या खालच्या बाजूस, शिरेजवळ, एकेक अशी अंडी घालते. तिच्या संपूर्ण जीवनकाळात ती अंदाजे ५० अंडी घालू शकते. प्रादुर्भाव जास्त असल्यास अंडी पानांच्या वरच्या बाजूस किंवा अगदी खोडावरही घातली जाऊ शकतात. अंडी उबवण्याचा कालावधी साधारणतः ३ ते ६ दिवसांचा असतो. नव्याने उबवलेल्या अळ्या पानात छिद्र करून त्वरित आत शिरतात आणि खाणे सुरू करतात. अळीच्या चार अवस्था असतात. संपूर्ण अळी अवस्था साधारणतः १ ते २ आठवडे टिकते. अळी पानांच्या खाण्यासाठी पानादरम्यान केलेल्या बोगद्यातच कोषावस्थेत जाते. कोष अवस्था सुमारे ३ ते ४ आठवडे टिकते. प्रौढ कीड साधारणतः एक आठवडा जगते. या किडीच्या वर्षभरात अंदाजे ९ ते १३ पिढ्या पूर्ण होऊ शकतात..Citrus Farming: संत्रा, मोसंबीसाठी सिलिकॉन फायदेशीर .नुकसानीचे स्वरूपअंड्यातून उबविलेली अळी त्वरित पानात छिद्र करून आत शिरते. अळीच्या पहिल्या तीन अवस्था पानाच्या पारदर्शक आवरणाखालील पेशींवर उपजीविका करतात. त्या पानाच्या खालच्या बाजूस बोगदे (माइन्स) तयार करतात. हे बहुधा वरून सहज दिसत नाहीत. मात्र प्रादुर्भाव तीव्र झाल्यास हे बोगदे पानांच्या वरच्या बाजूस किंवा अगदी खोडावरसुद्धा दिसू शकतात. .फक्त कोवळी, मऊ पानेच अळ्यांसाठी योग्य अन्न ठरतात. एकदा पाने कठीण झाली की त्यांच्यावर या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. हे बोगदे रुपेरी दिसतात आणि त्यांच्या मध्यभागी काळसर विष्ठेची एक रेषा आढळते. शेवटी, अळी पानाच्या कडेपर्यंत बोगदा तयार करून पान गुंडाळते व त्याच ठिकाणी कोष बनवते. बोगदा झालेला भाग नंतर कोमेजून सुकतो आणि तपकिरी (मृतवत) दिसू लागतो. ही कीड ‘देवी रोग’ या जीवाणूजन्य रोगाच्या प्रसारासाठी वाहक म्हणून कार्य करत असल्याने अधिक धोकादायक ठरते..व्यवस्थापनलागवडीसाठी कीडमुक्त रोपांची निवड करावी.प्रादुर्भावग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत.रोपवाटिका किंवा बागेमध्ये खाली पडलेल्या पानांमध्ये किडीच्या सुप्त अवस्था लपलेल्या असू शकतात, त्यामुळे ती पाने वेचून स्वच्छता राखावी.क्रायसोपा, सिट्रोस्टिकस फायलोक्निस्टॉइडिस, एलॅस्मस ब्रेविकॉर्निस आणि सिम्पीसिस स्ट्रायाटिपिस या मित्रकीटकांचे संवर्धन करावे..प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कडुनिंबयुक्त कीटकनाशकांचा वापर फायदेशीर ठरू शकतो.रासायनिक कीटकनाशक : इमिडाक्लोप्रिड (१७.८० टक्के एस.एल.) (लेबलक्लेम शिफारस)(टीप ः केंद्रिय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीच्या (सीआयबीआरसी) सूचनेनुसार या कीटकनाशकाचे प्रमाण झाडाचा आकार आणि फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या संरक्षण उपकरणांनुसार बदलू शकते. त्यामुळे फवारणीचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित कीटकशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.)- रवींद्र पालकर ८८८८४०६५२२(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.