Ashok Salgode Agrowon
यशोगाथा

Success Story : हवामानाला अनुकूल शेती पद्धतीचा साधला विकास

Article by Manik Rasve : दामपुरी (ता.जि. परभणी) येथील अशोक सालगोडे यांनी बदलत्या हवामानाच्या समस्या ओळखून त्याला सुसंगत शेती- पीकपद्धतीत सुधारणा केल्या. आंतरपीक पद्धती. फळबागांचे नियोजन, बीबीएप पद्धतीने सोयाबीन, सूक्ष्मसिंचन असे व्यवस्थापन ठेवले. त्यातून शेतीची उत्पादकता वाढवली. राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या प्रयोगशीलतेचा सन्मान झाला आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Climate Friendly Farming : मराठवाड्यातील प्रगतिशील, प्रयोगशील आघाडीच्या शेतकऱ्यांपैकी एक अशी ओळख आज अशोक सालगोडे यांनी मिळवली आहे. बलसा (ता. परभणी) हे त्यांचे मूळ गाव. येथे कुटुंबाची असलेली ५० एकर शेती तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी संपादित झाली. त्यामुळे हे कुटुंब परभणी येथे स्थायिक झाले.

आई वडील, पत्नी, भाऊ प्रताप असे त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. वडील बाबूराव मध्यवर्ती बँकेत नोकरीस होते. त्यांनी १९८० मध्ये परभणीपासून १८ किलोमीटरवरील दामपुरी शिवारात २५ एकर जमीन खरेदी केली. अशोक यांनी तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठातून १९९४ मध्ये बीएस्सी पदवी घेतली. वडिलांच्या नोकरीमुळे शेतीची जबाबदारीही त्यांना सांभाळावी लागे. शेतीसोबत राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघात काही वर्षे त्यांनी ‘ग्रेडर’ म्हणूनही कंत्राटी सेवा केली.

शेतीचा विकास

दरम्यान, शेती प्रगतिशील करण्याकडे अशोक यांनी झोकून दिले. त्यांची जमीन हलकी ते मध्यम असून, जायकवाडी डाव्या कालव्याच्या शेवटच्या टोकाकडे असल्याने सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते. मग सन १९९७ मध्ये विहीर खोदली. ऊस व केळी ते घेऊ लागले. परंतु मॉन्सून पाऊस येण्यात झालेला बदल, असमान वितरण, दीर्घ खंड, एखादे वर्ष दुष्काळी स्थिती अशा समस्या उद्‍भवू लागल्या. त्यामुळे केळी व पेरू घेणे थांबवले. ठिबक सिंचनाद्वारे ऊस कायम ठेवला. आता तुलनेने कमी पाण्यात येणाऱ्या लिंबाचे पीक कायम ठेवले आहे.

हंगामी पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर असते. बहुविध पद्धतीतून शेतीतील जोखीम कमी केली आहे. सन २०१६ मध्ये साई सरबती लिंबाच्या वाणाची दीड ते पावणेदोन एकरात लागवड केली. बाग नवी असताना दोन ते तीन वर्षे कलिंगडाचे आंतरपीक घेऊन एकूण २५ ते ३० टनांपर्यंत उत्पादन घेतले.

त्यातून आर्थिक उत्पन्नाचा आधार तयार केला. आज लिंबाची बाग व्यापाऱ्यांना हुंडी पद्धतीने दिली जाते. त्यातून वर्षाला तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

आंतरपिकांचे प्रयोग

-आंतरपीक पद्धतीचा अवलंब. त्यातून मुख्य पिकातील खर्च भरून काढून

शेतीतील एकूण खर्च कमी करण्याचा प्रयत्न.

-पाटपाणी पद्धत बंद करून ठिबक सिंचनावर आधारित पाच बाय दीड फूट अंतरावर पाच एकरांत ऊस. त्यात कांदा, हरभरा अशी आंतरपिके.

-डिसेंबर २०२३ मध्ये चार एकर ऊस लागवड. जानेवारीत त्यात कलिंगडाचे आंतरपीक घेतले.

कलिंगडाचे ४५ टन ‘ए ग्रेड’चे, तर उर्वरित ३० टन उत्पादन मिळाले.

-पूर्वहंगामी उसाचे मिळते एकरी ६० ते ६५ टन उत्पादन.

-पाच बाय दीड फूट अंतरावर मल्चिंग व बेडवर मिरची. त्यात खरबुजाचे आंतरपीक घेतले आहे. सध्या खरबुजाला २० ते २५ रुपये प्रति किलो दर सुरू आहे.

हवामानाधारित शेती

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) वतीने देशभरात हवामान बदल व त्याला सुसंगत शेती पद्धतीशी संबंधित निक्रा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात हैदराबाद येथील राष्ट्रीय स्तरावरील ‘क्रिडा’ संस्थेचाही समावेश आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत परभणी तालुक्यातील दामपुरी आणि इटलापूर या दोन गावांत तो कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत सालगोडे यांच्या शेतात पर्जन्यमापक यंत्र बसविले आहे.

त्यातून पावसाच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जातात. त्या आधारे विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन सल्ला देण्यात येतो. पूर्वी गाव शिवारातील पावसाची नोंद होत नसल्याने अनेकदा अपुऱ्या ओलीवर केलेली पेरणी वाया जायची. पर्जन्यमापकाच्या वापरामुळे ६५ ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच आता योग्य ओलाव्यावर पेरणी होते. दुबार पेरणीचे नुकसान टळले आहे.

रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचा अवलंब

शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार अशोक रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) सोयाबीन घेतात. त्यामुळे पाऊस जास्त झाल्यास सरीद्वारे अतिरिक्त पाणी वाहून जाते. कमी पाऊस होतो तेव्हा सऱ्यांमध्ये पाणी मुरते. सोयाबीनचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

दोन वर्षांपासून ते रुंद वरंब्यावर टोकण पद्धतीने सोयाबीन घेतात. या पद्धतीत एकरी १२ किलो बियाणे लागते. मागील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये पावसाच्या खंड काळात (ड्रायस्पेल) तुषार संचाद्वारे पाणी दिले. एकरी १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले.

हवामान सल्ला ठरतोय उपयुक्त

कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा प्रकल्पाचे समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते. त्या अंतर्गत व्हॉट्‍सअॅप ग्रुपद्वारे सालगोडे यांना सल्ला मिळतो. त्यानुसार पीक-पाणी- पीक संरक्षण नियोजन ते करतात. किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखून फवारण्या करतात. कापसाची वेळेवर वेचणी करून पावसात भिजून होणारे नुकसान त्यामुळेच टळते. अशा नियोजनामुळेच पीक उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे सालगोडे यांचा अनुभव आहे.

शेतापासून जवळ लोहगाव (ता. परभणी) येथे त्यांनी कृषी निविष्ठा केंद्रही सुरू केले आहे. त्याद्वारे तेही शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन सल्ला देतात. शेतात बैलजोडी, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित बीबीएफ पेरणी यंत्रासह अन्य अवजारे आहेत.

‘ॲग्रोवन’ ठरलाय मार्गदर्शक

सालगोडे ‘ॲग्रोवन’चे सुरुवातीपासूनचे वाचक आहेत. त्यातील हवामान विषयक सल्ले,

लेख यांचा शेती नियोजनात मोठा फायदा होतो. त्यातील यशकथा त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतात. ॲग्रोवनचा वर्धापन दिन आणि सालगोडेंचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी असतो. त्यामुळे ॲग्रोवनविषयीचे त्यांचे बंध अजून घट्ट झाले आहेत.

‘क्रिडा’ तर्फे सन्मान

‘निक्रा’ प्रकल्पांतर्गत हवामान आधारित सल्ल्यानुसार आधुनिक शेती व फळबाग

व्‍यवस्‍थापन व तंत्रज्ञानाचा प्रसार सालगोडे यांनी केला आहे. त्यासाठी ‘क्रिडा’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध संस्थेतर्फे १२ एप्रिल, २०२३ रोजी उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार देऊन त्यांना सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

अशोक सालगोडे, ९८२३६८५३२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT