Success Story : शेतीच्या नोंदवहीमुळे झाली यशस्वी वाटचाल

Article by Gopal Hage : शेतीतील नोंदी व आर्थिक ताळेबंद लिहून ठेवण्याचे संस्कार किरणकुमार हुसे (बाळापूर, जि. अकोला) यांना वडिलांकडून मिळाले. सुमारे वीस ते २२ वर्षांपासून त्यांनी शेती व्यवस्थापनातील सर्व तपशिलाच्या सविस्तर नोंदी आपल्या नोंदवहीत ठेवल्या आहेत. त्यामुळेच शेतीतील नफा-तोटा, अर्थकारण नेमके समजून शेतीत प्रयोगशीलता जपणे व त्यात यशस्वी वाटचाल करणे शक्य झाले आहे.
Kirankumar Huse
Kirankumar HuseAgrowon

गोपाल हागे

Indian Agriculture : अकोला जिल्ह्यात बाळापूर येथील किरणकुमार आनंदराव हुसे यांची कासारखेड (बाळापूर) शिवारात १० एकर बागायती शेती आहे. गावाला लागूनच त्यांची शेती आहे. किरणकुमार यांनी शेतीत प्रयोगशीलता जोपासली आहे.

खरीप, रब्बी, उन्हाळी असे तीनही हंगाम ते घेतात. कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या नवनवीन वाणांची निवड करून उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी हुसे सातत्याने प्रयत्नशील असतात. पदवीधर असूनही नोकरीच्या मागे न लागता शेतीतच त्यांनी आपले करिअर शोधले आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत.

नोंदवहीचे महत्त्व जाणले

शेतीत ताळेबंदाला मोठे महत्त्व आहे. शेतीत प्रगती करायची तर नोंदीवहीचे महत्त्व व त्यासंबंधीचे धडे किरणकुमार यांना वडील आनंदराव यांनी शिकवले. ते नियोजनबद्ध शेतीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. तेव्हापासून शेतीसह घरखर्चातील प्रत्येक जमा-खर्च मांडून ठेवण्याचा छंदच किरणकुमार यांना जडला आहे.

वीस ते २२ वर्षांपासून तो त्यांनी जपला आहे. प्रत्येक वर्षी एखाद्या दिवशी शेतात कोणते काम झाले, त्यासाठी किती खर्च झाला याची नेमकी माहिती नोंदवहीत पाहून ते एका क्षणात सांगतात. घरखर्च, पीककर्ज यांचा सविस्तर तपशील तसेच शेतीमाल विकून आलेल्या प्रत्येक पावतीची जपणूकही केली आहे.

Kirankumar Huse
Success Story : आदिवासी, दुर्गम भागात विकासाची उभारली गुढी

स्वतंत्र नोंदवह्या

कोणत्या पिकाला वाढीच्या कोणत्या अवस्थेत कोणते खत दिले? किडींच्या नियंत्रणासाठी काय फवारणी केली होती? त्यासाठी किती मजूर लागले, त्यावर खर्च किती झाला असा सगळा तपशील किरणकुमार यांच्या नोंदवहीत पाहायला मिळतो.

शेतीकामांची आणि जमा- खर्चाची अशा स्वतंत्र नोंदवह्या त्यांनी तयार केल्या आहेत. शासकीय योजना, पीककर्ज, पीकविमा नोंद व संबंधित कागदपत्रे देखील व्यवस्थितपणे वर्षनिहाय व महिनानिहाय जोपासली आहेत. या सर्व नोंदी शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरणाऱ्या अशाच आहेत.

प्रयोगशील शेतीत जपलेली उत्पादकता

पीक उत्पादकतेत सातत्य ठेवण्याचा किरणकुमार यांचा प्रयत्न असतो. सोयाबीनचे दरवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटलचे उत्पादन ते घेतात. तूर, उडीद पिकांची उत्पादकता एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत आहे. गव्हाचे एकरी १५ ते १६ क्विंटलपर्यंत, तर हरभऱ्याचे १२ ते १३ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात.

यंदा दीड एकरात ज्वारी पिकाचे एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले. दोन एकरांत २०२०-२१ मध्ये पेरू लागवड केली आहे. यापैकी एक एकरात अलीकडेच घेतलेल्या बहारातून सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. व्यापाऱ्यांनी थेट जागेवरच खरेदी केली. रब्बीत कांद्याची लागवडही असते.

शास्त्रज्ञांकडून सत्कार

मागील हंगामात एक एकरात मोहरी लागवड केली. त्याचे एकरी नऊ क्विंटल उल्लेखनीय उत्पादन त्यांनी घेतले. या प्रयोगाची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बांधावर जात किरणकुमार यांचा सपत्निक सत्कार केला. अलीकडेच एक एकरात काळे जिरे घेतले. त्याचे चार क्विंटल उत्पादन मिळाले.

या प्रयोगशिलतेची दखल घेत ‘कृषी विभाग- आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांनी भेट देऊन पाहणी केली. आज भुईमुगासारखे पीक या भागातून कालबाह्य होत चालले आहे. किरणकुमार मात्र दरवर्षी हे पीक घेतात. यंदाही दीड एकरात त्याची लागवड आहे. तीन एकर उन्हाळी मूग तर दीड एकरात उन्हाळी तीळ जोमदार उभा आहे.

Kirankumar Huse
Success Story : ‘डॉक्टर’चा व्यावसायिक शेतीचा आदर्श

शेतीने दिले सर्व काही

किरणकुमार यांनी गावाशेजारील मन नदीवरून दीड किलोमीटर जलवाहिनी केली. त्यासाठी साडेपाच लाख रुपये खर्च करावा लागला. आता संपूर्ण शेतात बारमाही पिके घेण्यासाठी सिंचनाची सोय तयार झाली आहे. हुसे कुटुंबाने शेतीच्या बळावरच आपली प्रगती साधली आहे. सन २००७-२००८ मध्ये चांगले घर बांधले.

शेतीकांमांसाठी ट्रॅक्टर घेतला. संपूर्ण शेताला साडेतीन लाख रुपये खर्च करून तारकुंपण केले. संपूर्ण वर्षाचा घरखर्च भागवणे शेतीतील उत्पन्नातूनत शक्य होत आहे. काही वर्षांपूर्वी किरणकुमार दुग्ध व्यवसाय करायचे. दरम्यानच्या काळात अपघात झाल्याने त्यांना हा व्यवसाय थांबवावा लागला. अपघातातून सावरल्यानंतर ते आज नव्या उमेदीने नव्या प्रयोगांसाठी सिद्ध झाले आहेत. त्यांना या वर्षीचा रोटरी क्लबचा कृषी दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे. शेतीतील वाटचालीत व प्रगतीत आजवर ठेवलेल्या नोंदी व आर्थिक ताळेबंदाचा मोठा वाटा राहिला आहे.

खर्च कमी करण्यावर भर

शेतीत दरवर्षी वेगवेगळी आव्हाने उभी ठाकत आहेत. उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शेतीतील खर्च कमी करण्याकडे किरणकुमार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने सेंद्रिय, जैविक निविष्ठा, गांडूळ खतांचा वापर ते करतातच. पण काही निविष्ठा स्वतः तयार करतात. कृषी विद्यापीठ, कृषी विभागाचे सातत्याने मार्गदर्शन ते घेतात.

किरणकुमार हुसे ९९२३५८४०३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com