Cotton Crop : कापूस हे महाराष्ट्राच महत्वाच नगदी पीक आहे. पण यंदा अतिवृष्टी आणि पावसाचा खंडामुळे कापूस लागवड काही भागात लवकर तर काही भागात उशीरा झाली. सध्या काही ठिकाणी कपाशी वेचणीला सुरुवात झाली आहे. कापसाला मिळणारा बाजारभाव हा पुर्णपने कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो.
कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणीपासून साठवणूकीपर्यंत काळजी घेण आवश्यक आहे. कापूस वेचणी, साठवण आणि प्रतवारी करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची? याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
वेचणी करताना घ्यायची काळजी
साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. वेचणीदरम्यान योग्य ती काळजी न घेतल्यामुळे कापसामध्ये ३० ते ३५ टक्के पालापाचोळा आणि इतर केरकचरा येऊन धाग्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे अशा कापसाला कमी दर मिळतो. त्यामुळे बोंड फुटल्यानंतर योग्य पक्वतेला आणि ठरावीक वेळेतच कापसाची वेचणी करावी. जास्त दिवस कापूस झाडावर राहिल्यास त्यात पालापाचोळा, धुळीचे कण, बोंड जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात आणि कापसाची प्रत खराब होते. कापसाची वेचणी सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी.
त्याला पालापाचोळा चिकटून येणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याच वेळी चिकटलेला पालापाचोळा काढावा. अपरिपक्व आणि अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याच प्रमाण जास्त असत. असा कापूस वेचून तसाच साठविल्यास रुईला पिवळसरपणा येतो व कापसाची प्रत खालावते. शिवाय अशा कापसाच्या सरकीचे आवरण टणक नसल्याने गलाई करताना सरकी फुटते. रुईची प्रत खराब होते. परिपक्व व पूर्ण फुटलेल्या बोंडातील कापसाची व पर्यायाने पुढे धाग्याची प्रत चांगली मिळते.
कापसाची साठवण कशी करावी?
प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा तसेच बागायती कपाशीच्या मधल्या चार वेचणींचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. वेचणीच्या काळात पावसाने भिजलेला कापूस झाडावर सुकू द्यावा. पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करावी. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. या कापसाला ‘झोडा’अस म्हणतात. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून असा कापूस वेगळा साठवावा. कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास हा चिकट स्त्राव पानांवरून कापसावर पडतो व रुईची प्रत खालावते.
अशा कापसाचीही साठवण वेगळी करावी. पूर्णपणे कोरड्या कापसाची वेचणी करून तो कोरड्या खोलीत साठवून ठेवावा. उघड्या अंगणात कापूस साठविलेला असल्यास त्वरित झाकून ठेवावा. डागाळलेला रंग बदललेल्या किडलेला म्हणजेच कावडी कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी. कापूस मोकळी हवा असलेल्या पक्क्या गोदामात साठवावा. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. वेगवेगळ्या वाणांच्या कापसाची साठवणही वेगवेगळी करावी. त्यात मिसळण झाल्यास चांगल्या कापसाचाही दर कमी होतो, हे लक्षात ठेवा.
कापसाची प्रतवारी
कापसाची प्रतवारी ठरवून देलेल्या कापसाच्या गुणवत्तेनूसार करण गरजेच असतं. कपसाच्या वेचणीची आणि विक्रीची वेळ जवळपास सारखीच असते. त्यामुळे बाजारपेठेत व संकलन केंद्रावर कापसाची आवक सुरू असल्यामुळे प्रतवारी, मोजमाप व प्रक्रियेमध्ये अडचणी येत असतात. म्हणूनच सादृश पद्धतीनेच कापसाच्या प्रतवारीचे काम होते.
पण आता नवीन तंत्रामुळे बऱ्याच संकलन केंद्रावर कापसाच्या गुणवत्तेनूसार कापसाचा भाव ठरविला जातो. त्यामुळे चांगली प्रतवारी असलेल्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होते. अशा प्रकारे कापसाची वेचणी, साठवण आणि प्रतवारी करताना काळजी घेतल्यास कापसाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल.
माहिती आणि संशोधन - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.