Saffron Farming Story : केशर म्हटलं, की आपल्याला आठवते ते काश्मीर... कडाक्याची थंडी आणि बर्फात न्हावून निघालेल्या डोंगरकपारीमध्ये फुलणारं केशर नावाचं सोनं. याच कश्मिरी केशर उत्पादनाचा प्रयोग चिराग शिंदे-पाटील आणि क्रिश आडिया या दोन तरुणांनी मुंबईमध्ये एका छोट्या शीतगृहात केला आहे.
काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारी आकाशी रंगाची फुले या दोघांनी मुंबईमध्ये फुलविली. या वर्षी ३६०० रोपांचा पहिला बहर घेत त्यापासून ५० ग्रॅम केशर उत्पादन मिळविले.
चिराग याने शेती व्यवसाय व्यवस्थापन विषयातून बी. एस्सी ॲग्रीचे शिक्षण, तर क्रिश आडिया याने बारामतीतील फ्लाइट ट्रेनिंग अकादमीतून पायलट प्रशिक्षण घेतले आहे. क्रिश हा पक्का मुंबईकर असूनही त्याला शेतीची जाम आवड. दोघा मित्रांनी शेतीमध्ये काहीतरी नावीन्यपूर्ण असे काहीतरी करावे असे ठरविले.
मात्र मुंबईसारख्या महानगरात शेतीमध्ये काय करणार, असा प्रश्न होता. त्यातूनच पुण्यातील शैलेश मोडक यांच्या केशर शेतीची माहिती मिळाली. मोडक यांना संपर्क साधून त्यांच्याकडे काही दिवस प्रशिक्षण घेतले. त्यानंतर काश्मीर येथून ‘काश्मिरी मोगरा’ जातीचे ४० किलो केशर कंद ८०० रुपये प्रति किलो दराने खरेदी करून मुंबईला आणले.
...आणि सुरू झाला प्रयोग
केशर कंदाची वाढ काश्मीर सारखी वातावरणीय स्थिती निर्माण करून करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी १० बाय १० फुटांच्या खोलीमध्ये शीतगृह तयार केले. त्यात चिलर बसवून काश्मीरमधील दिवसाचे आणि रात्रीचे तापमान त्या त्या महिन्यानुसार राखण्याचा प्रयत्न केला.
पहाटेपासून सायंकाळपर्यंत केशरसाठी काश्मीरमध्ये ज्या प्रकारचा उजेड असतो, तशी वातावरण निर्मिती करण्यासाठी ग्रोइंग लाइट बसविले. चिलरमुळे तयार झालेली अधिकची वाफ शोषूण घेणाऱ्या आणि कमी पडल्यास अधिकची आर्द्रता तयार करणाऱ्या मशिन शीतगृहात बसविल्या आहेत. या दोन मशिनमुळे केशरच्या गड्ड्यांवर बुरशी तयार होत नाही.
साधारण १५ जुलैच्या दरम्यान प्रयोगास सुरुवात केल्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यात फुले येण्यास सुरुवात झाली. फुले आल्यानंतर त्यांचा प्रयोग खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. साधारण साडेतीन हजार रोपांना आलेल्या फुलांमधून जवळपास ५० ग्रॅम केशर उत्पादन मिळाले.
केशर निर्मिती प्रयोगास सुरुवात करण्यापूर्वी आमच्या मनात प्रचंड धाकधूक होती. केशरला फुले आल्यावर प्रयोग यशस्वी झाल्याने आमचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.चिराग शिंदे-पाटील, ७७१०८ ०१२२२
मी शिकावू पायलट असलो तरी मला शेतीची आवड आहे. प्रयोगास सुरुवात केल्यापासून मागील वर्षभरात आम्ही शीतगृहातील वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी कायम समन्वय ठेवून आहोत.क्रिश आडिया
केशरला प्रचंड मागणी
शीतगृहातील केशर उत्पादनाची चिराग आणि क्रिश यांनी सोशल मीडियाद्वारे जाहिरात केली. उत्पादित केशरची ७०० ते ८०० रुपये प्रति ग्रॅम दराने विक्री केली. येत्या काळात या शीतगृहाचा विस्तार करण्याचा दोघांचा विचार आहे. ही बंदिस्त शेती अधिकाधिक अचूक कशी होईल यावर ते दोघे काम करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.