Saffron Farming : महाराष्ट्रात संपूर्ण नियंत्रित पद्धतीने घेतले काश्मिरी केशर

केशर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काश्मीर उभे राहते. मात्र पुणे येथील शैलेश मोडक यांनी महाराष्ट्रातही काश्मीरच्या दर्जाचे केशर उत्पादन संपूर्ण नियंत्रित व एअरोपोनिक पद्धतीने घेण्यात यश मिळवले आहे. एका ३२० वर्गफुटाच्या कंटेनरमध्ये एक एकराइतके परदेशी भाज्यांचे उत्पादनही त्यांनी घेतले आहे.
Saffron Farming
Saffron FarmingAgrowon

मूळचे नाशिकचे असलेले शैलेश किशोर मोडक हे सध्या पुण्यात स्थाईक झाले आहेत. नाशिकमध्ये ‘बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स’ (बीसीएस) केल्यानंतर ‘एमसीए’ ही पदव्युत्तर पदवी पुण्यातून घेतली. एका खासगी कंपनीत काम करताना कंबोडिया, व्हिएतनाम, युगांडा, मलावी, घाना, मलेशिया, जर्मनी अशा देशांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

साडेपाच वर्षांनंतर ब्रिटन येथील प्रथितयश बँकींग क्षेत्रातील कंपनीमध्येही साडेसहा वर्षे काम केले. दरम्यान लग्न झाले. सातत्याच्या परदेशी फेऱ्यांपेक्षाही भारतातच कुटुंबासमवेत राहताना स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा विचार सुरू झाला. त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्नी सौ. कविता यांनी प्रोत्साहन दिले. तिने कुटुंबाचे सर्व खर्च, ईएमआय, मुलांचे शिक्षण यांची जबाबदारी घेतली. तिच्यासोबतच प्रशांत आणि डॉ. हितेश या दोन्ही बंधूंनी प्रोत्साहन दिल्यामुळे मला पूर्ण वेळ या आवडीच्या व्यवसायात उतरण्याचे धाडस करता आल्याचे शैलेश सांगतात.

Saffron Farming
Sugar Export : साखर कराराबरोबर पाठवणीलाही वेग

उद्योजकतेचा प्रवास

डिसेंबर २०१६ मध्ये धाडस करून नोकरी सोडली तरी नेमका कोणता व्यवसाय करायचा हे निश्‍चित नव्हते. व्यवसायाच्या विविध कल्पना डोळ्यांसमोर होत्या. मात्र रेडिओवरील कार्यक्रमामध्ये मधमाशीपालनाविषयी माहिती ऐकण्यात आली. त्यासंदर्भातील अधिक माहिती व प्रशिक्षण यांचा शोध घेतला. पुणे येथे मधमाशी संशोधन केंद्रातून दोन दिवसाचे मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेतले.

सामान्यतः मधमाशीपालन करणारे त्यातील मध, मेण व अन्य उत्पादनावर लक्ष केंद्रित करतात. त्याऐवजी शेतकऱ्यांना मधपेट्या भाड्याने देण्याचा थोडासा वेगळा व्यवसाय करण्याचा शैलेश यांनी निर्णय घेतला. त्याला नाव दिले ‘पुणेरी पॉलिनेशन सर्व्हिसेस’. त्यासाठी त्यांनी ४३०० रुपये प्रति नग या प्रमाणे ६० मधपेट्या तयार करून घेतल्या. त्या वेळी नेमका डाळिंबाचा हंगाम असल्याने मधपेट्या भाड्याने जाऊ लागल्या.

एका पेटीसाठी १५ दिवसांसाठी १५०० ते २००० रुपये भाडे आकारले जाई. प्रत्येक पिकासाठी मधपेट्या ठेवण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. त्याचा अभ्यास सुरू केला. त्यानुसार शेतकऱ्यांसोबत संपर्क वाढविल्यामुळे मधपेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय वाढू लागला. भाड्याच्या रकमेसोबतच मधपेट्यातून मिळणारे मध, मेण व अन्य उत्पादने हा बोनस होता. या मधाची विक्री ‘एमबी’ज रॉ हनी’ या ब्रॅण्डने सुरू केली.

Saffron Farming
Farmer : मोठे शेतकरी खरेच धनदांडगे आहेत का?

मधमाश्‍यांची संख्या, पर्यायाने मधपेट्यांची संख्याही काही प्रमाणात वाढवली. या व्यवसायामध्ये सुमारे सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र हा व्यवसाय करताना त्यातील आव्हानेही लक्षात आली.

या व्यवसायातील आव्हाने

१) मधपेट्यांची वाहतूक ही रात्रीच्या वेळीच करावी लागते.

२) शेतापर्यंत चांगले रस्ते नसल्याने गाडी जात नाही, अशा वेळी डोक्यावरून वाहतूक करून पेट्या नेऊन शेतामध्ये ठेवाव्या लागतात.

३) संरक्षक पोशाख अंगावर असला तरी मधमाश्या चावण्याची भीती मजुरांमध्ये कायम असते. भीतीपोटी कामासाठी मजूर मिळण्यात अडचणी येतात.

एकूण कष्ट आणि व्यवसायात वाढीवर मर्यादा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व पेट्या मध्य प्रदेशातील एका मधपालकाला ६०ः ४० टक्के दराने व्यवसायासाठी दिल्या. म्हणजे या पेट्यातून रोज लक्ष न देताही त्यांना चाळीस टक्के फायदा मिळत आहे.

या काळातच पुणे येथील पणन मंडळातून आयात- निर्यात व्यवसायासंदर्भात प्रशिक्षण घेतले. काही काळ कंबोडिया, व्हिएतनाममधून भारतीय मसाल्यांच्या आयात निर्यातीचा व्यवसाय केला. त्या वेळी परदेशातील इनडोअर पद्धतीच्या आधुनिक शेतीशी

परिचय झाला. त्यामुळे आयात निर्यातीसाठी डॉकयार्डमध्ये उभ्या असलेल्या कंटेनरमध्येच शेती करण्याची कल्पना शैलेश यांच्या मनामध्ये रुजत गेली. मग सरळ पाच लाख रुपयांमध्ये सेकंडहॅण्ड रेफ्रिजरेटेड कंटेनर विकत घेऊन टाकला.

...असा आहे कंटेनर व त्यातील आधुनिक शेती साधने

- लांबी ८ फूट बाय रुंदी ४० फूट (३२० वर्गफूटाचा) रेफ्रिजरेटेट कंटेनर.

-सुरुवातीला पूर्ण कंटेनरमध्ये हायड्रोपोनिक पद्धतीने परदेशी भाज्यांचे उत्पादन घेतले. आता पार्टिशन करून अर्ध्या भागामध्ये काश्मिरी केशरचे एअरोपोनिक पद्धतीने उत्पादन घेतले जाते.

- रेफ्रिजरेटेड कंटेनरला जोडलेल्या एअर कुलर (एसी)मुळे वजा १७ अंशांपर्यंत तापमान कमी करणे शक्य.

-सेकंडहॅण्ड कंटेनरसाठी ५.५ लाख रुपये अधिक जीएसटी आणि वाहतूक खर्च वेगळा असा एकूण खर्च आला. आतील सर्व संरचना, ट्रे, उभ्या पद्धतीचे बेड यांची संरचना यांचा सर्व खर्चासह २० लाख रुपयांपर्यंत खर्च आला. या डिझाइनच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.

- तापमान नियंत्रणाच्या उद्देशाने आणखी एक चिलर १.४० लाख रुपयांमध्ये खरेदी केला. त्याच प्रमाणे घरचा एक दीड टन वजनाचा जुना एसी येथे लावला.

-कंटेनरमध्ये पूर्वीचा एअर सर्क्युलेटर होता. त्याचा हवा खेळती ठेवण्यासाठी उपयोग होतो.

-कंटेनरमधील आर्द्रता वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी ह्युमिडिफायर आणि डीह्युमिडिफायर वेगवेगळे खरेदी केले आहेत.

- कृत्रिम प्रकाश संश्‍लेषणासाठी लाल, निळा, पांढरा प्रकाश योग्य प्रमाणात आवश्यक असतो. त्यासाठी ‘एलईडी’च्या स्ट्रीप लावल्या. पूर्वी त्या हजार रुपये प्रति स्ट्रीप मिळत. मात्र एका स्टार्टअप उद्योगाकडून कमी खर्चात उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

- पिकांच्या प्रकाश संश्‍लेषणासाठी आवश्यकतेनुसार कार्बन डायऑक्साइड वायू सोडण्यासाठी सिलिंडर व कंट्रोलर जोडले आहे.

Saffron Farming
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

- तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साइड, प्रकाशाचे मोजमाप करण्यासाठी डिजिटल सेन्सर बसवले आहेत. ही सर्व उपकरणे क्लाउड तंत्रज्ञानाने जोडलेली असून, ती मोबाईल किंवा संगणकाद्वारे कोठूनही नियंत्रित करता येतात.

- अर्ध्या भागात केशरचे उत्पादन घेत असून, त्यासाठी पॅम्पोर (काश्मीर)मधील हवामानाप्रमाणे कंटेनरमधील हवामान ठेवले जात आहे.

- या प्रकल्पामध्ये गुंतवणूक एकट्याची असली तरी सहसंस्थापक डॉ. राहुल डाके यांची आरेखनामध्ये मोठी मदत झाली. ते पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सीनिअर पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत. आणखी एक मित्र किरण बोंडे यांचीही तांत्रिक कामांसाठी खूप मदत झाली.

परदेशी पालेभाज्यांचे उत्पादन ः

- कंटेनरमध्ये २४८ बार उभे बसतात. एका बारमध्ये १५ झाडे बसतात. त्यातून ४३०० झाडे बसतात.

- त्याला योग्य हवामान, पोषक अन्नद्रव्ये, प्रकाश संश्‍लेषणासाठी कृत्रिम प्रकाश अशा बाबींचे व्यवस्थापन केले जाते.

- एकूण लावलेल्या ४३०० झाडांपैकी सरासरी ३५०० झाडे चांगली जोमाने वाढली असे गृहीत धरले, तरी चांगले उत्पन्न मिळू शकते.

- शैलेश यांनी स्वतः गार्डनसिटी, विविध जीम येथे या भाज्यांची १२० रुपये प्रति झाड अशी विक्री केली. मात्र किमान १०० रुपये प्रति झाड असे उत्पन्न मिळाले तरी ३.५ लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातून उत्पादन खर्च एक लाख रु. होतो.

-शैलेश यांनी २०१९ पासून आजवर परदेशी भाज्यांच्या १० बॅच घेतल्या.

-बाह्य वातावरणामध्ये लेट्यूस उत्पादनासाठी ६० ते ६५ दिवस लागतात. इथे आपण लेट्यूसचे उत्पादन ४० ते ४५ दिवसांत मिळते. त्यामुळे वर्षातून ८ बॅच घेता येतात. एखाद्या बॅचला अडचण आली तरी किमान सहा ते सात बॅच नक्कीच घेता येतात. म्हणजेच १५ ते १७.५ लाख रुपयांचा निव्वळ फायदा मिळतो. अशा प्रकारे एक ते दीड वर्षामध्ये संपूर्ण प्रकल्पाचा खर्च निघून येत असल्याचे शैलेश मोडक सांगतात.

- खरेतर एसी संपूर्ण दिवस चालू ठेवण्याची गरज नसते. पूर्वी आम्ही पूर्ण वेळ एसी सुरू ठेवत असल्यामुळे खर्च वाढत होता. आता आम्ही त्यातही योग्य तापमान आल्यानंतर एसी बंद करण्याचा प्रयोग राबवला. संपूर्ण इन्सुलेटेट असल्यामुळे १७ ते २५ अंशांपर्यंत लेट्यूस चांगले वाढते. त्यामुळे दिवसातून केवळ तीन ते चार तास एसी चालवतो, त्यामुळे एसी व विजेच्या खर्चात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत झाली.

- लेट्यूस प्रमाणेच केल, पार्सेली यासारख्याही परदेशी भाज्या घेतल्या.

आधुनिक शेतीव्यतिरिक्त अधिक उत्पन्नासाठी राबवलेले उपक्रम...

१) मागणीनुसार शहरी लोकांना टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये घरगुती भाजीपाला उत्पादनाचे आधुनिक सेटअप उभारून देणे.

२) संपूर्ण नियंत्रित आधुनिक शेती पद्धतीचे दोन दिवसाचे प्रशिक्षण वर्ग घेतले. आजवर ७०० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण दिले. त्यात विविध कंपन्यांचे सीईओ, आयटी क्षेत्रातील लोक, विद्यार्थी, शेतकरी यांचा समावेश आहे.

संपूर्ण हवामान नियंत्रित केशर शेती -

कंटेनर किंवा बंदिस्त हरितगृहामध्ये संपूर्णपणे वातावरण नियंत्रित करता येत असल्यामुळे तात्त्विकदृष्ट्या कोणतेही पीक घेऊ शकतो. तरीही आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर आणि नावीन्यपूर्ण पिकांचा शोध सुरू झाला. वेगवेगळ्या औषधी वनस्पती, परदेशी भाज्या, मसाले पिकांचे पर्याय तपासताना केशर हे पीक पुढे आले.

कारण काश्मीरमध्ये केवळ ३.८९ टन केशरचे उत्पादन होते. मात्र आपली मागणी सुमारे १०० टनांची आहे. उर्वरित केशर हे प्रामुख्याने इराणमधून आयात केले जाते. एक ग्रॅम केशर ग्रेडनुसार ३५० ते ९०० रुपये मिळते. काश्मीरमध्ये जरी साध्या शेतीमध्ये केशरचे उत्पादन घेतले जात असले, तरी परदेशामध्ये इनडोअर पद्धतीने केशर उत्पादन घेतले जाते.

Saffron Farming
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

प्राथमिक प्रयोगासाठी म्हणून काश्मीर येथील पॅम्पोर भागातून १२ किलो कंद मागवले. मात्र कंद (बल्ब), लहान आकाराचे कंद किंवा कंदगोळ्या (कॉर्मलेट) असे मिश्र कंदातून प्रतवारी केली असता केवळ चार किलो चांगले कंद निघाले. नियंत्रित तापमानात कंटेनरमध्ये चांगले वाढत असल्याचे लक्षात आले. मग अधिक अभ्यासासाठी पॅम्पोर गाठले. चार ते पाच दिवस राहून तेथील केशरची शेती पाहिली.

केशर उत्पादकांसोबत चर्चा केली. आपण महाराष्ट्रात केशर शेती करणार असू, तर काश्मीरमध्येही आपले अस्तित्‍व असले पाहिजे या उद्देशाने तिथे एका शेतकऱ्यांचे एक एकर शेतही कराराने घेतले. त्यामुळे केशरचे कंद दोन्ही ठिकाणी कसे वाढतात, याचा अंदाज मिळणार होता. येथूनच निवडून फक्त चांगल्या प्रतिचे कंद ५०० किलो घेतले. सामान्यतः कंदाचा दर ४०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत असतो.

मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शेती करायची तर अधिक अभ्यास करण्याची गरज होती. कारण काश्मीरमध्ये पारंपरिक पद्धतीने केशरची शेती केली जाते. त्यांना माध्यमरहित स्थितीमध्ये अन्नद्रव्य व अन्य व्यवस्थापनाची फारशी माहिती नव्हती. अशा वेळी इंटरनेटवर माहिती शोधत असताना इराण येथील तज्ज्ञ डॉ. अरडलंन यांचे नाव समजले. त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दुबई येथील परिषदेमध्ये त्यांची खास भेट घेऊन अधिक माहिती घेतली. त्यातूनही आधुनिक केशर शेतीतील अनेक गोष्टी, बारकावे लक्षात आले.

Saffron Farming
Bhima Sugar Election : भीमा’ वर महाडिकांचेच वर्चस्व

केशर पिकाविषयी अधिक माहिती ः

-केशर (शा. नाव ः Crocus sativus L.)

-सामान्यतः इराण, भारत, ग्रीस अशा देशामध्ये लागवड.

-आपण जे केशर (इंग्रजीमध्ये Saffron) म्हणून वापरतो, ते असतात फुलांतील वाळवलेला लाल स्टिग्मा. त्यामध्ये १५० पेक्षा अधिक संप्लवनशील (म्हणजे त्वरित हवेत उडून जाणारी) आणि सुगंधी द्रव्ये असतात. उदा. टर्पेन्स, टर्पेन अल्कोहोल आणि त्यांचे इस्टर.

- फुलामध्ये पिवळ्या रंगाचे परागदांडे असतात. त्याचा वापरही प्रोटिन्स, औषध आणि सौदर्यप्रसाधनामध्ये होतो.

-एका कंदापासून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात साधारणपणे तीन फुले मिळतात.

-डिसेंबरपासून कंद माध्यमामध्ये वाढण्यासाठी सोडले जातात. त्यापासून मार्चमध्ये आणखी चार कंद मिळतात. मार्च ते ऑगस्टपर्यंत कंदाची सुप्तावस्था असते. पारंपरिक शेतकरी नवीन तयार झालेल्या लहान कंदांना एक वर्षापर्यंत शेतातच राहू देतात. पुढील हंगामातील उत्तम वाढीसाठी कंदाची सुप्तावस्था नेमकी किती असावी, याबाबत अधिक प्रयोग आणि अभ्यास करण्याचा मानस शैलेश यांनी व्यक्त केला.

Saffron Farming
Fodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन

- म्हणजेच एका कंदापासून हंगामामध्ये तीन फुले आणि चार कंद मिळतात. मूळचा कंदही सामान्यतः आठ वर्षापर्यंत वापरता येतो.

- आधुनिक शेतीमध्ये एका ट्रेमध्ये आकारानुसार चारशे ते सहाशे कंद बसतात. अर्ध्या कंटेनरमध्ये सुमारे ५०० किलो कंदाची वाढ करता येईल. त्यापासून सुमारे एक ते सव्वा किलो केशर मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचा ४९९ रुपये प्रति ग्रॅम या बाजारभावाप्रमाणे किंमत ६, २३,७५० रुपये असेल.

कंटेनर व पायाभूत सुविधा उभारणीचा खर्च वगळता पहिल्या वर्षी ८ लाख रुपये खर्च झाला. मात्र पुढील कंद व अन्य बाबी स्वतःच्या असल्याने खर्चात बचत होईल. एकूण गुंतवणुकीवरील परतावा (आरओआय) १.२ पर्यंत राहतो.

-वारजे येथील प्लँटसोबतच बेळगांवमध्येही एक प्रकल्प सुरू केला आहे. तिथेही १३० किलो कंद वाढवले जात आहेत.

- कंदाच्या उत्तम वाढीसाठी पॅम्पोर येथील माती, कोकोपीट, पर्लाईट आणि एअरोपोनिक्स (हवेमध्ये मिस्टिंगद्वारे खते देऊन) पद्धतीने वाढ करण्याचे प्रयोग पुढील टप्प्यात करणार आहे. त्याच्या निष्कर्षानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील, असे शैलेश यांनी सांगितले.

शैलेश मोडक, ९७६७५८९९९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com