डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलगSugarcane Crop Management: ऊस तोडणी करताना हंगामनिहाय म्हणजेच आडसाली, पूर्वहंगामी, सुरू तसेच खोडव्याचा ऊस यांचा विचार करावा. ऊस जातिनिहाय म्हणजे लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती, मध्यम पक्व होणाऱ्या ऊस जाती आणि उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातींचा विचार करून तोडणी कार्यक्रम तयार करून तो राबविणे आवश्यक आहे. योग्य परिपक्वतेच्या अवस्थेत म्हणजे ब्रिक्स १८ ते २० टक्के असताना ऊस तोड केल्यास साखर उतारा वाढतो, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते..ऊस पिकाचे उत्पादन केवळ क्षेत्रफळ, जाती आणि व्यवस्थापन पद्धतींवर अवलंबून नसून, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे ऊस तोडणी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा ऊस वेळेआधी किंवा उशिरा तोडल्यास साखरेचा उतारा घटतो, गाळप कार्यक्षमतेत घट होते आणि शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ऊस परिपक्वतेचे अचूक मूल्यांकन, योग्य तोडणी पद्धतींचा अवलंब, तसेच तोडणीनंतरची काळजी या सर्व टप्प्यांचे नियोजन शास्त्रीय पद्धतीने करणे अत्यावश्यक आहे..ऊस तोडणी करताना हंगामनिहाय म्हणजेच आडसाली, पूर्वहंगामी, सुरू तसेच खोडव्याचा ऊस यांचा विचार करून आणि ऊस जातिनिहाय म्हणजे लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती, मध्यम पक्व होणाऱ्या ऊस जाती आणि उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातींचा विचार करावा. त्यानुसार तोडणी कार्यक्रम तयार करून तो राबवावा..Sugarcane Harvest: दौंड तालुक्यात पावसामुळे ऊस तोडणी रखडली.साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी वेळोवेळी नमुने घेऊन नियोजनबद्ध ऊस तोडणी कार्यक्रम राबवल्यास गुणवत्ता टिकते, साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर राहते, कारखान्याला नियमित ऊसपुरवठा होतो, गाळप कार्यक्षमतेत वाढ होते.ऊस तोडणी योग्य परिपक्वतेच्या अवस्थेत करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यावरच साखरेचा उतारा, रसाची गुणवत्ता आणि आर्थिक परतावा अवलंबून असतो. जर ऊस अपरिपक्व अवस्थेत तोडला गेला तर त्यातील साखर पूर्णपणे तयार झालेली नसते, त्यामुळे रस पातळ राहतो, साखरेचे प्रमाण कमी मिळते आणि कारखान्याच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो..अति परिपक्व ऊस उशिरा तोडल्यास गोडी कमी होते, साखरेचे रेणू रिड्युसिंग शुगरमध्ये रूपांतरित होऊ लागतात, ज्यामुळे फर्मेंटेशन सुरू होऊन साखर नष्ट होते आणि कारखान्याला कमी उतारा मिळतो. परंतु योग्य परिपक्वतेच्या अवस्थेत म्हणजे ब्रिक्स १८ ते २० टक्के असताना ऊस तोड केल्यास साखर उतारा वाढतो, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे ऊस परिपक्वतेचे अचूक मूल्यांकन करूनच ऊस तोडणी करणे हे खूप आवश्यक आहे..ऊस परिपक्वतेची लक्षणेयोग्य परिपक्वता ओळखणे हे तोडणी नियोजनातील एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.पानांचा हिरवटपणा कमी होऊन थोडीशी पिवळसर छटा दिसू लागते. कांड्या पूर्णपणे भरलेल्या, जाडसर दिसतातरसाची गोडी वाढलेली असते, ब्रिक्सचे प्रमाण साधारणतः १८ ते २० टक्के असते.डोळ्यांच्या भागात रस साचत नाही, हे ऊस पूर्ण परिपक्व झाल्याचे महत्त्वाचे लक्षण आहे..तोडणीपूर्वी उसाला पाणी दिल्यास उसाच्या पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढते आणि रस पातळ होतो तसेच अति पाणी दिलेल्या उसामध्ये ओलावा जास्त असल्याने तोडणीनंतर तो लवकर कुजतो किंवा आंबतो. त्यामुळे उसातील साखरेचे प्रमाण कमी होते. पाणी देणे थांबविल्यास कांडीमध्ये रस घट्ट होतो, साखरेचा संचय वाढतो. त्यामुळे तोडणीवेळी कारखान्याला मिळणारा साखर उतारा जास्त मिळतो. म्हणून १५ ते २० दिवस आधी पाणी बंद केल्यास उसाचा ओलावा संतुलित राहतो आणि तोडणीनंतर गुणवत्तायुक्त व टिकाऊ ऊस मिळतो..Sugarcane Harvest: दौंड तालुक्यात पावसामुळे ऊस तोडणी रखडली.ऊस तोडणी नेहमी जमिनीलगत करावी. कारण खालच्या कांड्या सर्वात परिपक्व आणि गोड असतो. या भागामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, तर वरच्या भागात अजून अपूर्ण साखर म्हणजेच ग्लुकोज व फ्रुक्टोज चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वरून तोडणी केल्यास साखरेचा उतारा कमी मिळतो आणि कारखान्याला दर्जेदार ऊस मिळत नाही..जमिनीच्या लगत तोडणी केल्यास खोडवा एकसमान व जोमदार फुटतो. जमिनीलगत ऊस तोडणी केल्यास साखरेचा उतारा ०.८ ते १ टक्क्यांनी अधिक मिळतो. त्यामुळे स्वच्छ कोयता, माती न येता, पाचट काढून, जमिनीलगत ऊस कापणे हे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे..तोडणीपूर्वी रासायनिक खतांचा वापर केल्यास रसातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढते आणि रस आंबट होतो त्यातील साखर कमी होते. यामुळे कारखान्याच्या क्रशिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात व साखरेचा रंग, गुणवत्ता व उतारा दोन्ही कमी होतात..ऊस तोडल्यानंतर त्यातील पेशी श्वसनक्रिया सुरू ठेवतात, त्यामुळे उसातील साखर हळूहळू ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रूपांतरित होते. हा प्रक्रियेला इन्व्हर्जन म्हणतात. तोडणीनंतर ऊस उघड्यावर ठेवल्यास सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे रसाचे बाष्पीभवन होते. काही वेळा ऊस आंबतो, बुरशी किंवा जिवाणू वाढतात त्यामुळे साखरेचा उतारा घटतो आणि अशा उसापासून मिळणारी साखर पिवळट व कमी दर्जाची होते. त्यामुळे ऊस तोडणीपासून गाळपापर्यंतचा कालावधी २४ तासांपेक्षा अधिक नसावा..पूरग्रस्त क्षेत्रातील ऊस तोडणी करताना साखरेचा उतारा टिकवून ठेवणे आणि उत्पादनातील नुकसान कमी करणे यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. पुराच्या पाण्यामुळे ऊस वाढीवर, मुळांच्या आरोग्यावर आणि साखर संचयावर प्रतिकूल परिणाम होतो. पूर ओसरल्यानंतर जमिनीत जास्त ओलावा टिकून राहतो, त्यामुळे जमीन थोडीफार कोरडी झाल्यावरच जमिनीलगत तोडणी करावी. अति ओलसर किंवा चिखलयुक्त जमिनीत तोडणी केल्यास ऊस मातीने माखतो, ज्यामुळे त्याची गुणवत्ता व गाळप कार्यक्षमता घटते. तसेच पुरामुळे रसातील साखरेचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याने तोडणीनंतरचा ऊस शक्य तितक्या लवकर गाळपासाठी पाठवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा ऊस आंबण्याची शक्यता वाढते, साखर उताऱ्यात लक्षणीय घट होते.- डॉ. समाधान सुरवसे ९८६०८७७०४९(वसंतदादा शुगर इन्टिट्यूट, मांजरी बु., पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.