Pomogranate, Grape Farming Agrowon
यशोगाथा

Pomogranate, Grape Farming : फळबाग केंद्रित नियोजित शेतीतून उल्लेखनीय प्रगती

नंदकिशोर आणि प्रदीप या साळुंके बंधूंनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल केला. मोसंबी ऐवजी डाळिंब व द्राक्षाची निवड केली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

सतत अवर्षणग्रस्त स्थिती असलेल्या गोलटगाव (जि. औरंगाबाद) येथील नंदकिशोर आणि प्रदीप या साळुंके बंधूंनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल केला. मोसंबीऐवजी डाळिंब व द्राक्षाची निवड केली.
अलीकडील काही वर्षांत एकत्रित कुटुंब पद्धती, सिंचन व्यवस्था, पीक व्यवस्थापन, विक्री आदी बाबी बळकट करून शेतीची व कौटुंबिक उल्लेखनीय प्रगती त्यांनी साधली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात या मुख्य शहरापासून सुमारे ३५ किलोमीटवर गोलटगाव आहे. येथील नंदकिशोर व प्रदीप या साळुंके बंधूंची २७ एकर संयुक्त शेती आहे. वडिलोपार्जित शेतीत मोसंबी, मका, सोयाबीन, कपाशी आदी पारंपरिक पिके घेतली जायची. नंदकिशोर सांगतात की दर तीन ते चार वर्षांनी आम्हाला दुष्काळाची स्थिती अनुभवावी लागायची. मोसंबीचे व्यावसायिक पीक येण्यास चार ते पाच वर्षे लागायची. अशावेळी हे पीक परवडणारे राहायचे नाही. सन २०१२ मध्ये मोसंबीची बाग दुष्काळानं गेली. त्या वेळी मग पर्यायी पिकाचा विचार करून डाळिंबाची निवड केली. सन २०१२ मध्ये ४ एकरांत
१२ बाय ८ फूट अंतरावर लागवड झाली. अनुभवी शेतकरी, वाचन, याद्वारे या पिकाचे चांगले व्यवस्थापन ठेवून बाग चांगली उत्पन्नक्षम केली. त्यामुळेच २०१७ मध्ये पुन्हा चार एकरांवर डाळिंबाचा विस्तार केला. आर्थिक जोड म्हणून २०१७-१८ च्या दरम्यान अडीच एकरांवर द्राक्ष लागवडही केली.

पाण्याची भक्कम सोय

दुष्काळाची जोखीम सतत असल्याने पाणी व्यवस्था भक्कम करण्यावर भर दिला. जवळपास पाच विहिरी खोदल्या. ३५ बाय ३५ मीटर आकाराची दोन शेततळी बांधली. गावच्या पूर्व भागात असलेल्या धरणा शेजारी जागा घेऊन तेथे विहीर घेत तेथून पाइपलाइनने पाच किलोमीटर शेतात पाणी आणले. फळबाग क्षेत्र वाढविल्याने पुन्हा पश्‍चिम भागात धरणाखाली जागा घेऊन अडीच किलोमीटर पाइपलाइन केली. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी २० एकर क्षेत्र ठिबकखाली आणले.

नेटके व्यवस्थापन

-पूर्वी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये डाळिंब बाजारपेठेत येईल असे व्यवस्थापन असायचे. मात्र तेलकट डाग रोगाची समस्या सुरू झाल्यापासून पावसाळ्यातील धोका ओळखून जुलै व ऑगस्टमध्ये ‘हार्वेस्टिंग’ होईल असे नियोजन.
- ‘हार्वेस्टिंग’ नंतर चार ते पाच दिवसांनी एक टक्का बोर्डो मिश्रण फवारणी. त्यानंतर ठिबकद्वारे एकरी १९:१९:१९ पाच किलो, त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये २.५ लिटर असे पाच दिवसांच्या अंतराने देण्यात येते.
-शेणखत १० ते १५ किलो, गांडूळ खत दोन किलो, १०:२६:२६ हे ५०० ग्रॅम, दुय्यम अन्नद्रव्ये (कॅल्शिअम, सल्फर, मॅग्नेशिअम) ३०० ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्य १०० ग्रॅम प्रति झाड.
-विश्रांती काळात बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी किडी-रोगांची तीव्रता पाहून होते.
-ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच ०- ५२- ३४ पाच किलो एकरी याप्रमाणे वापर करून पाणी बंद केले जाते ताण सुरू केला जातो. १५ ते २५ डिसेंबर काळात वाढ नियंत्रकाचा वापर करून पानगळ.
-पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा वापर.
-जिवामृत एकरी २०० लिटर महिन्यातून एकदा. तर कडधान्य स्लरी प्रति दोन महिन्यांनंतर.
-छाटणी करताना अनावश्‍यक, रोगग्रस्त काड्या काढून टाकणे, झाडाला व्यवस्थित आकार देणे आदी नियोजन होते.
-तेलकट डाग रोगाची समस्या दूर करण्यासाठी जिवाणूनाशक, ताम्रयुक्त बुरशीनाशक आदींचा वापर.
तसेच पाणी व्यवथापनामध्ये बदल. बागेतील आर्द्रता वाढणार नाही याची काळजी घेतली.
झाडातील स्फुरद, पोटॅश यांची पातळी संतुलित ठेवली. यंदा रोगाचे प्रमाण खूप असल्याचे जाणवले.

उत्पादन

सन २०१५ मध्ये जुन्या चार एकरांत एकूण २५ टन उत्पादन तर प्रति किलो ६५ रुपये दर मिळाला.
अलीकडील वर्षांत दुष्काळाची व अनुकूल स्थिती लक्षात घेऊन एकरी चार टनांपासून ते सात ते आठ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. किलोला ५०, ५५ ते ७३ रूपयांपर्यंत दर मिळाला आहे.
सन २०१९ मध्ये दुष्काळी परिस्थितीत सुमारे तीन लाख रुपयांचे पाणी विकत घेण्याची वेळ आली.
मागील वर्षी डाळिंबाची बाग व्यापाऱ्याला १४ लाख ३५ हजार रुपयांना दिली. नव्या बागेतही यंदा चांगल्या दर्जाच्या फळांना १०७ रुपये दर मिळाला. व्यापारी जागेवर येऊन मालाची खरेदी करतात.
द्राक्षाची माणिक चमन जात लावली आहे. सन २०१९-२० मध्ये अडीच एकरांत ३६ टन उत्पादन घेतले. ४० रुपये प्रति किलो दराने माल व्यापाऱ्याला दिला. मागील वर्षी मात्र २५ रुपये या कमी दराने
द्राक्षे विकावी लागली.

कुटुंबातील एकीतून प्रगती

नंदकिशोर, पत्नी सुरेखा, बंधू प्रदीप, त्यांची पत्नी शीतल, वडील त्र्यंबक व आई सुमन
असे सर्व जण शेतीत राबतात. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबर एकमेकांच्या मदतीमुळे श्रमांची विभागणी झाली आहे. जमा-खर्चाचा हिशेब नियमित ठेवण्यात येतो.
फळबाग पीक पद्धती शेतीमुळे कौटुंबिक तसेच शेतीत प्रगती करणे कुटुंबाला शक्य झाले. तीन एकर शेती विकत घेता आली. साडेचार लाखांचा ट्रॅक्टर, पावणेतीन लाखांचा ब्लोअर घेता आला. विहिरी, पाइपलाइन, शेततळ्यांचे अस्तरीकरण आदी कामे करता आली. घराचे काही काम झाले आहे. मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देता आले आहे.

ज्ञानावृद्धीचा फायदा

‘ॲग्रोवन’मधील डाळिंब, द्राक्षावरील लेख, शेतकरी यशकथा यांच्या सातत्यपूर्ण वाचनातून शेती व पिकांचे शास्त्र समजून घेता आले. सकाळ- ॲग्रोवनने प्रकाशित केलेली डॉ. हरिहर कौसडीकर,
सुधीर सोनवणे आदींच्या पुस्तकांचा फायदा झाला. प्रशिक्षण शिबिरे, तज्ज्ञांशी सल्लामसलत यामुळेही शेतीतील बारकावे समजण्यास मोठी मदत होत असल्याचे साळुंके सांगतात.

संपर्क ः नंदकिशोर साळुंके, ९५५२१९७९७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT