Oil Palm Agrowon
यशोगाथा

Oil Palm Farming : ‘ऑइल पाम’सह फळपिकांच्या विविधतेतून उन्नती

एकनाथ पवार

Farmer Success Story : मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्हयात हिर्लोक (ता. कुडाळ) गाव आहे. डोंगरदऱ्या, जंगल असा निसर्गाचा वरदहस्त भागाला लाभला आहे. गावातील बाजीराव झेंडे हे प्रगतिशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील मोहरे (ता. पन्हाळा) आहे.

वडील बच्चाराम १९७६ च्या दरम्यान नोकरीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. हिर्लोक येथे त्यांनी १०८ एकर पडीक जमीन खरेदी केली. येथेच छोटेसे घर बांधले. आंबा, नारळाची लागवड केली. बाजीरावकोकणातच वाढले.

दापोली येथील कृषी महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण (१९९६) पूर्ण केले.दरम्यान, वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीची सूत्रे आपल्या हाती घेतली.

‘ऑइल पाम’चा प्रयोग

सन १९९२ मध्ये कोकण विकास महामंडळाची स्थापना झाली. त्या माध्यमातून कोकणात सुमारे एक हजार ऑइल पाम (तेल्यामाड) झाडांची लागवड शेतकऱ्यांकडे करण्याचा प्रयोग केला जाणार होता. त्यासाठी जागा करारावर घेण्यात येई. झेंडे यांच्याही ३० एकरांवर ही लागवड झाली. तसा करारही झाला.

झेंडे यांना या शेतीतून चांगला फायदाही मिळत होता. सात- आठ वर्षांनी महामंडळाकडील निधी थांबल्याने हा प्रकल्पच थांबला. या घटनेमुळे झेंडे यांच्यासमोर ऑइल पाम बाजारपेठेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. तीस एकरांवरील झाडे तोडणेही परवडणारे नव्हते.

दरम्यान, झेंडे यांचा मित्र गोव्यात प्रसिद्ध खासगी कंपनीत अधिकारी होता. ही कंपनी ऑइल पाम खरेदी करायची. त्यातून पुन्हा एकदा संधी चालून आली. कंपनीने संपूर्ण लागवडीची पाहणी करून

झेंडे यांच्यासोबत करार केला. आज २१ वर्षे झाली. या खरेदी-विक्रीत सातत्य राहिले असून, इतक्या वर्षांच्या झाडांच्या संगोपनातून व व्यवस्थापनातून हे पीक झेंडे यांनी यशस्वी केले आहे. सध्या एकूण २१०० (नव्या चारशे झाडांसह) झाडे आहेत. प्रत्येक झाडाला वर्षभरात १० घड येतात. एक घड १० किलोपासून ते ७० किलोपर्यंत असतो.

कच्च्या तेलाच्या दरांच्या १० टक्के त्यास दर देऊन कंपनीतर्फे झेंडे यांना परतावा देण्यात येतो. या झाडाला वन्यप्राण्यांची भीती नाही. तसेच मालाचीही चोरी नाही. फक्त शाश्‍वत खरेदीदार किंवा हमीची बाजारपेठ पाहिजे, असे झेंडे सांगतात.

फळपिकांचे व्यवस्थापन

शेतीतील २७ वर्षांचा अनुभव. सुमारे २१४ एकर क्षेत्र. त्यात ऑइल पामसह, नारळ २५०० झाडे, काजू ४०००, आंबा १२००, सुपारी २०००, बांबू बेटे २०००, मिरी ५०० अशी झाडांची लागवड,

नारळात बाणवली, काजूत वेंगुर्ला चार, सात आणि नऊ, बांबूमध्ये माणगा, आंब्यात हापूस, केसर आदी जाती.

रक्तचंदन आणि सफेद चंदनाच्या प्रत्येकी शंभर झाडांचा प्रयोग. भात, भुईमूग, भाजीपाला. कुळीथ आदी पिके आहेतच.

मार्केट

कुडाळला नारळाची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तेथेच विक्री होते. काजू बी खरेदीसाठी कारखानदार थेट बागेत येतात. बांबूला चांगली मागणी आहे. व्यापारी बागेत येऊन तोडणी करून चांगला दर देतात. हिर्लोक परिसरात आंबा १५ मेनंतर तयार होतो. त्यामुळे बहुतांशी आंबा कॅनिंगसाठी दिला जातो. सर्व फळपिकांमधून पंचवीस लाखांहून अधिक वार्षिक उलाढाल होते.

कलिंगडाची निर्यात

एप्रिलच्या दरम्यान बाजारात आणण्याच्या हिशेबाने दरवर्षी चार ते पाच एकरांत कलिंगड लागवड केली जाते. दोन वर्षे ३० टन व २५ टन या प्रमाणे पुणे येथील निर्यातदाराच्या माध्यमातून कलिंगडे कुवेत येथे निर्यात केली. सध्या गोवा हेच मुख्य मार्केट आहे. एकरी आठ टनांपर्यंत उत्पादन मिळते.

संकटे झेलत शेती

झेंडे यांनी जिवापाड जपलेल्या दोनशेहून अधिक नारळांची नासधूस हत्तींनी केली. त्यामुळे हतबलता आली. हत्तींचे वास्तव्य असेच राहिले, तर उरलीसुरली झाडेही ते नेस्तनाबूत करतील अशी भीती होती. परंतु काही दिवसांत हत्ती माघारी गेले. त्यानंतर नव्याने दोनशे झाडांची लागवड केली. मात्र त्यांनाही वानरांचा मोठा त्रास असतो.

त्यामुळे झाडांची संख्या जास्त असली तरी उत्पादन कमी हाती पडते असे झेंडे सांगतात. कोकणातील अनेक फळपिकांचे उत्पादन व उत्पन्न सुरू होण्यास तीन वर्षांहून अधिक काळ लागतो. त्यामुळे अनेक वेळा बॅंकांकडून कर्जे मिळत नाहीत अशीही व्यथा त्यांनी बोलून दाखविली.

शेतीनिष्ठ पुरस्कार ते आत्मा समितीचा पदभार

कर्तृत्वाची दखल घेऊन शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने (सन २००४) झेंडे यांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी ‘आत्मा’चे तालुका, नंतर जिल्हास्तरीय अध्यक्षपद व आता ते राज्य समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी योजना, प्रशिक्षणे, शेतकरी सहलींचे आयोजनही त्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT