Pune News : पुणे जिल्ह्यातील हिवरे येथील दळवी कुटुंबाची अवघी पाऊण एकर शेती. पण काही वर्षांपासून चिकाटी व जिद्दीने दुग्धव्यवसायात सातत्य ठेवत त्यास व्यावसायिक रूप दिले. थेट दूधविक्री व विविध उत्पादनांच्या निर्मितीतून व्यवसायाचे सीमोल्लंघन केले. आज महिन्याला सात- आठ लाखांची उलाढाल करीत ग्राहकांमध्ये दळवी ब्रॅण्ड लोकप्रिय करीत या व्यवसायातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील हिवरे येथील अशोक दळवी यांची केवळ पाऊण एकर शेती. सुमारे पंचवीस ते ३० वर्षांपासून त्यांनी पारंपारिक पद्धतीने गाय व म्हैस पालन करून दुग्ध व्यवसायात सातत्य ठेवले. बाहेरून विकत आणून त्यावर खर्च न करता गोठ्यातच पैदास करीत आजमितीला २५ गायी (एचएफ संकरित) तर ८ मुऱ्हा म्हशी दावणीला आहेत. व्यवसायाची अशी घडी बसली असताना सन २०१७ मध्ये दुधाचे दर अत्यंत घटून लिटरला १६ ते १७ रुपयांपर्यंत खाली आले. चारा व अन्य खर्चही वाढले होते. आर्थिक अडचणी सुरू झाल्या.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संकटानेच दाखवला मार्ग
इतक्या वर्षांपासून नेटाने सुरू असलेला व्यवसाय आता बंद करावा काय असा विचार दळवी कुटुंब करू लागले. या काळात अशोक यांचा मुलगा दिग्विजय एका आघाडीच्या मोटर कंपनीच्या वितरकांकडे विक्री विभागात कार्यरत होता. आपण अन्य कंपन्यांसाठी मार्केटिंग करण्यासाठी सर्व कष्ट करतो. मग घरच्याच संकटात आलेल्या व्यवसायाल सावरताना मार्केटिंग आपणच केलं, स्वतःचीच बाजारपेठ तयार केली तर आपली प्रगती का नाही होणार? असा विचार दिग्विजय यांनी केला. नोकरीचा राजीनामा देत ते घरच्या व्यवसायात पूर्णवेळ उतरले.
थेट ग्राहक विक्री व्यवस्था तयार केली
दळवी पितापुत्रांनी मग थेट ग्राहकांना दूध विक्री करण्याचे नियोजन सुरू केले. विक्री- मार्केटिंगचा पूर्वीचा अनुभव दिग्विजय यांनी आपल्या व्यवसायासाठी वापरण्यास सुरवात केली. आपल्या दुधाची गुणवत्ता सांगणारी माहितीपत्रके तयार केली. दोनशे मिली दूध पॅकिंगचे मोफत देण्यासाठीचे नमुने तयार केले.
पुणे शहरातील कोंढवा परिसरात मित्रमंडळी, निवासी सोसायट्यांमध्ये माहितीपत्रके व दूध नमुन्यांचे वाटप सुरू केले. सकाळच्या वेळी उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्येही अशा प्रकारे जाहिरात केली. हळूहळू ग्राहकांना दुधाची गुणवत्ता पटू लागली. सुरवातीला केवळ अडीच लिटरची होणारी थेट विक्री टप्प्याटप्प्याने गंगाधाम चौक, मार्केट यार्ड, कोंढवा या परिसरात ७० ते ८० लिटरपर्यंत वाढली. आजमितीला ती दररोज २५० लिटरपर्यंत पोचली आहे.
दुधाचे मूल्यवर्धन व विक्री व्यवस्था
थेट विक्री यशस्वी होऊ लागली तसे दळवी कुटुंबाने पुढील पाऊल उचलले ते मूल्यवर्धनातून. बाजारपेठेतील गरज व ग्राहकांची मागणी ओळखून पनीर, खवा, ताक, लस्सी, तूप, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी अशी उत्पादने तयार करण्यास सुरवात केली. ‘मिल्किंग’ चे, ‘पॅकिंगचे तसेच खवा तयार करण्याचे यंत्र आदी सामग्री घेण्यास सुरवात केली. कुटुंबाच्या घरापासून गोठा जवळ आहे. तेथेच ‘आऊटलेट’ही सुरू केले.
यंदाच्या गणपती उत्सवात पेढे आणि मोदक तयार करून ४० किलोच्या पुढे विक्री केली. आज सुमारे दोनशे ग्राहकांचा ‘व्हॉटस ॲप’ ग्रुप तयार केला आहे. त्याद्वारे पदार्थांची आगाऊ मागणी स्वीकारली जाते. दुधाचे रतीब पोचवण्यासाठी तीन कामगार तैनात केले आहेत. गायीच्या दुधाची ५५ रुपये तर म्हशीच्या दुधाची ७० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. मूल्यवर्धित पदार्थांची विक्री उत्पादन प्रकारानुसार ३०० ते ७०० रुपये प्रति किलो वा लिटर या दराने होते.
कुटुंबातील सर्वांचे श्रम आले फळाला
अशोक व दिग्विजय दोघेही गोठा व्यवस्थापन व पदार्थ निर्मितीत राबतातच. पण दिग्विजय यांना आई शोभा यांचीही मोठी मदत मिळते. त्यांची पत्नी पल्लवी या प्राध्यापिका आहेत. मात्र त्याही पहाटे उठून शेण संकलन तसेच गोठ्यातील कामांची जबाबदारीही पेलतात. कुटुंबातील सर्वांच्या कष्टांतून व्यवसाय वृद्धिंगत झाला.
आज पुणे शहरातील हडपसर येथे दुसरे ‘आऊटलेट’ सुरू केले आहे. पंधरा ते वीस लाखांची यांत्रिक गुंतवणूक झाली आहे. महिन्याला सात ते आठ लाखांची उलाढाल होत आहे. आता चाऱ्यापासून मुरघास करून सायलोमध्ये साठवणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी या यंत्राची मागणी नोंदवली आहे.
ग्राहकांचा विश्वास हेच तत्त्व
गुणवत्ता अखंड राखल्यानेच ग्राहकांसोबत ऋणानुबंध तयार करणे शक्य झाले. त्यामुळेच दळवी डेअरी ब्रॅण्ड विकसित करू शकलो असे अशोक सांगतात. दूध काढल्यानंतर त्वरित पुढील दहाव्या मिनिटांमध्ये कुलरमध्ये तीन अंश सेल्सिअसला ते थंड केले जाते. त्यानंतर ‘फिल्टर’ करून त्याचा पुढे ग्राहकांना पुरवठा होतो. कोरोना काळात दुधाबरोबर भाजीपाल्याचाही पुरवठा केला. त्यातून ग्राहक जोडून ठेवले.
गोठा व्यवस्थापनात सुधारणा
गायी- म्हशींची संख्या वाढल्यानंतर ७० बाय ३० फूट आकाराचा बंदिस्त तर १०० बाय ५० फूट आकाराच मुक्त संचार गोठा उभारला आहे. त्यातून जनावरांचे संगोपन अधिक सुलभ, स्वच्छ आणि निरोगी होण्यास मदत झाली आहे. नित्य औषधोपचार, लसीकरण केले जाते. आहारावर आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष भर दिला जातो. शेती पाऊण एकरच असल्याने बहुतांश चारा विकतच घ्यावा लागतो. यासाठी स्थानिक पातळीवरच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या विविध चाऱ्याचा संपूर्ण प्लॉट खरेदी केला जातो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.