poly mulching, watermelon cropping methods
poly mulching, watermelon cropping methods Agrowon
यशोगाथा

गादीवाफा, पॉली मल्चिंग आधारे मिरची, कलिंगड पीक पद्धती

माणिक रासवे

आपल्या भागानुसार हंगामनिहाय पिकांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरत असते. त्यादृष्टीने दैठणा (ता. जि. परभणी) येथील कच्छवे कुटुंबीयांनी खरिपात मिरची आणि रब्बीत कलिंगड
अशी मुख्य पीक पद्धती यशस्वी केली आहे. त्यातून लाखांचे उत्पन्न मिळवून देणारे किफायतशीर अर्थशास्त्र उभारले आहे. गादीवाफा, मल्चिंग पेपर, बाजारपेठेतील मागणीनुसार वाणनिवड व एकीचे बळ या बाबी यशस्वी शेतीसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर परभणीपासून २१ किलोमीटरवरील दैठणा येथील सीताराम सखाराम कच्छवे यांची सात एकर शेती आहे. अन्य बंधूंची सहा एकर शेती ते करार पद्धतीने करतात. सिंचनासाठी कूपनलिकेची व्यवस्था आहे. सीताराम यांचे दहा सदस्यांचे कुटुंब आहे. मुलांपैकी
सूर्यकांत लाइनमन आहेत. धाकटे चंद्रकांत यांनी विधी शाखेतील पदवी संपादन केली आहे. ते २०१२ पासून व्यवसाय सांभाळत वडिलांसोबत शेतीही करतात.

पीकपद्धती बदलली

शेतीचे अर्थशास्त्र सुधारण्यासाठी पारंपरिक पिकांमध्ये बदल करताना कच्छवे यांनी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेतली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देत विविध पीक पद्धतीतील अनुभव जाणून घेतले. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला. मिरची हे कुटुंबाचे तसे पारंपरिक पीक आहे.
आजोबांपासून दरवर्षी अर्धा एकर क्षेत्रावर त्याची लागवड असे. काही वर्षांपूर्वी दैठणा गावातील शेतकरी मोठ्या क्षेत्रावर मिरचीचे उत्पादन घेत असत. परंतु गेल्या काही वर्षांत चुरडा मुरडा वा अन्य विषाणूजन्य रोगांचे प्रमाण वाढले. परिणामी, उत्पादकता कमी झाली. आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे गावातील मिरचीचे क्षेत्र कमी झाले. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, हरभरा आदी पीक पद्धतीवर अधिक भर दिला. परंतु काही शेतकऱ्यांनी गादीवाफा (बेड) व पॉली मल्चिंग पेपर तंत्राचा वापर सुरू करून
मिरचीची सुधारित शेती सुरू केली. चंद्रकांत यांनी मिरचीचे आगार म्हणून ओळख असलेल्या सिल्लोड (जि. औरंगाबाद) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. बेड व मल्चिंग पेपर तंत्राची
माहिती व अभ्यास केला.

मिरचीची सुधारित शेती

-कच्छवे यांनी २०१६ च्या दरम्यान लागवड पद्धतीत बदल केला. मे अखेर ते जून अशी लागवड केली जाते. डिसेंबरपर्यंत हा प्लॉट चालतो. सुमारे एक एकर क्षेत्र असते.
-दरवर्षी गावातील रोपवाटिकेत बियाणे देऊन रोपे तयार करून घेतली जातात.
-नजीकच्या बाजारपेठेत चालणारे वाण ओळखून तशी निवड असते. यात पोपट्या रंगाची, अधिक उत्पादनक्षम व लांब आकाराची अशा वाणाला प्राधान्य असते.
-पीक फेरपालट महत्त्वाची असते. मिरची घेतलेल्या जागेत पुन्हा लगेच तेच पीक घेत नाहीत.
-मशागत करून ट्रॅक्टरचलित यंत्राव्दारे बेड तयार केले जातात. दोन बेडमध्ये चार फूट तर दोन रोपांमध्ये दीड फूट अंतर असे लागवड अंतर निश्‍चित केले आहे. पॉली मल्चिंग पेपरचा वापर होतो.
-एक वर्षाआड व आलटून पालटून एकरी १५ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताचा वापर दरवर्षी होतो.
-किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखून शिफारशीत कीडनाशकांचा वापर होतो.

मल्चिंग पेपर तंत्राचे झालेले फायदे


-पाण्याचा अतिरिक्त वापर कमी झाला. ठिबक सिंचनाद्वारे गरजेएवढे पाणी देता येते.
-तणांची वाढ होत नाही. गादीवाफा भुसभुसीत राहतो.
-मुळांची वाढ चांगली होते.
किडींचा प्रादुर्भाव कमी होते.
-पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्पादनात वाढ होते.
-मल्चिंग पेपरवर मिरची नंतर कलिंगडाचे दुसरे पीकही साधता येते.

उत्पादन व उत्पन्न

दरवर्षी एकरी ३० ते कमाल ३५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. चंद्रकांत सांगतात, की आमच्या भागात
मिरचीला सतत मागणी व दरही चांगले असतात. किलोला १५ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत दर
मिळतो. सरासरी दर २५ रुपये असतो. सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पादन खर्च वगळता
तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हे पीक देते.

बाजारपेठ व्यवस्था

कच्छवे यांची काही शेती गावाजवळ परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. शिवाय दैठणा येथून परभणी आणि गंगाखेड ही दोन शहरे जवळपास सारख्याच अंतरावर आहेत. या दोन्ही ठिकाणी
वाहतूक व विक्री करणे सोपे होते. गावातून शेतमाल घेऊन जाणाऱ्या वाहनांचीही सोय आहे. नांदेड येथेही काही विक्री करता येते. तोडणी केल्यानंतर शेतातच पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये मिरची भरण्यात येते. त्यामुळे उचलणे व वाहतूक या प्रक्रिया सोप्या होतात. लॉकडाऊन (२०२०) काळात बाजारपेठा बंद राहिल्या. त्यावेळी व्यापाऱ्यांनी शेतात येऊन प्रति किलो ५० ते ६० रुपये दराने मिरचीची खरेदी केली. यंदा जुलै महिन्यात पहिला तोडा सुरू झाला. आजवरच्या तोड्याला ४५ ते ५० रुपये दर मिळाले.

कलिंगडाचा आधार

सन २००८ पासून दरवर्षी डिसेंबरमध्ये कलिंगड लागवडीत सातत्य ठेवले आहे. सुरुवातीची चार वर्षे पारंपरिक पद्धतीने लागवड असायची. सन २०१२ पासून बेड व मल्चिंग पेपर तंत्राचा वापर केला जातो. मिरचीचा हंगाम संपल्यानंतर त्याच मल्चिंग पेपरवर ही लागवड साधता येते. दोन बेडमधील अंतर आठ फूट असते. त्यामुळे वेल वाढण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होते. एकरी २० टन उत्पादन मिळते. प्रति किलो ९ ते १० रुपये प्रति किलो दराने शेतातूनच विक्री होते. मिरचीसोबत दहा गुंठ्यांत
दरवर्षी टोमॅटोचीही लागवड असते.

मार्गदर्शन

चंद्रकांत गावातील प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या संपर्कात असतात. काका जिल्हा कृषी उपसंचालक बळिराम कच्छवे यांचे मार्गदर्शन मिळते. चुलतभाऊ देखील तालुका कृषी अधिकारी आहेत. त्यांचीही मदत होते. वडील सीताराम आणि आई शांताबाई शेतीतील विविध कामांमध्ये दररोज व्यस्त असतात.
शेतात बैलजोडी नाही. मात्र भाडेतत्त्वावर ट्रॅक्टरव्दारे विविध कामे केली जातात.

चंद्रकांत कच्छवे, ९९७०२५०६६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT