सोलापूर ः पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील ज्ञानेश्वर सिरसट यांनी त्यांच्या गावाशेजारील वांगीच्या एका व्यक्तीकडून सिमला मिरचीसाठी (Capsicum) १२ः६१ः० या विद्राव्य खताची (Soluble Fertilizer) एक बॅग खरेदी केली. त्यानंतर त्यातील काही खत सिमला मिरचीच्या आळवणीसाठी (ड्रेचिंग) वापरले. पण आठवडा उलटला, तरी त्यांची मिरची काही वाढेना, त्याचवेळी शेजारच्या शेतकऱ्याकडील मिरची मात्र चांगलीच तरारली. तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी हे खत थोडेसे चाखून पाहिले तर त्याला चक्क मिठासारखी चव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. (Fertilizer Adulteration)
याबाबत ज्ञानेश्वर सिरसट यांनी ‘अॅग्रोवन’कडे त्यांचा अनुभव सांगितला. जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात त्यांनी एक एकरावर सिमला मिरचीची लागवड केली होती. या मिरचीला आळवणी करण्यासाठी त्यांनी साडेतीन हजार रुपये देऊन शेजारच्याच गावातील वांगीतील सुनील सुपाते या व्यक्तीकडून एका बॅगेची खरेदी केली. बाजारात साधारण सव्वाचार हजारांपर्यंत मिळणारी बॅग साडेतीन हजारांत मिळाल्याने आणि तीही नामवंत ब्रॅण्डची त्यामुळे त्यांनी ती खरेदी केली. त्यानंतर या खताची मिरचीला त्यांनी आळवणी केली. पण आठवडा गेला, तरी मिरची काही वाढेना, पण त्याचवेळी लागवड झालेल्या शेजारच्या शेतकऱ्याकडे अन्य कंपनीच्या खताच्या जोरावर मात्र ती चांगलीच वाढू लागली. त्यांना आपण घातलेल्या खताबाबत संशय आला, तेव्हा त्यांनी त्या बॅगेतील थोडे खत चाखून पाहिले. तेव्हा त्यांना मिठासारखी चव लागली, नव्हे ते मीठच आहे, याची खात्री पटली. तेव्हा पुढे सगळा प्रकार उजेडात आला. त्यानंतर गावातील हे खत घेतलेल्या अन्य शेतकऱ्यांनाही त्यांनी जागरूक केले.
भुर्दंड सोसला, पुन्हा लावली मिरची
खतातील भेसळीचा हा सगळा प्रकार लक्षात आला. पण तोपर्यंत ज्ञानेश्वर सिरसट यांच्याकडील जवळपास अर्धा एकराहून अधिक क्षेत्रावरील रोपे पिवळी पडली, काहींची तर वाढही झाली नाही. पण थांबूनही चालणार नव्हते. लगेच त्यांनी नर्सरीतून सिमला मिरचीची रोपे आणून पुन्हा लागवड केली. साधारण १५ ते २० हजारांचा भुर्दंड त्यांना सोसावा लागला.
शेतकऱ्यांच्या तक्रारी
पडसाळीतील ज्ञानेश्वर सिरसट यांच्यासह समाधान वाघ, महादेव बाबू सिरसट, संदीप जग्गनाथ वाघ या अन्य शेतकऱ्यांनीही या खताच्या प्रत्येकी एक-दोन बॅगा खरेदी केल्या आहेत. ज्ञानेश्वर यांच्यासारखाच अनुभव या शेतकऱ्यांनाही आला. यातील काही शेतकऱ्यांनी तसेच या प्रकरणात कारवाई करणारे तंत्र अधिकारी अशोक पवार यांनीही या सगळ्या प्रकाराबाबत संबंधित कंपनीच्या सोलापूरच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला. पण त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.