Agriculture Success Story : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्याचे धान (भात) हे प्रमुख पीक आहे. अलीकडील काळात मात्र तालुक्यातील असंख्य गावांनी मिरचीच्या नगदी पिकाला पसंती देत त्यात आपली ओळख तयार केली आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक सुबत्ता मिळवली आहे.
काही उदाहरणे सांगायची, तर तालुक्यातील मांगली तेली गावचे व्यंकट भुजंगराव सीतारामय्या मुम्मानेनी सांगतात, की १९६० मध्ये आंध्र प्रदेशातील अनेक भागांत जमिनींचे दर एकरी पाच हजार रुपये होते. त्याच वेळी विदर्भातील दुर्गम भागात हेच दर २५० रुपये एकर होते.
आमच्या भागातील अनेक जण रेल्वे विभागात नोकरीस होते. त्यांना या विदर्भात काळी बाभूळ दिसून यायची. ती ज्या भागात असेल त्या जमिनीला सोने (सुपीक) म्हटले जाते. त्यामुळेच दूरदृष्टीतून माझ्या आजोबांनी या भागात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेत २४ एकर शेती घेतली. पुढे शेतीचा हा वारसा मी जपला. मिरची पिकात उतरलो.
त्यात यश मिळवले. मुलगी समान मानत आंध्र प्रदेशात मुलीच्या नावावर जमीन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार सासरकडून आंध्रात दोन एकर जमीन मिळाली. ती विकून खंडाळा (मौदा, नागपूर) शिवारात सात एकर जमीन घेतली. आज ६० एकर शेती असून, त्यातील १५ एकरांहून अधिक मिरचीचे क्षेत्र असल्याचे व्यंकटराव सांगतात. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत नोकरी करतात. शेतीतूनच विशेषतः मिरचीतून शिवारात टुमदार बंगला बांधणे त्यांना शक्य झाले आहे.
मिरची झाले नगदी पीक
तालुक्यातील इजनी व परिसरातील १० ते १२ गावे मिरची उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत. इजनी येथील शेतकरी व कृषी निविष्ठा केंद्र व्यावसायिक मयूर थोटे साडेआठ एकरांत मिरची पिकवतात. ते सांगतात, की गावशिवारात २०० एकरांहून अधिक क्षेत्रावर मिरची आहे. हे नगदी पीक आहे. स्थानिक व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही बाजारपेठेपर्यंत जावे लागत नाही. या भागातील जमीनही मिरचीसाठी पोषक आहे. खरिपात रोपांची लागवड होते.
बहुतांश शेतकरी रोपे विकतच घेतात. त्यामुळे भागात रोपवाटिका व्यवसाय, पॉलिमल्चिंग पेपर विक्री व्यवसायही वाढीस लागले आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत प्लॉट सुरू राहतात. एकरी १४ टनांपासून ते १७ टनांपर्यंत शेतकरी उत्पादन घेतात. किलोला सरासरी ३५, ४० ते ५० रुपयांदरम्यान दर मिळतात.
एकरी ५० हजारांपासून ते एक लाख वा त्याहून अधिक नफा हे पीक देऊन जाते असेही थोटे यांनी सांगितले. व्यंकटरावांच्या अनुभवानुसार अलीकडील काळात रसशोषक किडींचा (मावा, तुडतुडे) प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे पिकाचा हंगाम लवकर संपतो. फेब्रुवारी- मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच तोडणी शक्य होते. ऑगस्ट- सप्टेंबर ते मार्च अशा संपूर्ण हंगाम कालावधीत एकरी १५ ते १७ टनांपर्यंत उत्पादकता होते.
मौदा तालुका मिरची- ठळक बाबी
किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर फवारणींची गरज.
तोडणी मजुरांची समस्या अधिक गंभीर. त्यांच्याकडून सहा- सात रुपये प्रति किलो दर त्यासाठी आकारला जातो. त्यातून उत्पादन खर्चात वाढ होते.
विदर्भासह लगतच्या मध्य प्रदेशातील मजूर तोडणीकामी येतात. काही शेतकऱ्यांद्वारे शिवारातच तात्पुरते झोपडीवजा घर बांधून त्यांच्या राहण्याची सोय होते.
कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, मंडळ कृषी अधिकारी संदीप नाकाडे, तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील, कृषी सहायक बसवराज सिंहासन यांचे होते मार्गदर्शन.
बाजारपेठ
मिरचीचे मोठे क्षेत्र, त्यामुळे मालाची उपलब्धता मोठी असल्याने स्थानिक आणि परराज्यातील व्यापारी थेट बांधावर येतात. तोड असलेल्या दिवशी वाहन पाठवून बांधावरूनच मिरचीची उचल करतात. वाहतुकीचा भार शेतकऱ्यांना प्रति पोत्याप्रमाणे उचलावा लागतो.
ही मिरची नागपूर, भंडारा, मुंबई, दिल्ली, कोलकाता बाजारपेठेत पाठविली जाते. काही व्यापाऱ्यांद्वारे दुबईसह अन्य आखाती देश व बांगला देशात निर्यात होते असे तालुक्यातील चारभा येथील आघाडीचे मिरची उत्पादक रमेश बरबटे सांगतात. वाकेश्वर येथे काही व्यापाऱ्यांनी शेडचे संकलित केंद्र उभारले आहे. येथून ट्रकद्वारे मिरची देशाच्या विविध भागात पाठविण्यात येते.
मागील सप्टेंबरमध्ये किलोला ३४ रुपये, ऑक्टोबरमध्ये ५० ते १२० रुपयांवर दर पोहोचले. बांगला देशाची मागणी असल्याच्या काळात हा वाढीव, विक्रमी दर मिळाला. २५ ऑक्टोबरनंतर दरांत घसरण सुरू झाली. नोव्हेंबरमध्ये दर ३० रुपयांपासून नऊ रुपयांपर्यंत खाली घसरले.
मयूर थोटे (मिरची उत्पादक, इजनी), ७५०७९३३३८५
माणिक पाटील (तालुका कृषी अधिकारी, मौदा), ७५५९४९९१४४
व्यंकट भुजंगराव मुम्मानेनी (मिरची उत्पादक), ९३७३२८७९५०
अनेक वर्षांपासून तीन एकरांत मिरची लागवड करतो. दर अनिश्चित असतात. तरीही एका हंगामातील नुकसानभरपाई दुसऱ्या हंगामातून भरून निघण्याची संधी असते. शेतीला मिरचाची जोड दिल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून गावात टुमदार घर बांधले आहे. दोन्ही मुले इंग्रजी शाळेत शिकतात. आमच्या भागात पेंच प्रकल्पाच्या कालव्यातून पाण्याची उपलब्धता होते. माझ्या शिवारालगतच्या नाल्यावर शासकीय योजनेतून बंधारा बांधला आहे. त्याचा वापर सिंचनासाठी होतो.- रमेश बरबटे ७६२०५९०८४४ (चारभा, ता. मौदा)
मिरची उत्पादकांचे अनुभव आमच्या गावशिवारात एक हजार एकराहून अधिक मिरची क्षेत्र असावे. त्यावरूनच गावचे अर्थकारण या पिकातून मोठ्या प्रमाणात कसे बदलले असेल याची कल्पना येऊ शकते. मिरची उत्पादनासह त्याचा व्यापारही करतो. त्या माध्यमातून गावातील मिरचीला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.- महेश मेहर ७७९८१३८३७३ (खरडा)
तीन हजार लोकसंख्येच्या आमच्या गावशिवारात ५०० एकरांवर मिरची लागवड होत असावी. पंचवीस वर्षांपासून माझे मिरचीत सातत्य आहे. सात एकर त्याचे क्षेत्र असते.- पांडुरंग क्षीरसागर ९७६६९६०६३८ (धर्मपुरी)
आमच्या गावची लोकसंख्या १५५० एवढी अत्यल्प असताना २१० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरची लागवड होते. मी दरवर्षी तीन एकरांत चार बोअरवेल्सच्या मदतीने मिरची घेतो. खरिपात धान (भात) व त्यानंतर रब्बीत गहू अशी आमच्याकडे पीकपद्धती असते. मात्र मिरची हेच पीक आम्हाला सर्वांत फायदेशीर आढळले आहे.- महेंद्र घिवतोंडे ८६९८३४१२०४ (वाकेश्वर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.