
Amravati News : लढवय्या बाणा जपत आईवडिलांचे छत्र हरवलेल्या पुसला (ता. वरुड) येथील बिडकर बहिणींनी समाजातील अपप्रवृत्तींविरोधात दोन हात केले. त्यानंतरच्या काळात शेतीच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनावर भर देत त्यांनी संत्रा पिकातून उत्पन्नासह घर सावरले..!
पुसला हे तब्बल २५ हजार लोकवस्तीचे गाव. येथील रहिवासी असलेले दशरथ नत्थुजी बिडकर यांचा पत्नीसह पाच मुलींचा परिवार. २००९ मध्ये आजारपणामुळे दशरथ यांचे निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ दोन वर्षांतच पत्नी लिलाबाई सुद्धा हे जग सोडून गेल्या. कुटुंबाची सर्व जबाबदारी मुलींवर आली. आईवडील हयात असताना दोघींचे लग्न झाले होते, यानंतर कुटुंब सावरणाऱ्या बेबी आणि सुशीला यांनी एका बहिणीचे लग्न केले.
संघर्षाचा काळ
आई-वडिलांच्या निधनानंतर बिडकर भगिनींचा संघर्ष काळ सुरू झाला. समाजातील अपप्रवृतींविरोधातही लढण्याची वेळ आली. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने बिडकर भगिनींनी शेती विकावी याकरिता प्रचंड त्रास दिला. राहते घरही विकावे याकरिता दबाव आणला. गुंड पाठवत धमक्याही दिल्या.
या परिस्थितीशी लढत त्यांनी मार्ग काढला. बिडकर बहिणी कोणत्याच दबावतंत्रापुढे शरणागती पत्करत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी या व्यवहारातून माघार घेतली. त्यानंतरच्या काळात या बहिणींनी उत्पन्नाचा आणि जगण्याचा एकमेव स्रोत असलेल्या शेती विकासावर लक्ष्य केंद्रित केले.
शेती केली विकसित
बिडकर कुटुंबाची चार एकर चार गुंठे इतकी जेमतेम जमीनधारणा. यात दोन एकरांवर आधीपासूनच संत्रा लागवड. उर्वरित क्षेत्रावर नव्याने संत्रा लागवड केली असून, बाग लहान असल्याने तूर, एरंडी, कपाशी यांसारखी आंतरपिके घेतात. संत्रा पिकाच्या खर्चाची आंतरपिकांतून बऱ्याच अंशी भरपाई होते.
सिंचनकामी दोन विहिरींचा पर्याय आहे. त्यातील एक विहीर सामाईक असून एक वैयक्तिक विहीर आहे. नजीकच्या अपूर्ण पंढरी प्रकल्पाचा फायदा या विहिरीला होतो. प्रारंभी कळमना, नरखेड, वरुड बाजार समितीत संत्रा विक्री करत. आता मात्र व्यापाऱ्यांनाच थेट बाग विक्रीवर भर राहतो. यंदा दोन एकरांतील बागेतून सव्वा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले.
जंगलालगत शेती
महेंद्री अभयारण्याचा भाग बिडकर भगिनींच्या शेताजवळ आहे. रात्री-अरात्री सिंचन किंवा वन्यप्राण्यांपासून पिकाच्या रक्षणाकरिता या दोघी बहिणींना शेतात जावे लागते. वाघाला आम्ही समोर पाहिले, सापांशी तर आमचा रोजच संबंध येतो, असे सुशिलाताई सांगतात.
...असाही एक संघर्ष
मध्यंतरी दोन एकरावर नव्याने केलेली संत्रा लागवड वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केली. भरपाईसाठी वनविभागाने ६५ हजार रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा केला. भरपाई मात्र २१ हजार रुपये मंजूर झाली. या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठविला. तक्रारी-निवेदने दिली. वरुड तहसीलसमोर उपोषण केले. तब्बल ९ दिवसांनी दखल घेण्यात आली. पंचनाम्यावर बनावट स्वाक्षरी करून भरपाई कमी दिल्याचे चौकशीत सिद्ध झाले. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनपालावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निर्धारीत भरपाई बिडकर बहिणींना मिळाली.
या रणरागिणीच्या कार्याचा अनेक व्यासपीठावरून दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. वरुड बाजार समितीकडून स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे निमंत्रण या बहिणींना देण्यात आले. सुशीला बिडकर यांना ध्वजवंदनाचा मान देऊन गौरव केला.
९०६७६०१६५४
९९६०२९४७२५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.