
Agriculture Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर वेतोरे, ता. वेंगुर्ला) गाव आहे. भीजीपाल्याचे गाव म्हणून त्याचा नावलौकिक आहे. येथील शेतकरी खरीप हंगामात फळभाज्या तर उन्हाळ्यात पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्याला सर्वांत पहिला भाजीपाला पुरवठा या गावातून सुरू होतो.
गोव्यातही येथील भाज्यांना मागणी आहे. याशिवाय कोकणातील सर्व महत्त्वाची हंगामी व फळपिके येथे आहेतच. वेतोरे गावातील नमसवाडी येथे दत्ताराम नाईक यांचे घर आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गावातील सातेरी विकास सेवा सोसायटीत नोकरीस सुरुवात केली.
घरची शेती वडील पाहायचे. नोकरी सांभाळून दत्तारामही मदत करायचे. सुमारे १६ वर्षे नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर पूर्णवेळ शेतीतच काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. प्रयोगशील व अभ्यासूवृत्ती त्यांच्यात होती. कोकणासह जवळच्या गोवा बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून त्यानुसार पिकांची निवड व विविधता जपण्यास सुरुवात केली. प्रत्येक विषयाकडे ते संशोधक वृत्तीने पाहतात. काही प्रयोग यशस्वी व्हायचे तर काहींमध्ये अपयश यायचे. मात्र प्रयोग करण्याचे थांबविले नाही. आज वयाच्या ६३ व्या वर्षीही नाईक यांचा शेतीतील उत्साह व उमेद जराही कमी झालेली नाही.
पिकांची साधली विविधता
नाईक यांची आंब्याची वडिलोपार्जित ९० झाडे व काही देशी काजू होता. उर्वरित जमिनीत जंगली झाडे, दाट झुडपे होती. सन १९९० च्या सुमारास फलोत्पादन योजनेतून प्रोत्साहित होत या पडीक जमिनीत आंबा, काजू लागवडीस प्रारंभ केला. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत गेली. दरवर्षी काही प्रमाणात आजही कोणत्या ना कोणत्या पिकाची वा झाडांची लागवड असते. भात, आंबा, काजू या कोकणातील मुख्य पिकांना त्यांनी कंदवर्गीय आंतरपिकांची जोड दिली. त्या उत्पन्नातून मुख्य पिकांचा खर्च कमी केला.
...अशी जपली विविधता
३५ एकर शेती. त्यात आंबा ९५०, काजू दोन हजार, वटसोल २५, गोवा माणकूर ४००, सुपारी एक हजार व नारळाची ३०० झाडे.
चार एकरांत भात.
कणगर (कणगी) एक एकर क्षेत्र. त्यामध्ये दहा हजार ते बारा हजार कंद. त्याच्या वेलींसाठी सहा फूट उंचीची काठी उभी केली जाते. गणेशोत्सवापूर्वी त्याची होते काढणी.
खीर वा शिऱ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या करांदाची लागवडही नाईक करतात. एका झाडाला तीन किलो फळे मिळाली व प्रति किलो ५० रुपये दर मिळाला तरी एक झाड दीडशे रुपये देते असे ते सांगतात.
सुरणाचीही नैसर्गिक पद्धतीने लागवड. सध्या एक हजारांपर्यंत लागवड. किलोला ४० रुपये मिळतो दर.
आंबा, काजूत सरळ रेषेत ८०० सागवान झाडांची लागवड.
वटसोलची लागवड
कोणत्याही गावात गेले तरी तेथील पीकपद्धतीचा नाईक बारकाईने अभ्यास करतात. एक दिवस मातोंड (ता. वेंगुर्ला) येथे नातेवाइकांकडे वटसोलची मोठी झाडे त्यांच्या दृष्टीस पडली. त्याचे अर्थकारण पसंतीस पडल्याने २५ झाडे आणून लागवड केली. दहा- बारा वर्षे उत्तम निगा राखल्यानंतर ही झाडे चांगले उत्पादन देत आहेत. रातांब्याप्रमाणे (कोकम) याचे फळ असते. ते सोलून, काप करून ते सुकवले जाते. त्याचा वापर आमटी व सोलकढीत होतो. किलोला ५५० ते ७०० रुपयांपर्यंत त्यास दर मिळतो.
नीरफणस, माणकूर आंबा
नाईक यांचे विविध उत्पादन विक्रीच्या अनुषंगाने गोव्यात जाणे- येणे असते. त्यातूनच त्यांना नीरफणस आणि गोवा माणकूर आंब्याला मोठी मागणी व दर असल्याचे समजले. त्यातूनच दोन्ही पिकांची त्यांच्याकडे लागवड आहे. नीरफणसाच्या झाडाला ८ ते १० वर्षांनी ८० ते १०० फणस मिळू लागतात. प्रति फणसाला ८० ते १०० रुपयांचा दर असतो असे नाईक यांनी सांगितले. माणकूर आंब्यालाही सुरुवातीला डझनाला दोन हजार रुपये, तर एप्रिलनंतर एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत दर मिळतो. गोव्यात दोन्ही मालाला चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
विक्री व्यवस्था
मुंबई, कोल्हापूर, बेळगाव आदी विविध शहरांमधून आंब्याची दरवर्षी सुमारे अठराशे पेट्यांची विक्री होते. आंब्याची काही लाखांची, तर अन्य प्रत्येक पिकातून दीड, दोन ते तीन लाखांपर्यंत उलाढाल होते. घरगुती वापरासाठी शिल्लक ठेवून सुमारे १२ क्विटंल तांदळाची दरवर्षी विक्री होते. त्यास प्रति किलो ५० रुपये दर मिळतो. मुंबईत बिग्रेडियर सुधीर सावंत आयोजित आंबा महोत्सवातही विक्रीची संधी मिळाली. पहिल्याच महोत्सवात दोन कंटेनर आंब्याची विक्री केली होती. काजू बीची विक्री स्थानिक बाजारपेठेत होते. कणगर, करांदा, सुरण यांना गोव्यात मागणी आहे. तेथील व्यापारी जागेवरही खरेदी करतात. वटसोल आणि नीरफणसाचीही तेथेच विक्री होते.
दत्ताराम नाईक ९७६४९३८५४४, ९६७३९४८०१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.