Manvat Cotton Market Story : राज्यात परभणीची कापूस जिल्हा म्हणून गणना होते. मानवत हे तालुक्याचे ठिकाण जिल्ह्यातील शेतीमालाचे प्रमुख व्यापार केंद्र व मराठवाड्यातील कापडाची प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.
काही दशकांपूर्वी येथे हातमाग व त्यानंतर यंत्रमागावर सुती कापड विणले जायचे. कालौघात कापड निर्मिती बंद झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राजवटीत १९३० च्या हैदराबाद कृषी बाजार अधिनियमानुसार सहा नोव्हेंबर १९४३ रोजी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यास १९६३ चा महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम लागू झाला. त्या वेळी बाजार समितीचे कार्यक्षेत्र तत्कालीन पाथरी तालुक्यातील ८० गावांपुरते होते. पुढे बाजार समितीचे विभाजन होऊन २५ जुलै १९९१ रोजी पाथरी येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. त्यानंतर मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र ५४ गावांपुरते मर्यादित झाले. पुढे पाच हेक्टरवर शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी आवश्यक गोदाम, कार्यालय, रस्ते, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधा तयार झाल्या.
बाजार समितीतील महत्त्वाच्या बाबी
परवानाधारक २१ अडते, २२५ खरेदीदार, १४ प्रक्रियादार, सुमारे ३५० हमाल.
सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे यांच्यासह १८ सदस्यांचे संचालक मंडळ.
यार्डचे सिमेंटीकरण. प्रत्येकी ३७०० टन क्षमतेची चार गोदामे. धान्य चाळणी, लिलाव ओटे, उपाहारगृह आदी सुविधा.
सोयाबीन, तूर, हरभरा, मूग, भुईमूग, गहू आदींची तालुका तसेच शेजारील जिल्ह्यांमधून आवक.
सोयाबीन, तूर, हरभरा यांच्यासाठी तारणकर्ज योजना. त्याअंतर्गत २०२३-२४ मध्ये ४८ लाख ९२ हजार रुपये तर २०२४-२५ मध्ये आजवर २० लाख ५५ हजार रुपये कर्जवाटप.
रामपुरी बुद्रुक व रामेटाकळी येथे उपबाजारतळ. क्षेत्र अनुक्रमे चार व तीन हेक्टर.
कॉटन यार्डची उभारणी
सन २०२४-२५ मध्ये परभणी जिल्ह्यात एक लाख ९७ हजार ९८६ हेक्टरवर कपाशी लागवड झाली. सुधारित वाण, लागवड तंत्र, काटेकोर व्यवस्थापनातून उत्पादकतेत वाढ झाल्याने बाजारपेठेतील आवकही वाढली. त्यादृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
तत्कालीन सभापती बालकिशन चांडक यांच्या कार्यकाळात २०११-१२ मध्ये केंद्र सरकारच्या ‘टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटन’ अंतर्गत ‘कॉटन मार्केट यार्ड’ विकसित झाले. यात २५०० चौरस फूट आकाराच्या जागेत लिलावगृह उभारले. पंडितराव चोखट सभापती असताना कार्यालयासाठी दोन मजली इमारत, तर गंगाधर कदम यांच्या सभापतिपदाच्या कार्यकाळात टीन शेड लिलावगृह उभारले.
आमदार राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनात सभापती पंकज आंबेगावकर यांच्या नेतृत्वात २४१० चौरस फूट आकाराच्या लिलावगृहाची उभारणी सुरू आहे. पंकज आंबेगावकर बाजार समितीचे सभापती, नारायण भिसे उपसभापती तर बाळासाहेब चोखट प्रभारी सचिव आहेत.
लिलावाद्वारे कापूस खरेदी
येथे हंगामात होते प्रतिदिन सरासरी एक हजार ते दोन हजार क्विंटल कापसाची आवक.
सकाळी ११ ते दुपारी दोनच्या दरम्यान बोली व जाहीर लिलावाद्वारे व्यापाऱ्यांकडून खरेदी.
दर निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना सौदा पट्टी. जिनिंगमध्ये कापसाचे मोजमाप केल्यानंतर चुकाऱ्याची रक्कम देण्यात येते.
यंदाच्या १५ जानेवारीपर्यंत प्रति क्विंटल ७०७५ ते ७३०० रुपये दराने एक लाख १५ हजार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी.
‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र
मानवत बाजार समितीत भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) कापूस खरेदी केंद्र आहे. सध्या तीन जिनिंग कारखान्यांमध्ये खरेदी सुरु आहे. मार्केट यार्डमध्ये दररोज सकाळी साडे नऊ ते दहा यावेळेत ‘सीसीआय’कडून खरेदी होते. यंदा पंधरा जानेवारीपर्यंत एक लाख ६८ हजार ३३५ क्विंटल कापूस खरेदी झाली.
सध्याचे दर प्रति क्विंटल ७१२४ ते ७४२१ रुपये आहेत. ‘सीसीआय’चे केंद्र प्रमुख धीरजकुमार तेवाततिया तर सहकेंद्र प्रमुख राजर्षी मंडल आहेत. पूर्वी मानवत येथे तीन-चार जिनिंग- प्रेसिंग कारखाने होते. दहा वर्षांत या संख्येत १३ पर्यंत वाढ झाली आहे. या उद्योगाद्वारे रोजगार उपलब्ध झाला आहे.
पंकज आंबेगावकर, सभापती, ७०३८५७९९९९
बाळासाहेब चोखट, प्रभारी सचिव, बाजार समिती, ७०३०६५००००
ताळेबंदानुसार मानवत बाजार समितीची वर्गवारी ‘अ’.
२०२२-२३ (आर्थिक वर्ष)- उत्पन्न- तीन कोटी ६ लाख ९३ हजार रुपये.
२०२३-२४- उत्पन्न- ४ कोटी ८० लाख रु. नफा- एक कोटी ८१ हजार रु.
आर्थिक वर्ष आवक (क्विंटल) दर (रुपये)
२०२१-२२ ४,२७,७३४ ३२९ कोटी १० लाख ७७ हजार
२०२२-२३ ३,४५,६३३ २७५ कोटी ८६ लाख ६४ हजार
२०२३-२४ ६,१४,८६७ ४३१ कोटी १९ लाख ६२ हजार
कापूस
आर्थिक वर्ष आवक (क्विंटल) सरासरी दर (रुपये)
२०२१-२२ ३,३६,९३३ ८३६७
२०२२-२३ २,५५,७२७ ८९८७
२०२३-२४ ५,५१,८८७ ७२००
सोयाबीन
२०२२-२३ ५०,५०६ ५३४६
२०२३-२४ ३५,०९३ ४७०७
अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत येथे अधिक चांगले दर मिळत असल्याने आमच्या गावातील व तालुक्यांतील शेतकरी येथेच कापूस विक्रीस आणतात. खरेदीदार तत्काळ रोख रक्कमही देतात.अनिल साबळे, घाणेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना
कापूस खरेदी करताना कडता घेतला जात नाही. क्विंटलला १० रुपये हमाली घेतली जाते. जवळपास ९९ टक्के चुकारे रोखीने तर मागणीनुसार बँक खात्यावरही रक्कम जमा केली जाते.रामस्वरूप सारडा, कापूस उद्योजक, मानवत ९६२३४५८४२४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.