Goat Farming  Agrowon
यशोगाथा

Goat Farming : शेळीपालनात बटईदारास केले भागीदार

Goat Rearing : शेळीपालनात भूमिहीन बटईदारास भागीदार करून घेतले आहे. अर्धबंदिस्त पद्धतीने यशस्वीरीत्या शेळीपालन करत आहेत.

माणिक रासवे

Animal Care : परभणी जिल्ह्यातील येथे अमोल रमेशराव पाचपोर-पारवेकर यांची वडिलोपार्जित १५ एकर जमीन आहे. खरिपात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, तर रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू लागवड असते. अमोल यांनी वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (एम. कॉम.) घेतली आहे. अमोल २००० पासून शेती करत आहेत.

सातत्याने उद्‌भविणाऱ्या दुष्काळी स्थितीत शेतीतील उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय केला. तेव्हा त्यांच्याकडे ६ ते ७ म्हशी होत्या. परभणी शहरात घरोघरी दूध विक्री केली. परंतु अडचणी येऊ लागल्याने व्यवसाय बंद केला. पुढे दुग्ध व्यवसायाला पर्याय म्हणून शेळीपालन व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले.

शेळीपालनाचा प्रारंभ

२०२० मध्ये शेळीपालनासाठी परभणी येथील बाजारातून २५ शेळ्या व १ बोकड खरेदी केला. त्या वेळी लॉकडाउन असल्यामुळे शेळ्यांचे दर काहीसे कमी होते. मागील तीन वर्षांत शेळ्यांच्या संख्येत ३० पर्यंत वाढ केली. शेळी विक्रीतून चांगले उत्पन्न मिळू लागले. परंतु योग्य पद्धतीने व्यवस्थापन करता यावे यासाठी शेळ्यांची संख्या कमी ठेवली आहे. सध्या त्यांच्याकडे २२ शेळ्या, १ बोकड आणि २७ लहान पिल्ले आहेत.

सुविधायुक्त गोठा

शेतातील आखाड्यावर २० बाय ६० फूट आकाराचा बंदिस्त निवारा उभारला आहे. त्यात १० बाय २० फूट आकाराच्या दोन खोल्या तयार केल्या आहेत. त्यापैकी एक पिलांसाठी, तर दुसरी कडबा कुट्टी साठविण्यासाठी वापरली जाते.

२० बाय ४० फूट आकाराचा दुसरा गोठा उभारला आहे. त्यास पत्र्याच्या भिंती करून त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे.

गोठ्यातील जमीन शेणामातीची आहे. त्यामुळे शेळ्यांचे पाय घसरून होणारे अपघात टाळले गेले.

गोठ्याच्या मध्यभागी प्लॅस्टिक टाक्यांची अर्धवर्तुळाकार गव्हाण उभारली आहे. गव्हाणीच्या दोन्ही बाजूंनी शेळ्या बांधल्या जातात.

उन्हाळ्यात गोठ्यात थंडावा राहण्यासाठी छताला पंखे लावले आहेत. हिवाळ्यात गोठ्यातील वातावरण उबदार राहण्यसाठी हिटर लावतात.

मुक्तसंचार गोठा

बंदिस्त निवाऱ्याशेजारी मुक्त संचार गोठा तयार केला आहे. मुक्त गोठ्यात शेळ्या तसेच पिल्लांची चारा, पाण्याची व्यवस्था केली आहे. गोठ्याजवळ लिंबाची झाडे असल्यामुळे सावली येते. याशिवाय शेतापासून काही अंतरावर १० एकर पडीक जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे. तेथे दररोज दुपारी आणि सायंकाळी शेळ्यांना चरायला सोडले जाते.

गोठ्यातूनच होते विक्री

शेळ्या आणि बोकडांची वजनावर विक्री केली जाते. व्यापारी गोठ्यावर येऊन शेळ्या आणि बोकडांची खरेदी करतात. या शिवाय परभणी येथील बाजारामध्ये शेळ्या विक्रीसाठी नेल्या जातात. बकरी ईदच्या वेळी बोकडांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.

मजूर समस्येवर मात

पाचपोर यांच्या शेतातील आखाड्यावर गबाळे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. गबाळेंच्या कुटुंबामध्ये १५ सदस्य आहेत. हे सर्व शेतमजुरीची कामे करतात. त्यामुळे पेरणी, आंतरमशागत आदी शेतीकामांसाठी मजुरांची अडचण येत नाही. अंकुश व राम हे शेती कामे करतात. तर सुरेश यांच्याकडे शेळीपालनाच्या व्यवस्थापनाचे काम आहे.

लेंडीखतामुळे वाढली सुपीकता

शेळ्यांच्या लेंड्या, गायी, बैलांचे शेण, पीक अवशेष, पालापाचोळा हे सर्व गोळा करून चौरस आकाराच्या मोठ्या खड्ड्यामध्ये वर्षभर कुजविले जाते. त्यापासून दरवर्षी सुमारे ७० गाड्या कंपोस्ट खत मिळते. त्याचा शेतीमध्ये वापर केला जातो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन त्यावरील खर्चात बचत झाली आहे. कंपोस्ट खतामुळे जमिनीची सुपीकता कायम राखत पीक उत्पादकतेत वाढ मिळविली आहे.

बटईदार कुटुंब शेळीपालनासह शेतीमध्ये भागीदार

पारवा येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील अंकुश, राम आिण सुरेश हे गबाळे बंधू पाचपोर यांच्याकडे मागील २० वर्षांपासून बटईने शेती करत आहेत. शेळीपालन सुरू केल्यानंतर अमोल पाचपोर यांनी सुरेश यांना व्यवसायात ५० टक्के भागीदार करून घेतले.

शेळीपालनात पाचपोर यांनी भांडवल गुंतवले आहे. शेळ्यांच्या चारा, पाणी, गोठा स्वच्छता, लसीकरण आदी कामांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सुरेश यांच्याकडे असते. खर्च जाता शिल्लक अमोल आणि सुरेश यांचा नफ्यामध्ये प्रत्येकी ५० टक्के हिस्सा असतो. त्यामुळे त्यांच्यात आपलेपणाची भावना वृद्धिंगत होऊन चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होत आहे.\

चारा, पाणी व्यवस्थापन ः शेळ्यांना दररोज हिरवा आणि सुका चारा दिला जातो. हिरव्या चाऱ्यासाठी अर्धा एकरांत चारा पिकांची लागवड आहे. त्यात एकदल तसेच द्विदल चारा पिके घेतली जातात. पावटा, शेवरी, दथरथ गवत आदी चारा पिकांची लागवड करतात.

खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिकांच्या उत्पादनातून राहिलेला भुस्सा एकत्रित करून एका खोलीमध्ये साठविला जातो. त्याचा खाद्य म्हणून वर्षभर वापर करतात. यंत्राद्वारे ज्वारी कडब्याची कुट्टी करून शेळ्यांना दिली जाते. यामुळे कडब्याची नासाडी होत नाही. भरडा शेळ्यांना खाद्य म्हणून दिला जातो.

- अमोल पाचपोर-पारवेकर

९४०३०६५४५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture AI : ‘एआय’द्वारे घडेल सदाहरित कृषिक्रांती

Flower Market : फुलांच्या आकर्षक हारांसाठी प्रसिध्द सुपे बाजार

Lumpy Vaccine : ‘लम्पी’ लस ठरणार मैलाचा दगड

Mango Cashew Insurance : तीनशे आंबा-काजू बागायदार विमा परताव्यापासून वंचित

Padalse Irrigation Project : पाडळसे निम्न तापी सिंचन प्रकल्प रखडलेलाच

SCROLL FOR NEXT