Kolhapur News: केंद्राने अखेर १५ लाख टन साखर निर्यातीला हिरवा कंदील देणारे परिपत्रक काढले आहे. मागील आठवड्यात या निर्णयाबाबत सूतोवाच केल्यानंतर शुक्रवारी (ता.१४) सायंकाळी याबाबत सावर्जनिक अन्न व वितरण विभागाने सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या साखर उत्पन्नानुसार कोटा दिला. विविध राज्यांतील ५८३ साखर कारखान्यांमध्ये निर्यात कोट्याची विभागणी करण्यात आली असून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कारखान्यांना साखर निर्यात करता येईल..तसेच, मोलॅसिसवरील ५० टक्के निर्यात शुल्क हटवून ते शून्य केले आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या साखर निर्यात कोट्यानुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक ५ लाख ७ हजार टन साखर कोट्यास मंजुरी दिली आहे. त्या खालोखाल महाराष्ट्राला ४ लाख ८८ हजार टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळाली आहे..कर्नाटकसाठी २ लाख ४७ हजार टन कोटा देण्यात आला. या तीन राज्यांतच सुमारे १२ लाख टन देशाबाहेर साखर विक्रीस परवानगी दिली आहे. उर्वरित सुमारे तीन लाखांच्या कोट्याची विभागणी अन्य राज्यांमध्ये करण्यात आली आहे..India Sugar Export: साखरेसाठी धोरणसातत्य हवे.मागील तीन हंगामांतील (२०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५) सरासरी उत्पादनाच्या आधारे कारखान्यांना कोटा देण्यात आला आहे. प्रत्येक कारखान्याला त्यांच्या तीन वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५.२८६ टक्के एवढा एकसमान निर्यात कोटा मिळाला आहे. कमीत कमी एक हंगाम चालू असलेल्या कारखान्यांचाही विचार करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या साखरेची निर्यात करण्यास कारखान्यांना परवानगी दिली आहे..देशांमध्ये सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून होत असताना कोट्याबाबतीत मात्र केंद्राने दुजाभाव करताना उत्तर प्रदेशला प्रथम पसंती दिली आहे. महाराष्ट व कर्नाटकला बंदरांची सेवा जवळ असल्याने या राज्यांतून निर्यातीला प्राधान्य दिले जाते. देशाच्या एकूण कोट्याच्या तब्बल सुमारे साठ टक्के निर्यात एकटा महाराष्ट्र करतो. त्या खालोखाल पंचवीस टक्क्यांपर्यंत निर्यात कर्नाटकातून होते..Sugar Export: केंद्राची १५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी.वाहतूक खर्च महाग पडत असल्याने उत्तरप्रदेशातील कारखाने देशांतर्गत साखर विक्रीला प्राधान्य देतात, असा आजवरचा अनुभव आहे. यामुळे सर्वाधिक साखर कोटा देऊनसुद्धा उत्तरप्रदेशातून साखर किती निर्यात होईल, याबाबत साशंकता आहे. गेल्या वर्षीही दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी देऊनसुद्धा देशातून कशीबशी सात लाख टन साखर निर्यात झाली होती..कारखान्यांकडून चाचपणी सुरुकेंद्राकडून अंमलबजावणीबाबतचे आदेश आल्यानंतर कारखान्यांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात दराबाबत चाचपणी सुरु केली आहे. सध्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फारसे समाधानकारक दर नाहीत. गेल्या महिन्याभरात जागतिक बाजारात दरात घसरण झाल्याने कारखान्यांना दिलेल्या कोट्यानुसार साखर निर्यात करण्यासाठी ‘वेट अॅन्ड वॅाच’ची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे साखर उद्योगाकडून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.