Goat Farming : निर्जंतुकीकरणासह शेड कोरडे राखण्यावर भर

Goat Farm Management : बुलडाणा जिल्ह्यातील मोहाडी (ता. सिंदखेडराजा) येथील नागेश काळे मागील ९ वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहे. सध्या त्यांच्याकडे एकूण ९५ शेळ्या आहेत.
Goat Farming
Goat Farming Agrowon
Published on
Updated on

Goat Rearing Management :

शेतकरी नियोजन : शेळीपालन

शेतकरी : नागेश गजानन काळे

गाव : मोहाडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

एकूण शेळ्या : ९५

बुलडाणा जिल्ह्यातील मोहाडी (ता. सिंदखेडराजा) येथील नागेश काळे मागील ९ वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहे. सध्या त्यांच्याकडे एकूण ९५ शेळ्या आहेत. त्यात प्रामुख्याने जमनापुरी, उस्मानाबादी, आफ्रिकन बोअर, बीटल, सानेन आणि सोजत अशा विविध जातींचा समावेश आहे. पैदाशीसाठी शेळीपालन शेडमध्ये उत्तम गुणधर्म असलेला बीटल जातीचा बोकड देखील ठेवण्यात आला आहे

पावसाळ्यापूर्वीचे कामकाज

शेळ्यांना पावसाळ्याच्या दिवसांत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता जास्त असते. तुलनेने सुका चारा तितकासा उपलब्ध होत नाही. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये सुक्या चाऱ्याची साठवणूक करून ठेवली आहे. कारण पावसाळ्यात शेळ्यांना जास्त प्रमाणात हिरवा चारा दिल्यास जुलाब होण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्यासोबत सुक्या चारा जास्त प्रमाणात दिला जातो. त्यात प्रामुख्याने तूर भुस्सा, हरभरा भुस्सा यांचे प्रमाण जास्त असते. हा चारा पावसामुळे भिजून ओला होऊ नये यासाठी संरक्षित ठिकाणी ठेवला आहे.

Goat Farming
Goat Farming : जातिवंत शेळ्यासाठी पैदास धोरण

पावसाळ्यापूर्वी पीपीआर आणि ईटी आदींचे लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करून घेतले आहे. शेळ्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे त्यांच्या शरिरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. लस टोचल्यानंतर शेळीच्या शरिरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास पंधरा दिवस लागतात. त्यामुळे रोगाची बाधा झाल्यानंतर किंवा साथ आल्यानंतर लसीकरण करून फायदा होत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जातो.

पावसाळ्याच्या दिवसांत शेडमध्ये योग्य स्वच्छता राखली नाही. तर शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. शेडमध्ये पावसाचे पाणी येऊ नये यासाठी शेडची डागडुजी करून घेतली आहे. शेडमध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशकांचा वापर करण्यावर भर दिला जातो. तसेच निर्जंतुकीकरण द्रावणांनी शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते.

शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी शेडची बांधणी पूर्व-पश्चिम दिशेने केली आहे. त्यामुळे शेडमध्ये हवा खेळती राहून सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात येतो.

साधारणपणे पहिला पाऊस पडल्यानंतर शेळ्यांच्या अंगावर गोचीड होतात. गोचीड शेळ्यांचे रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. गोचीड नियंत्रणासाठी पावसाळ्यामध्ये शेडमध्ये कीटकनाशकाचा वापर केला जातो. याशिवाय पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात.

Goat Farming
Goat Farming : शेळीपालनातील या अडचणी ओळखा व्यवसाय यशस्वी करा

पावसाळ्यातील नियोजन

पावसाळ्याच्या दिवसांत सकाळच्या वेळी सूर्यप्रकाश असेल तर शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी सोडले जाते. दुपारी पावसाची स्थिती निर्माण होत असल्याने पुन्हा शेळ्या शेडमध्ये आणून त्यांना सुका चारा दिला जातो. त्यात प्रामुख्याने तूर भुस्सा, हरभरा भुस्सा दिला जातो. तसेच संध्याकाळी खाद्यामध्ये लिंबाचा वाळलेल्या पाला एकत्रित करून दिला जातो.

पावसाळ्यात शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. कारण, शेडमध्ये पावसाच्या पाण्यामुळे ओलावा जास्त काळ राहतो आणि त्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी शेडची दिवसातून दोन वेळा स्वच्छता करून कोरडे राखण्यावर भर दिला जाईल. शेडमध्ये निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी घेतली जाईल.

पिण्याच्या पाण्यातून आजाराची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेळ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. पाण्यामध्ये गूळ, चुना काळे मीठ दिले जाते.

पावसाळ्यामध्ये लहान करडांमध्ये मरतूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी करडांची विशेष काळजी घेतली जाते. करडांना दिवसातून चार वेळा थोड्या थोड्या प्रमाणात शेळीचे दूध पाजले जाते. करडे मोठी होतील, तसे दूध पाजण्याचे हळूहळू कमी करून चारा खाण्याची सवय लावली जाते. करडे थोडी मोठी झाल्यावर त्यांनी सुबाभूळ, दशरथ घास, मेथीघास आणि सुका चारा दिला जातो. याशिवाय मका, गहू, हरभरा, तूर यांचा भरडा दिला जातो.

गाभण शेळ्यांची काळजी

शेळ्यांची गाभण काळात योग्य काळजी घेण्यात येते. गाभण शेळ्यांचे खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन उत्तमरित्या होण्यासाठी त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते.

गाभण शेळ्यांना देण्यात येणाऱ्या खुराकाचे प्रमाण वाढविले जाते. त्यात विशेषतः सुक्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असते.

शेळी व्यायल्यानंतर बाजरी, गूळ, तूरडाळ, उडीदडाळ, शतावरी पावडर, खनिज मिश्रण यांचा खाद्यामध्ये वापर केला जातो.

सुरुवातीचे १५ ते २० दिवस कॅल्शिअमची मात्रा दिली जाते. जंतनाशक मात्रा देऊन लिव्हर टॉनिक दिले जाते.

नागेश काळे, ९४०३३२२०६६

(शब्दांकन : गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com