Chana Crop Agrowon
यशोगाथा

Chana Crop : नेटक्या व्यवस्थापनातून वाढविली हरभरा पिकाची उत्पादकता

Crop Management : अमरावती जिल्ह्यात सावळापूर येथील मिलिंद गोदे यांनी मशागतीपासून ते खते. पाणी, पीक संरक्षणव काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन, पट्टा पद्धतीचा वापर, विविध वाणांचा वापर याद्वारे हरभरा पीक यशस्वी केले आहे. एकरी १३ ते १४ क्विंटलपर्यंत त्याची उत्पादकता त्यांनी साध्य केली आहे.

Vinod Ingole

Farmer Success Story : अमरावती जिल्ह्यात सावळापूर (ता. अचलपूर) येथील मिलिंद व नंदकिशोर या गोदे बंधूंची एकत्रित २२ एकर शेती आहे. पैकी सात एकरांचे व्यवस्थापन मिलिंद सांभाळतात. जोडीला ५० एकर शेती भाडेतत्त्वावर करतात.

प्रयोगशीलता जपण्यासह अभ्यासपूर्ण शेती करताना घातखेड व दुर्गापूर या दोन्ही कृषी विज्ञान केंद्रांचे (केव्हीके) संपर्क शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. खरिपात सोयाबीन, कापूस ही पिके असतातच. दोन एकरांवर तीळ असतो.

त्याचे एकरी चार क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्यास सात, आठ हजारांपासून ते नऊ हजारांपर्यंत प्रति क्‍विंटल दर मिळतो आहे. त्याचा एकरी उत्पादन खर्चही पाच हजारांच्या आत असल्याने हे पीक फायदेशीर ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

भूमिहीन ते जमीनमालक

मिलिंद यांचे वडील जिनदास यांच्याकडे एक एकरही शेती नव्हती. गावोगावी यात्रा, आठवडी बाजारात ते मिठाई दुकान थाटायचे. त्यातून पै पे गोळा करीत दोन एकर शेती व टप्प्याटप्प्याने क्षेत्र १६ एकरांपर्यंत नेले. दोन्ही मुलांनी ते २२ एकरांपर्यंत वाढविले. परिणामी, कधीकाळी मोठी गरीबी अनुभवलेले हे कुटुंब आज कष्टाच्या बळावर चांगल्या दिवसांची अनुभूती घेत आहे.

हरभरा पिकात हातखंडा

रब्बी हंगामात दरवर्षी १७ ते १८ एकरांवर हरभरा लागवड असते. या वर्षी २२ एकरांवर नियोजन आहे. दर दोन वर्षांआड माती परीक्षणावर भर राहतो. गावातील शेतकऱ्यांकडील मातीचे नमुने संकलित करूनही मिलिंद घातखेड केव्हीकेच्या प्रयोगशाळेत पाठवितात.

जमीन तयार करण्यासाठी ‘कल्टिवेटर’, त्यानंतर चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर एकरी दोन ट्रॉली याप्रमाणे होतो. त्यानंतर रोटाव्हेटर व पुन्हा जांभूळवाही होते. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी पेरणी होते.

कोरडवाहू परिस्थितीप्रमाणे सहा दाती ‘सीड ड्रील’ व एकरी ४० किलो बियाणे वापर होतो. दोन ओळींत १६ ते १८ इंच अंतर राहते. पट्टा पद्धतीने लागवड करताना जमिनीच्या प्रकारानुसार दर चार ते सहा ओळींनंतर एक ओळ मोकळी सोडली जाते. या पद्धतीत पिकाला हवा खेळती मिळते. ‘स्प्रिंकलर’च्या माध्यमातून पाणी देणे सुलभ होते. फवारणी चांगल्या प्रकारे करता येते.

उन्हाळ्यात कंपोस्ट खतनिर्मिती

हरभरा काढणीनंतर उन्हाळ्यात जमिनीला विश्रांती देण्यात येते. या कालावधीत दहा ट्रॉली शेणखत कडुनिंबाच्या झाडाखाली ठेवले जाते. सातत्याने पाणी शिंपडण्यावर भर राहतो. एस-९ कल्चर किंवा ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीचा वापर होतो. या माध्यमातून चांगले कुजविलेले कंपोस्ट खत तयार होते. त्याचा वापर सर्व पिकांसाठी गरजेनुसार होतो.

यांत्रिकीकरण

घरच्या शेतीसोबत भाडेतत्त्वावरही ती कसली जात असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय अवलंबिला आहे. त्यासाठी तीन ट्रॅक्‍टर्स व अनेक अवजारे ताफ्यात आहेत. घरच्या शेतीची गरज भागवून शेतकऱ्यांना ती भाडेतत्त्वावर दिली जातात. हा देखील उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत ठरला आहे.

तज्ज्ञ सांगतात

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हरभरा पैदासकार अर्चना थोरात सांगतात, की हरभरा पिकास ३०-५०- ३० याप्रमाणे नत्र- स्फुरद- पालाश किलो प्रति हेक्‍टरी असे खत व्यवस्थापन करावे. जस्ताची कमतरता असल्यास हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट पेरणीसोबत द्यावे. युरियाची दोन टक्‍के पहिली फवारणी पीक फुलोरा अवस्थेत असताना व दुसरी फवारणी १०-१५ दिवसांनी करावी. पीक ४५ दिवस तणमुक्‍त असावे. पेरणीपूर्वी शिफारशीत

रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा वापरायचे असल्यास ४ ते ५ ग्रॅम प्रति किलो अशी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम (एकेसीआर-१) व पीएसबी प्रत्येकी २५ ग्रॅम बियाण्यास लावावे. कोरडवाहू देशी बियाणे चार तास पाण्यामध्ये भिजवून पेरावे.

अलीकडील वर्षांत एकरी साडेअकरा, तेरा ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादकता मिळवली आहे. एकरी सरासरी साडेपाच ते सहा हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. प्रति क्विंटल ५२०० ते ५५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नाफेडला विक्री केली जाते.

पीकस्पर्धेत उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल मिलिंद यांना अचलपूर तालुका स्तरावर गौरविण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, केव्हीके घातखेड व दुर्गापूर यांच्याकडूनही गौरव झाला आहे. रामेती, वनामती येथेही मार्गदर्शनासाठी पाचारण केले जाते. ‘व्हॉट्‍सॲप’च्या माध्यमातूनही अन्य शेतकऱ्यांना ते मार्गदर्शक करतात.

मिलिंद गोदे, ९४२३३६११८५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT