Woman Impowerment : फणसोप-मागलाडवाडी (ता.जि. रत्नागिरी) येथील सौ.भाग्यश्री भार्गव मुरकर या एकवीस वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. परिसरातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यासाठी त्यांनी यशश्री महिला बचत गट तयार केला. सध्या त्या गटाच्या अध्यक्षा आहेत. याचबरोबरीने पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन श्री लक्ष्मीकेशव उत्पादन महिला समूहाची सुरवात केली.
परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन गेल्या आठ वर्षांपासून त्या नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनवीत आहेत. वर्षाला सुमारे ६०० झाडू निर्मिती त्या करतात. एक झाडू ६० रुपयांनी विकला जातो. याचबरोबरीने गटाच्या माध्यमातूनही झाडू निर्मितीला त्यांनी चालना दिली आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प
झावळ्यांपासून झाडू बनविताना पाती फुकट जात होती. ती टाकून देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. त्यापासून काहीतरी करता येईल का? याचा विचार भाग्यश्रीताई करत होत्या. सहा वर्षांपूर्वी अनुलोम संस्थेच्या माध्यमातून फणसोपसह आजूबाजूच्या परिसरात सामाजिक काम करणारे रवींद्र भुवड यांच्याशी त्यांचा परिचय झाला.
त्यांनी वाया जाणाऱ्या पातीचा उपयोग गांडूळ खत निर्मितीसाठी करण्याचा सल्ला दिला तसेच मार्गदर्शनही केले. गांडूळ खत निर्मितीसाठी सुरुवातीला १२ फूट बाय ४ फूट आकाराच्या तीन टाक्या बांधल्या. खत निर्मितीसाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातून शेण गोळा केले. पहिल्या वर्षी सुमारे एक टन खत निर्मिती झाली. या खताचा वापर स्वतःच्या काजू बागेत केला.
परिसरातील गरज ओळखून त्यांनी २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात गांडूळ खत निर्मितीला सुरुवात केली. दुसरीकडून शेण विकत आणण्यापेक्षा स्वतः म्हशी पाळल्या तर आपसूकच मेहनत आणि खर्चाची बचत होईल हे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना ‘उमेद''च्या वनश्री आंब्रे यांचे मार्गदर्शन मिळाले. गांडूळ खत निर्मितीसाठी १८ फूट लांब बाय ४ फूट रुंद आणि ४.५ फूट उंच आकाराच्या दोन टाक्या बांधल्या. टाक्यांच्या तळाशी एका बाजूला उतार दिलेला आहे. त्यामुळे टाकीमध्ये पाणी साचून रहात नाही. सुरवातीला टाकीत तळाशी नारळाची सोडणं उपडी ठेवली जातात.
त्यावर शेणाचा थर, पुन्हा सुकलेला पालापाचोळा, पुन्हा शेण असे टाकी भरेपर्यंत अडीच फूट उंचीचे थर रचले जातात. पंधरा दिवस सलग त्यावर पाणी मारले जाते. हे सर्व घटक व्यवस्थित कुजले, की त्यामध्ये गांडूळ सोडली जातात. यावर दर १५ दिवसांनी जीवामृत फवारणी केली जाते. यामुळे गांडुळांची चांगली वाढ होते. यातून दर्जेदार खतांची निर्मिती होते.
दर चार महिन्यांनी टाकीत तयार झालेले खत गोळा केले जाते. हे खत चाळून विक्री केली जाते. गतवर्षी पाच टन खत तयार होते. गावातील आंबा बागायतदारांना १५ रुपये किलो या दराने खताची विक्री होते. शहरी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन भाग्यश्रीताईंनी श्री लक्ष्मीकेशव उत्पादक महिला समुहाच्या माध्यमातून दोन किलो क्षमतेच्या आकर्षक पिशवी पॅकिंगमध्ये गांडूळ खत विक्रीला सुरवात केली. दरवर्षी पाच टन गांडूळ खत विक्रीतून ४० हजार रुपयांची उलाढाल होते.
पुरस्काराने गौरव
२०१३ मध्ये उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून शासनाचा पुरस्कार.
२०२३ मध्ये ग्रामपंचायतीकडून अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
दुग्धोत्पादनातून रोजगार
भाग्यश्रीताईंनी गांडूळ खतासाठी पुरेशा प्रमाणात शेण उपलब्ध होण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मुऱ्हा म्हैस आणि आणि गावठी गाय संगोपनाचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडून तीन देशी गाईंची खरेदी केली. त्यानंतर बँकेकडून कर्ज घेऊन दोन मुऱ्हा म्हशींची खरेदी केली. यासाठी पशू विभागाच्या योजनेतील अनुदानाचा त्यांना लाभ मिळाला. गावातील ग्राहकांना दररोज २० लिटर दुधाची विक्री सुरू झाली. सरासरी ५५ ते ६४ रुपये प्रति लिटर दर मिळू लागला. मात्र आता मजूर कमतरतेमुळे त्यांनी म्हशी, गाईंची संख्या कमी केली. सध्या गोठ्यात एक म्हैस आहे. मजुरांची उपलब्धता होताच येत्या काही दिवसांत चार गावठी गाई घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.
कागदी डिश, द्रोण निर्मिती
विविध व्यवसायातून उत्पन्नाची साखळी निर्माण करताना लग्न समारंभासह विविध सोहळ्यांमध्ये जेवण, नाश्ता यासाठी लागणाऱ्या कागदी डिश बनविण्याचे यंत्र भाग्यश्रीताईंनी विकत घेतले. मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत फणसोपसह आजूबाजूच्या गावांत विवाह सोहळा, शिमगोत्सव, गणपती यासह विविध कार्यक्रमांसाठी डिश आणि द्रोण मागणी वाढू लागली आहे. वर्षाला सुमारे दहा हजारांहून अधिक डिश, आणि द्रोण विक्री होते. २५ डिशचे एक पॅकेट ७० रुपयांना विकले जाते. या व्यवसायातून सुमारे ३० टक्के नफा शिल्लक राहतो.
फळझाडांची लागवड
मुरकर कुटुंबीयांनी वडिलोपार्जित डोंगराळ जमिनीवर ८० काजूची झाडे लावली आहेत. कोरोना काळात मुंबईत नोकरीनिमित्त असलेली नीलेश आणि शैलेश ही दोन्ही मुले कुटुंबांसह गावाकडे आली होती. या कालावधीत कुटुंबातील सर्व सदस्यांनी पडीक जमिनीत ५५० सुपारी, ४० नारळ, ७० कोकम तसेच फणसाची कलमे लावली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.